Type Here to Get Search Results !

श्रद्धास्थान ते प्रकटस्थान-शेगांव पायी दिंडी सोहळा



बुलढाणा जिल्ह्यातील मासरूळ या गावाला शेकडो वर्षाचा आध्यात्मिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे.या गावात यादवकालीन महादेव मंदिर,दक्षिणमुखी हनुमान मंदिर,राम मंदिर,आई अंबा भवानी मातेचे मंदिर त्याचप्रमाणे चक्रधर स्वामींच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.गावात भव्य मंदिरे आहेत. गावातील सर्व जाती धर्मातील लोक सर्व सणसमारंभ गुण्यागोविंदाने साजरा करतात.महादेव मंदिर तथा मारुतीच्या मंदिरामध्ये दररोज सायंकाळी मोठ्या गजरात हरिपाठ म्हटल्या जातो.सुमधुर अश्या या टाळ मृदूंगाच्या आवाजाने गावातील वातावरणाचे प्रसन्न राहते.दरवर्षी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो.गावातील तरुण मंडळीसह अबाल वृद्ध तथा महिला भगिनी सर्व धार्मिक कार्यामध्ये हिरीरीने सहभागी होतात.गावातील कालिदास नाना देशमुख व इतर माऊलींचे भाविक मंडळी यांच्या संकल्पनेतून मागील पंधरा वर्षातून संतश्रेष्ठ गजानन महाराज शेगाव येथे भाद्रपद मासारंभाला पायी वारीचे आयोजन करण्यात येते आहे.व यंदा सुद्धा करण्यात आले.या वारीमध्ये सुरुवातीला काही बोटावर मोजण्याचे भाविक सहभागी होते मात्र,या वर्षी अर्थात सन 2025 मध्ये याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले असून शेकडो युवक तथा जेष्ठ नागरिक सहभागी झाले आहेत.

 संत गजानन महाराजांच्या भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे मासरूळ या गावातून पायी वारी दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी प्रस्थान झाली. संपूर्ण गावातून गजानन बाबांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.संपूर्ण गावातील महिला-भगिनीनी सडा-सार वण करून रांगोळ्या काढल्या.सर्व भाविक भक्तांनी"गण गण गणात बोते" जप करत टाळ मृदुंगांच्या गजरात छान फुगड्या खेळत पालखीचे प्रस्थान केले.प्रकट स्थानासाठी सज्ज झालेल्या दिंडी प्रस्थानसमयी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.या वर्षीही या पायी दिंडी सोहळ्यानिमित्त गावातील तरुण मंडळी निशुल्क सेवा माऊली चरणी अर्पण केली. त्यामध्ये वाहन खर्च जनार्दन निकम,सुभाष शिंदे,योगेश साळवे,सदाशिव नेवरे,योगेश कापरे,गणेश आल्हाट,भारत पवार यांनी योगदान दिले.आरोग्यविषयी सुविधा नंदकिशोर साळोख व नितीन सावळे यांनी पुरवल्या.त्याचप्रमाणे माऊली रथ सजावट करण्यासाठी लागणारा खर्च निशुल्क स्वरूपात गावातील मंडळी यांनी केला.मृदूंग सेवा गणेशफुसे, किरण देशमुख,राजेंद्र सिनकर यांनी दिली.या पायी दिंडी सोहळ्या दरम्यान गीत गायन संजय सिनकर,भिका अपार,पुंडलिक कोथळकर यांनी केले.अखंड विणेकरी म्हणून नामदेव सिनकर,पुंडलिक सावळे,लक्ष्मण आमले,विठ्ठल बोडखे यांनी सेवा दिली.व त्याचबरोबर गावातील शिवभजनी मंडळ, गणेश भजनी मंडळ,श्री चक्रधर भजनी मंडळ, वाल्मिकी ऋषी भजनी मंडळ व सर्व महिला भजनी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे.

 पायी दिंडी सोहळ्याचे मार्गक्रमण श्रद्धास्थान मासरूळ ते प्रकटस्थान शेगाव दरम्यान जामठी, दहिद, देऊळघाट,बुलढाणा वरवंड,बोथा खामगाव असे ठरलेले असते. गावातील श्रद्धाळू भाविक दिंडी दरम्यान सकाळचा नास्ता,माधन्ह भोजन, सायंकाळचे भोजनची व्यवस्था करतात.माऊलीच्या नामघोषातदिंडीचेप्रस्थान होते.यावर्षी तीन दिवसाच्या मुक्कामातील सकाळचा नास्ता व चहा व्यवस्था कडुबा घुले,सुनील देशमुख,विशाल सिनकर,विजय पायघन,गजानन पवार, राजू शेळके यांनी केली.वारकरी मंडळी साठी माध्यन्हभोजनाची व्यवस्था गजानन ताठे, जालिंदर बुधवत,संदीप पाटील, किशोर जाधव,मनोज दांडगे यांनी केली. संध्याभोजनाची व्यवस्था बाळासाहेब देशमुख,संतोष धंदर व श्री गजानन महाराज सेवा समिती वरणा फाटा यांनी केली.त्याचबरोबर वारकरी मंडळीचा रात्रीचा पहिला मुक्का म गुलमोहर हॉटेल जवळ शिवसाई कॉलेज येथे दुसऱ्या दिवशीचा मुक्काम आश्रम शाळा वरवंड येथे तर तिसरा मुक्काम वरणा फाटा येथे निश्चित करण्यात आला आहे.मुक्काम स्थानी सर्व वारकरी मंडळी माऊलीचे भजन,हरिपाठ व पोथीचे वाचन करतात.माऊलीच्या भजन,कीर्तनात व नामस्मरणात तेथील वातावरणात दुमदुमते.मुक्काम स्थानी सर्व सुविधा करण्यात येतात.दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान संध्या उरकून चहा नास्त्याचा आस्वाद घेऊन परत माऊलीच्या नामस्मरणात पालखीचे प्रस्थान करतात.पावसाच्या निसर्गरम्य वातावरणात विशेषत:बोथ्याच्या घाटातील निसर्गरम्य वातावरणात हिरव्यागार वनराईतून पांढऱ्याशुभ्र गणवेशातील माऊलींची पायी दिंडी अगदी शोभून दिसते. रस्त्याच्या दुतर्फा झाडे वृक्ष वेली, खळखळणारी झरे, पशुपक्ष्यांचा किलबिलाट यांचा जणू वारकरी मंडळी सुखद अनुभव घेतात.अध्यात्माबरोबर निसर्ग सानिध्याचा एक आगळा वेगळा अनुभूती दिंडी दरम्यान वारकऱ्यांना येते. बोथा घाटीतील वन्य प्राणी व पक्षी जणू दिंडीचे स्वागत करत उभे राहतात असा भास होतो.असा हा आनंदाचा सोहळा अन सुखद अनुभव घेत सर्व वारकरी माऊलीच्या नामसंकीरत्नात गुंग होऊन व माध्यन्ह काळी तपस्वी महाराज मंदिर येथे भोजनाची व्यवस्था करण्यात येते.त्यानंतर वरणाफाटा येथे श्री महाराज सेवा समितच्या वतीने संध्या भोजन व विश्रांतीची व्यवस्था करण्यात येते.दुसऱ्या दिवशी अर्थात दिंडीच्या चौथ्या दिवशी खामगाव नाका लासुरा मार्गे दिंडी थेट समस्त वारकरी मंडळीसह अखिल कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरु श्री गजानन महाराजयांच्या प्रवेश द्वाराजवळ येऊन पोहचते. माऊलीच्या भव्य प्रवेश दारातून अगदी शिस्तीत पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी माऊली च्या मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतात.माऊलीचे मनोभावे दर्शन घेतात. माऊलीसमोर नत होऊन आपली सुख दुःख सांगतात.शेतकरी,कष्टकऱ्या सह समस्त जगाच्या कल्याणाची प्रार्थना करतात.जड अंतःकरणाने माऊलीचा निरोप घेतात व नव्या उमेदीने वारकरी आपल्या शेतात राबतो. व्यवसायिक आपल्या व्यवसायातून जनतेची सेवा करतो.काही शासकीय निमशासकीय कर्मचारी सुद्धा पायी दिंडीत सहभागी झालेले असतात ते आपल्या सेवेत माऊलीच्या आशीर्वाद घेऊन रुजू होतात.या चार दिवसाच्या पायी दिंडीत वारकरी मंडळी एकमेकांनाच्या सुख दुःखात सहभागी होऊन आध्यात्मिक कुटुंबाचे जणू सदस्य बनतात.मन जुळतात.अन घरी पोहचल्यावर ओल्या डोळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतात.या पायी दिंडी वारीचा सुखद अनुभव,क्षण उराशी बाळगून जीवनातील एक आध्यत्मिक पायी दिंडी सोहळा माऊलीच्या कृपेनें अनुभवास मिळाला याची धन्यता मानून जीवनभर अशीच माऊली चरणी लीन होण्याची प्रार्थना करतात.

 पवित्र अशा या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविक वारकऱ्यांसाठी सौम्य स्वरूपाची नियमावली ठरवण्यात आलेली असते. त्यामध्ये विशेषता सर्व वारकरी हे पांढऱ्या गणवेशातच राहतील.15 वर्षाखालील मुले दिंडीत सहभागी होणार नाही.दिंडी दरम्यान कुठल्याही प्रकारचे व्यसन अर्थात तंबाखू,बिडी सिगारेट अथवा मद्यप्राशन करता कामा नये.अन्यथा दिंडीत प्रवेश मिळणार नाही.असे हे सेवा समितीचे ठरवलेले नियम सर्वजण अगदी तंतोतंत पालन करतात.विशेष असे की, श्रद्धास्थानावर उभारलेल्या माऊलीच्या मंदिरामुळे गावामध्ये आध्यात्मिकतेची ओढ निर्माण झाली.त्यामुळे कित्येक तरुणांनी अध्यात्माच्या वाटेवर येऊन धूम्रपान,मद्यपानाचा त्याग केला व सन्मार्गाची वाट धरली.

 अशाप्रकारे अशी असा हा पायी दिंडी सोहळ्याचा शंभर किलोमीटरचा प्रवास श्रद्धास्थानापासून ते प्रकटस्थानापर्यंत जवळपास चार दिवसात व तीन दिवसाच्या मुक्कामामध्ये साधारण दररोज वीस ते पंचवीस किलोमीटरचा प्रवास वारकरी अगदी आनंदाने पार करतात.पायी प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचा थकवा,तणाव न जाणवता उत्साह प्रत्येक वारकऱ्याच्या मनात ओत प्रोत भरलेला दिसून येतो.अध्यात्माबरोबर शारीरिक व मानसिक दृष्टिकोनातूनही पायी वारी प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त आहे. असा वारकरी त्यांच्या अनुभवातून सांगतात.या दिंडी दरम्यान आनंदाच्या सोहळ्याची अनुभूती येते.जीवनात एकदा तरी या पायी वारीचा अनुभव घ्यावा.

गण गण गणात बोते..!

श्री विनोद शेनफड जाधव 

मासरूळ जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments