साधारणपणे व्यसन याला म्हणता येईल की,एखाद्या पदार्थाची किंवा वर्तनाची तीव्र इच्छा होणे.सर्वसाधारण भाषेत त्याला "लत" म्हणता येईल.एखादी गोष्ट वारंवार करण्याचे मन होणे व त्याच्या व्यक्ती अधीन होऊन जाणे.या सर्व प्रक्रिया व्यसनाच्या सदरात मोडतात.मानवी मनाला मेंदूने दिलेल्या आज्ञानुसार मनुष्य आपले कर्मेंद्रिय शारीरिक कामाला लावतात.त्यामध्ये प्रथम डोळे त्यांनतर मन एखाद्या विषयाकडे धाव घेतं व हात पाय त्या विषयाकडे वळतात. मात्र सर्वप्रथम या सवयीस कारणीभूत मन असते."मनाचा संयम उत्तम संयम"परंतु प्रथम बाह्य गोष्टीचा आघात होतो तो मनावरच...!अन एकदा का या मनावरील स्वतःचा ताबा सुटला तर ते अनेक गोष्टीच्या अधीन होऊन जाते. मग त्यातून व्यसन जडायला सुरुवात होते.व्यसनाचे अनेक प्रकार आहेत.त्यामध्ये मद्यप्राशन,धूम्रपान,सतत खरेदी करणे हे सुद्धा म्हणता येईल.हे व्यसन जडण्याचे अनेक कारणे आपणास दिसून येतात. त्यापैकी प्रथम म्हणजे नैराश्य.या नैराश्यातून व्यक्तीला आपले मन कुठेतरी गुंतून ठेवायचे असते. म्हणून त्यासाठी तो व्यक्ती व्यसन किंवा धूम्रपानाच्या आहारी जातो.दुसरे म्हणजे अपयश. या अपयशाला खचून काही व्यसनाच्या आहारी जातात.तिसरे असे की प्रेमभंग. प्रेमभंगातून मुले-मुले व्यसनाकडे वळायला लागलेले आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे चौथे कारण म्हणजे उत्सव सण,साजरे करणे. जसे कि थर्टी फर्स्ट,मित्रांचे वाढदिवस आनंद म्हणून तरुण मंडळी सुरुवातीला धूम्रपान मध्यपान प्राशन करून बघतात व हळूहळू व्यसनाधीन होतात अशा प्रकारातून व्यक्ती व्यसनाधीन होतो.
आनंदा पोटी किंवा दुःख पोटी केलेले हे धूम्रपान व मद्यप्राशन एक दिवस व्यसनात रूपांतरित होते.व त्यातून व्यक्ति पूर्ण व्यसनाधीन झाल्यावर मात्र त्याला तेच सेवन किंवा प्राशन वारंवार करावेसे वाटते. यातूनच त्याचे शारीरिक व आर्थिक नुकसान होते. सामाजिक दृष्टिकोनातून त्याची पत खराब होते व स्वतःबरोबर कुटुंबासाठीही तो त्रासदायक ठरतो.यातून कित्येक कुटुंब,घर उध्वस्त झालेली आपण बघतो. एक विशिष्ट वयात साधारण कुमार वयातील मुले-मुलीं व्यसनाधीन होतात. तर काही वीस-पंच विशीतील व्यसनाच्या आहारी जातात. या व्यसनाधीन लोकांसाठी त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून, समस्त जगभर समुपदेशन केंद्र उभारले आहेत.सल्लागार केंद्रे, आध्यात्मिक केंद्रे,संस्कार शिबिरे, व्यसनमुक्ती केंद्र सेवाभावी संस्था यासाठी प्रयत्न करत आहे.केंद्रात दाखल झालेली व्यक्ती समुपदेशनाद्वारे किंवा काही मनावर ताबा ठेवून, स्वतःमध्ये बदल करून स्वतःला सावरून सुधारतात व त्याची व्यसनातून सुटका होते.
उपरोक्त व्यसनमुक्ती केंद्रातून व्यसनाधीन व्यक्ती सुधारून स्वतःचा विकास करून घेऊ शकतो.मात्र हल्ली सर्व जगभर घराघरात जे प्रत्येकाला व्यसन जडले आहे ते म्हणजे मोबाईलचे व्यसन.बाकी इतर व्यसन अंगी जडायला तरी एक विशिष्ट वय असते. मात्र हे मोबाईलचं व्यसन अगदी विचित्र आहे कि,ज्याला वय,काळ नाही. अगदी लहान वयातील मुलं म्हणजे एक वर्षाच ते दीड वर्षाचे मूल मोबाईलच्या आहारी गेलेलं आपल्याला दिसून येतं.व्हिडिओ बघितल्याशिवाय ते जेवण सुद्धा करत नाही.इतर व्यसनाला व्यक्ती स्वतः कारणीभूत असतो मात्र दीड ते दोन वर्षाच्या मुलांना मोबाईलचे व्यसन लावायला त्यांचीच आई-बाबा कारणीभूत असतात. म्हणजे या व्यसनाला वय नाही व लहान मुलांना मोबाईलच्या व्यसनाधीन बनवायला आई-बाबा जबाबदार आहेत.मुले जसे-जसे मोठे होऊ लागतात तसतसे त्यातील गेम, रिल्स बघायला लागल्यानंतर तर ते पूर्ण "मोबाईल चे अधीन"झालेले दिसून येतात. बाहेर खेळायला सुद्धा जात नाही मैदानी खेळ खेळत नाही. घरात बसून लठ्ठपणा व मनोरुग्न होताना दिसून येत आहे. त्यामुळे मुलं हट्टी होत आहे. एवढेच काय ! बारा ते चौदा वर्षाची मुलं मोबाईल हाताळायाला दिला नाही म्हणून, आत्महत्या करताना दिसून येत आहे. एवढी भयावह परिस्थिती हल्ली या मोबाईलच्या व्यसनामुळे झालेली आपल्याला दिसून येत आहे.
वयाच्या सोळा ते पंचवीस वयोगटातील तरुण-तरुणी सुद्धा मोबाईलच्या खूपच अधीन झालेल्या दिसून येत आहे.वेगवेगळ्या अँप्सच्या माध्यमातून रील बनवत आहे.अश्लील स्वरूपाच्या रिल्स बनवून समाजामध्ये अश्लीलता पसरवण्याचे काम करत आहे. एका विशिष्ट वयातील मुले आकर्षणापोटी, उत्सुकतेपोटी तासंतास ते बघत बसतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. मैदानी खेळ खेळताना दिसत नाही. चार भिंतीच्या आतील व्हिडिओ गम खेळत आहेत. त्याचबरोबर व्हाट्सअप सारख्या ऍप्सवर हल्ली स्टेटस ठेवण्याचा कल(ट्रेंड)भरपूर प्रमाणात वाढला आहे.बाहेर कुठेतरी फिरायला गेले असता,स्वतःचे छायाचित्र कॅमेरात कैद करून स्टेटस ठेवतात.या सेल्फी काढण्याच्या नादात कितीतरी तरुण-तरुणींना जीव गमावा लागला आहे. काहींना व्यसन जडल जडलेले आपल्याला दिसून येत आहे.कुटुंबातील किंवा स्वतःचा वाढदिवस असल्यास त्याला ज्यांनी स्टेटसच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या स्टेटसचा स्क्रीनशॉट काढून स्वतःच्या स्टेटस ठेवण्याचा हल्ली ट्रेंड आहे.नेमकं यातून त्याला काय सिद्ध करायचे आहे कुणास ठाऊक?असो!
या स्वरूपाचे असे मोबाईल मध्ये असे अनेक ॲप्स आहेत. त्यामध्ये फेसबुक,स्नॅपचॅट,इंन्स्टाग्राम,व्हिडिओ एडिटर यावर तरुण-तरुणी कितीतरी तास आयुष्यातील वेळ खर्च घालतात. अर्थात एखाद्या मद्यपीप्रमाणे त्या मोबाईल मध्ये तासान तास गुंतून गेलेले दिसून येतात. म्हणजेच त्यांना तीच क्रिया किंवा मोबाईल मधील तेच दृश्य,व्हिडिओ,छायाचित्र वारंवार बघावेसे वाटतात. म्हणजेच ते पूर्णतः मोबाईलचे अधीन झालेले आपल्याला दिसून येतात.तज्ञांच्या मतानुसार मोबाईलच्या आहारी गेलेल्या अगदी चिमुकल्या पासून ची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वेनुसार शंभरपैकी चाळीस ते पंचेचाळीस टक्के मुले पूर्णतःमोबाईलच्या आधीन झालेले आपल्याला दिसून येत आहे.तर तरुण-तरुणींचे मोबाईल मुळे मनोरुग्णांतील प्रमाण दुपटीने वाढले आहे.मोबाईलच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांचा त्रास,मोबाईल झूकून बघितल्या मुळे मानेचा त्रास तर सततच्या एका जागी बसल्यामुळे कमरेचा त्रास होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर कुटुंबातील नात्यांमध्ये गैरसमजातून मनभेद आणि मतभेद होताना दिसून येत आहे.
सध्याच्या काळात या पिढीला जडलेले हे मोबाईलचे व्यसन इतर व्यसनांपेक्षाही महाभयंकर ठरणारे आहे.इतर व्यसन तरी त्यांच्या नशेची तीव्रता कायम राहेपर्यंत राहील व काही काळाने उतरून जाईल.मात्र मोबाईलचे व्यसन याहून भिन्न आहे कारण त्यातील गेम्स,अश्लील व्हिडिओ,चित्र-विचित्र रील्स ह्या मुलांना व तरुणांनाच काय वृद्धांनासुद्धा आकर्षित करत आहे. दुसरी गोष्ट अशी कि,मोबाईल अर्थात भ्रमनध्वनी हा सोबत घेऊन कुठेही भ्रमन करू शकतो.त्यामुळे तो सतत व्यक्तींसोबत असतो. त्यातील इंटरनेटची सुविधा सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे व्यक्ती रात्री-अपरात्री बघत बसतो.पूर्वी जे व्यावसायिक कॅमेऱ्यात मेगा फिक्सल यायचे ते हल्ली मोबाईलच्या कॅमेरा मध्ये दिसून येत आहे.तरुण तरुणीच काय वृद्धसुद्धा हल्ली कॅमेरातील फिल्टर्स मोडमुळे काळ्यासावळ्या चेहऱ्यावरील डागही त्यातील फिल्टर्स,क्रॉप,एडिटिंगचा वापर करून क्षणात मिटवून स्वतःला सुंदर दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.त्यांचे मोबाईलच्या स्टेटसवरील सुंदर,आकर्षक एडिटेड फोटो बघितल्यावर प्रसन्न झालेल्या मनाचा त्यांना प्रत्यक्षात बघितल्यावर मात्र पूर्णतःभ्रमनिराश होतो.या अर्थहीन फालतू गोष्टींच्या नादात तरुण-तरुणी तासनतास घालवत आहे.जरी आपले कर्म सुंदर नसले तरी,जगासमोर सुंदर दाखवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असल्या या अर्थहीन गोष्टीमध्येच ही तरुण पिढी या मोबाईलच्या व्यसनाने आयुष्याची वाट लावून घेत आहे.
या काळात सर्व जगाला या मोबाईलने भुरळ घातली आहे. त्याच्यापायी कित्येकांना आपले जीवन गमावावे लागले आहे.कित्येकजण एकलकोंडे होऊन मनोरुग्ण होतांना दिसून येत आहे. ज्याप्रमाणे दारू, सिगारेट,बिडी या व्यसनाने ग्रासलेल्यांना त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी किंवा जाचातून बाहेर काढण्यासाठी जसे व्यसनमुक्ती केंद्र, सल्लागार केंद्र,समुपदेशन केंद्र उभारले आहेत. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात"मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र"उभारावे लागणार आहे असे वाटते.
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments