Type Here to Get Search Results !

गणपती बाप्पा विराजमानाच्या आठवणी



गणपती हे समस्त हिंदू बांधवाचे आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशासह परदेशातही जेथे हिंदूबांधव स्थायिक आहेत तेथे भाद्रपद शु.चार अर्थात गणेशचतुर्थीला गणपतीचे घरोघरी आगमन करतात.महाराष्ट्रातील पुणे,मुंबई व कोकणात गणेशोत्सव हा सार्वजनिक लोकोत्सव म्हणून साजरा करतात.कोकणात गणपतीसाठी दहा ते बारा दिवस सुट्ट्या घेऊन भावीक भक्त गणपतीची पूजा,अर्चना करतात.गणपती हा विद्येची देवता म्हणून ओळखली जाते.गणपती बाप्पा लहान मुलांना अतिशय आवडणारा देव आहे.लहान मुलांचे हट्ट पुरवता-पुरवता मोठी माणसे कधी त्याच्या भक्तीत लीन होऊन जातात हे कळतही नाही.कारण बाप्पाचे रूपच तसं सर्वांना भुरळ घालणारे असे आहे. हा बाप्पा संकटसमयी सर्वांसाठी धावून येणारा आहे.सर्वांच्या आयुष्यात सुख घेऊन येणारा आहे.त्याच्या दहा दिवसाचा भक्तीयुक्त,प्रेमयुक्त सहवास वर्षभर जगण्याला बळ देऊन जातो.

 गणेशजीचे पूजन सर्व नगर उपनगराबरोबर खेड्यापाड्यात लोकवस्तीत करतात.गावाकडेही आम्ही लहान मुले गणपती बसवायचो.गणेश चतुर्थीच्या एक-दोन दिवसा अगोदर गावाच्या शेजारी साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर पारध तालुका भोकरदन येथे हीडंबाची जत्रा भरते.त्या जत्रेला आम्ही सर्व लहान मुले,मुलीं बरोबर घरातील मोठे मंडळी सुद्धा जायचे. डांबरी रस्त्याने पावसाळ्यातील हिरवीगार झाडे-झुडपे बघत रस्त्याने शेताच्या बांधवरील विहिरीतील पाणी पीत.असा पायी हा प्रवास अगदी आनंदात करायचो. रस्त्यात धामणगाव यावी याच काळात कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात..काही वेळ कुस्त्या बघून यात्रेला जायचो.पारध येथील पाराशर मुनी व महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन यात्रेत फिरायचो.आई अण्णांनी दिलेल्या खर्चातून काही आवडीच्या वस्तू खरेदी करायचो. मात्र जास्त जीव अडकायचा तो गणपतीसाठी व त्याच्या मखराच्या सुशोभीकरणाच्या वस्तुमध्ये कारण आजूबाजुच्या खेड्या गावातून मूर्तिकार गणपतीच्या सुंदर मुर्त्या विकायला आणायचे.गणपतीसाठी काही सुशोभीकरणाच्या वस्तू त्यामध्ये विशेषतः गणपतीच्या पाठीमागे लावण्यासाठी रंगींबेरंगी कागदाचे चक्र विकत घ्यायचो.बेगडी कागद, मुरमुरे,रेवढ्या गोड शेव असा प्रसाद घ्यायचो.पैसे शिल्लक असल्यास,एखादी बारीक बल्बची लायटिंग विकत घ्यायचो. बाप्पाला सोबत घेऊन गंमत जंमत करत घरी यायचो.

 गणपती बाप्पा विराजमान होणार म्हणून,घरात गावात प्रसन्न वातावरण राहायचे आम्ही.सर्व मुले बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करायचो. खेड्यातल्या आम्हां मुलांची तयारी तरी काय हो ! गणपतीच्या मखरासाठी सैराच्या काड्या,पाच दहा रुपयाची रद्दी पेपर,रंगीत बेगडी कागद,गव्हाचं पीठ पतलं शिजवून बनवलेली गोंद म्हणून चिक्की दुसरं काय? मात्र हेच खूप समाधान कारक असं जगणं होतं.त्याचबरोबर उत्सवही अगदी बिना खर्चिक! गावाकडची घरं जवळपास मातीपासून बनवलेल्या भिंतीचे असायचे.घरात भिंतीला देवळी असायची.मातीच्या देवळीला पांढऱ्या मातीने सारवून घ्यायचो. रंगीबेरंगी कागद कापून फुले,पताका तयार करायचो व अवतीभवती गव्हाचं किंवा तांदळाच्या पिठाला पतलं शिजवून गोंद म्हणून त्या चिक्कीने चिटकवायचो.ज्याच्या घरात मुबलक प्रमाणात जागा असेल ते काड्या,बांबू वगैरे उभे करून मखर बनवायचे.गावा शेजारी मानलेले आजी-आजोबा सोनाआई व नामदेव बाबा यांच्या वावरातून सैरीच्या बारीक-बारीक काड्याचा भारा डोक्यावर घेऊन यायचो.काड्यांची लांबी साधारण सहा ते आठ फुटांपर्यंत असल्यामुळे घरी आणून करवतीने योग्य मापात कापून घ्यायचो.जमिनीमध्ये खड्डा करून चार काड्या रोवून उभ्या करायचो.त्याला चौरसाकृती भागात परत चारी बाजूंनी समप्रमाणात सुतळीच्या साह्याने काड्या बांधून त्याला चार ते पाच फुटापर्यंत घराच्या आकाराचे तयार करायचो. पुढील बाजूला दोन त्रिकोणी काड्या लावून मंदिराच्या प्रवेशद्वारासारखे बनवायचचो. मागील तिन्ही बाजू घरातील कोऱ्या नविन, डिजाईनच्या साडी किंवा लुगड्याने सुई दोऱ्याने पूर्ण शिवून घ्यायचो.दर्शनी भागाला खोक्याच्या पृष्ठाच्या साह्याने प्रवेशद्वाराचा आकार कापून चिटकवायचो.वेगवेगळ्या आकाराचे रंगीत फुले बनवून गव्हाच्या चिक्कीने चिटकवायचो.अवतीभवती बारीक लायटिंग लावायचो.त्यामुळे मखर शोभून दिसायचा.मखराच्या आत घरातील एखादा लोखंडाचा डब्बा किंवा लाकडी स्टूल ठेवायचो.त्यावर लाकडी पाठ ठेवून कोरा करकरीत लाल रंगाचा कपडा टाकून त्यावर तांदळाची रास मांडून गणपती बाप्पा विराजमान करायचो.

 गणपती बाप्पा मखरात विराजमान झाला की,अजून मखर कसा छान दिसेल म्हणून डेकोरेशन करत राहायचचो. एरवी सकाळी लवकर न उठणारे आम्ही पोरं मात्र सकाळी लवकर उठायचो.आंघोळ करून गणपती बाप्पाच्या आरतीची तयारी करायचो.शाळा सुटल्यावर वावराच्या बांधावरून छान लुसलुशीत हिरवीगार एकवीस-एकवीस दुर्वाचा संच बनवून ठेवायचो त्यासोबत अघाडा जोडायचो.झेंडूच्या किंवा कराळ्याच्या फुलांचा हार बनवायचो. याच काळात अगदी नाजूक पाकळ्यांचे वेगवेगळ्या रंगाचे फुलं फुलायची त्यालाआम्ही मुलं गणपतीचे फुलं म्हणायाचो.फुले,दूर्वा तोडून आणल्यावर हात पाय स्वच्छ धुवून संध्याकाळ व दुसऱ्या दिवशी सकाळी साठी दुर्वा व हार बनवून ठेवायचो.सुकायला नको म्हणून,पाण्यात टाकून ठेवायचो.बाप्पाच्या प्रसादासाठी शक्यतो साखर असायची. कधीकधी त्यात खोबऱ्याचा कीस टाकलेला असायचा.पहिल्या व शेवटच्या दिवशी माय गूळ घालून छान मोदक करायची.पेढे हा प्रकार प्रसादसाठी फारसा नव्हता कारण,पेढे तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याचे ठिकाणी भेटत असे.खेड्यात कुठून भेटणार,म्हणून साखर,खडीसाखर, खोबरा खिस,मोदक हाच आमचा बाप्पासाठी प्रसाद असायचा.

     सूर्योदय झाला की,गल्लोगल्ली गणपतीच्या आरतीचा गजर ऐकायला यायचा.आरतीसाठी आम्ही पोरांनी साधारण सात ते आठ जणांचा मेळ घातलेला असायचा.झोपेतून उठायला उशीर झाला तर,गल्लीत चक्कर मारली की,मोठ्या आवाजात "सुखकर्ता दुखहर्ता"आणि टाळ्यांचा गजर चालू असला म्हणजे आरती सुरू झालेली आहे असं समजायचं.मग हळूच त्यांच्यात घुसून त्यांच्यात मिसळून जायचो.इतर मित्रांच्या घरी जायचो. कारण आपल्या घरीही सगळ्यांनी यायला हवं नाही तर,त्यातही हेवेदावे....! शेवटी बालमनच ते...!बाप्पाच्या आरतीसाठी माझे व दादांचे गल्लीतील सर्व मित्रमंडळी यायचे.त्यापैकी रामेश्वरमामा संतोषभाऊ,अनिल,किरण,कैलास,गजानन,प्रमोदमामा,श्रीराम भाऊ दिलीपभाऊ असा छान ग्रुप होता.मित्रमंडळी आरतीला आले कि,सर्वप्रथम गणपती बाप्पाला दुर्वा,फुलांचा हार अर्पण करायचो.अगरबत्ती आणि गुलाल लावायचो.त्यानंतर सगळ्यांना कपाळावर तीन बोटाने गुलाल लावायचो.आरतीची पूर्वतयारी करून ठेवलेली असायची.दिवा पेटवला की,आरती म्हणायचो. "सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची"आरती झाली की कापूर पेटवून सगळ्यांना कापुराची ज्योत दाखवायचो.सर्वजण कापुराच्या पेटवलेल्या ज्योतीवर दोन्ही तळहात फिरवून चेहऱ्यावर फिरवायचे.त्यातून जणू एक शक्ती मिळायची. प्रत्येकाच्या हातात फुले किंवा फुलांच्या पाकळ्या द्यायचो. मंत्रपुष्पांजली अर्थात मोठ्याने "गणपती बाप्पा मोरया" म्हटलं की बाप्पाच्या चरणी अर्पण करायचो.त्यानंतर सगळ्यांना साखरेचा किंवा साखर खोबऱ्याचा प्रसाद वाटून एक सुरात "गणपती गणपती तुझे नाव चांगले!आवडी बहुचिञ रेखीले! प्रार्थना तुझी गौरीनंदना,दे दया बुद्धी दे गजानना!"सर्वजण ही प्रार्थना मोठ्या आवाजात म्हणून,बाप्पाचा जयजयकर करायचे.व त्यानंतर सर्वजण प्रसाद खायचे.जवळपास आठ ते दहा घरी चिमुट-चिमूटभर जरी प्रसाद म्हटला तरी जवळपास 50 ग्रॅम साखर नक्कीच खाऊन होत असेल.अशा प्रकारे नित्यनेमाने आम्ही बालमित्र गणपती बाप्पांची आरती करायचो.बाप्पाच्या आगमनाने घरातील वातावरण प्रसन्न राहायचे.जसे जसे दिवस सरायचे व बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस जवळ यायचा तसं तसं मात्र मन नाराज व्हायचं. विसर्जनसमयी घरातील सगळ्यांचे नेत्र ओले व्हायचे,कारण या दहा दिवसात बाप्पा जणू घरातील एक सदस्य बनायचा.सकाळ संध्याकाळ त्याची पूजा करायचो त्यामुळे घरभर आनंदाचे वातावरण असायचे.मात्र त्याच्या रिक्त जागेमुळे सुनं- सुनं वाटायचं.दहा दिवस तो जणू प्रेमाचा आणि भक्तीचा लळा लावायचा.बाप्पासाठी माय छान त्याला आवडणारे गुळाचे मोदक बनवायची.त्याला नैवेद्य अर्पण करायचचो.तो पोटभर तृप्त जेवायचा.आम्हा मुलांना बुद्धीची देवता म्हणून आवडणाऱ्या बाप्पाला बुद्धीचे देवता म्हणून "सद्बुद्धी दे सुबुद्धी दे" म्हणून प्रार्थना करायचो.

 विसर्जनदिनी बापाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर घरातील सर्वजण सामूहिक आरती करायचो. गावातील मंडळाच्या सार्वजनिक गणपती सोबत विसर्जनाला निघायचो. तेव्हा मात्र बाप्पाचा चेहरा नाराज दिसायचा.कदाचित त्यालाही आम्हा लेकरांच्या भोळ्या-भाबड्या प्रेमाचा लळा लागला असावा असं वाटायचं. पानावलेल्या डोळ्यांनी आम्ही,"एक दोन तीन चार,गणपतीचा जयजयकार","एक लाडू चंद्रावर,गणपती बाप्पा उंदरावर"."एक लाडू फुटला,गणपती बाप्पा उठला"असा बाप्पाचा जयघोष करायचो.विसर्जनसमयी ओल्या नेत्रांनी व जीवाच्या आकांताने "गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या"म्हणून परतीच्या वाटेवर निघताना पाणावलेल्या डोळ्यांनी पुढील वर्षी बाप्पाची येण्याची वाट बघायचो.

श्री विनोद शेनफड जाधव

मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment

0 Comments