प्रतिनिधी. इमरान शेख सुलतानपूर,(ता.लोणार)
लोणार येथे आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या वतीने गुरुवारी गवळीपुरा येथे पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा व पत्रकार परिषद घेण्यात आली. सुभान परसुवाले यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष तौफिक अली तर प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष अमजद खान, जिल्हा सोशल मीडिया प्रभारी साहिल खान, तालुका उपाध्यक्ष अश्पाक परसुवाले यांच्यासह सय्यद समीर, जावेद कुरेशी, शेख इक्बाल, शेख साहिल, शेख मुजफ्फर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना तालुकाध्यक्ष तौफिक अली म्हणाले, "पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून समाजातील वास्तव परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचे मोठे कार्य ते करतात. त्यांचा सन्मान करणे हा AIMIM पक्षाचा हेतू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आम्ही सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन विकासाच्या मुद्यांवर लढणार आहोत. पाणीटंचाई, घरकुल, रस्ते व नागरी सुविधा यांसारख्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देऊ. फक्त राजकारणासाठी नव्हे, तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी AIMIM कटिबद्ध आहे.”
तसेच त्यांनी स्पष्ट केले की,आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही AIMIM लढवणार असून पक्षाकडे योग्य उमेदवारांची उपलब्धता आहे. जागा खुली राहिल्यास स्वतः तालुकाध्यक्ष तौफिक अली नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी संकेत दिले.यावेळी शहराध्यक्ष अमजद खान यांनी सांगितले की,"नव्या पिढीला राजकारणात संधी मिळाली पाहिजे. युवकांच्या कल्पनांनुसार लोणार शहराचा विकास केला जाईल. हे ऐतिहासिक व पर्यटनस्थळ असल्याने शहराला दर्जेदार स्वरूप मिळवून देण्यासाठी AIMIM प्रयत्नशील राहील.”
पत्रकार परिषदेत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने सांगितले की,“AIMIM पक्ष फक्त घोषणा देत नाही तर वास्तव काम करून दाखवतो. सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावणे हेच आमचे ध्येय आहे.”
शेवटी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विश्वगामी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सज्जाद भाई, तालुकाध्यक्ष जुबेर कुरेशी तसेच संघटनेचे इतर पदाधिकारीही या वेळी उपस्थित होते. या सोहळ्यामुळे AIMIM कार्यकर्ते व पत्रकार बांधवांमध्ये सुसंवाद व एकात्मतेचे नवे पर्व सुरू झाल्याचे वातावरण दिसून आले.

Post a Comment
0 Comments