समस्त जगाला प्रेमाची शिकवण देणारा कृष्ण.कृष्ण जन्माच्या पूजेतील रांगणारा रंगनाथ त्याला प्रेमाने लंगडा कृष्ण म्हणतात.याचं कृष्णाला अनेक नावांनी ओळखलं जातं कुणी बाळकृष्ण,राधाकृष्ण,देवकीनंदन,युगपुरुष,सखा,सारथी एवढेच काय त्याला रणछोडदास असंही म्हणतात.तरीही समस्त मानव प्राण्याला युद्धाचं स्मरण करून देणारा युगपुरुष जगासाठी वंदनीय ठरला.युद्ध मग ते रनांगणातील असो अथवा अंतर्मनातीचे अंतर्मनाशी, स्वतःचे स्वतःशी असो, कायम पाठीशीउभा राहणारा हा कृष्णसखा युद्धाचा स्मरण करून देत असतो. प्रत्येक वेळेस शस्त्र घेऊनच युद्ध लढायचं असतं असं नाहीतर कधी खचलेल्या मनाने उठून उभे राहायचं अन स्वतःशीच स्वतः सोबत झालेल्या युद्धासाठी सज्ज व्हायचंअसतं. अस कृष्ण आपणास त्याच्या लिलेतून वेळोवेळी स्मरण करून देत असतो.
हल्ली आपण बघतो कृष्ण जन्मासाठी समस्त जगात कृष्णप्रेमी जय्यत तयारी करतात. लंगड्या बाळकृष्णाला छान अंगडी टोपरं परिधान करून,मोरपंखांचा छान फेटा घालतात. त्याला आवडणाऱ्या वस्तू अर्पण करतात. त्यासाठी समस्त कृष्णप्रेमी रात्री बारा वाजेपर्यंत जागून कथा, कीर्तन,गाणी,गवळणी,अभंग गायन करून कृष्ण जन्म साजरा करतात व त्यानंतर झोपी जातात. मात्र कृष्ण जीवनाचा खरा संघर्ष सुरू होतो तो जन्मानंतरच...!बाळकृष्णा चा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला. श्रावणातील या काळात नद्या,नाले दुथडी वाहत असतात.तेव्हाही यमुना पाण्याने तुडुंब भरून वाहत असताना गर्द काळोखात कृष्णाला मथुरेतून गोकुळात घेऊन जातांना बाबा वासुदेवाची काय अवस्था झाली असेल.जन्मदात्र्या देवकीची बाळकृष्णाला मावशीकडे पाठवताना काय अवस्था झाली असेल.किती भयंकर संघर्ष असेल ना तो क्षण.प्रत्यक्ष परमेश्वराचं रूप असतांना त्याच्या जीवनातील हा क्षण केवढा हृदयद्रावक आहे नाही का? मनात आणलं तर त्या क्षणीही कृष्ण काही करू शकले असले.पण नाही. कारण परमात्याला जगाला दाखवून द्यायचं होतं कि,चमत्कारातून काही ही साध्य होत नाही.कायम स्मरणात ठेवायचं असतं की,कुठलीच गोष्ट सहजासहजी शक्य नाही त्यासाठी करावा लागतो तो संघर्ष. मग तो शस्त्राने असो की मनाचा मनाशी असो. भगवान श्रीकृष्ण आपणास कायम हेच स्मरण करून देत असतात.कदाचित हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मच मुळात आपल्यासाठी झाला असावा.
भगवान श्रीकृष्ण आपल्यासमोर रेखाटले जातो तो, गोप-गोपिके सोबतच्या रास क्रिडेत रममान होणारा,सुमधुर बासुरीच्या नादात गुंग राहणारा.मात्र त्याचबरोबर हाच कृष्ण,"आज गोकुळात रंग खेळतो हरी,राधिके जरा जपून जा तुझ्या घरी"हेही तेवढ्याच सतर्कतेने सांगतो. बाल वयात भगवान श्रीकृष्णाने अनेक लीला केल्या.कुठे दही-दुधाची मटकी फोडली.पूतणा मावशीला धडा शिकवला.कालियाचे मर्दान करून यमुनेचे पाणी विषमुक्त केले.गोपीकेसोबत रास क्रीडा केल्या.आपल्या सवंगड्या सोबत जात-पात,गोर-गरिबीचा विचार न करता सहिष्णूतेची शिकवण देणारा "गोपाळकाला" केला.गोपाळकाला म्हणजे केवळ दूध,दही,फुटाणे,लाह्या, लोणी, भाकरी, मिरच्या लोणच्यांचे मिश्रण नाहीतर,समस्त मानव जातीला मानव जातीला एकात्मितेची शिकवण देणारा स्नेह,मैत्री आणि बंधुभावाचा काला आहे.हजारो वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी जगाला प्रेम,समता बंधूता एकात्मता याची शिकवण दिली.जरी स्वतः दुःखात असतांना...! या ठिकाणी म्हणाल ते कसं?भगवान परमात्म्याने मानव कल्याणासाठी मानव रुपात जन्म घेतला. तेव्हा वासुदेव-देवकी सारखे माता पिता की, ज्यांचं जीवन तुरुंगात गेलं.कंसांच्या भित्र्या व कपटवृत्तीतून कृष्ण जन्मा अगोदर कंसाने सात बहिण-भावांचा जीव घेतला.या अश्या घटना सामान्य आहेत का?जगाच्या समोर फक्त कृष्ण हा बाल-लिलेत रमणारा नसून,जन्मनंतरही अश्या कित्येक संकटाशी सामना करण्याचं जीवन त्या भगवान परमात्म्याच्या नशिबी होतं.कायम युद्धाचा प्रसंग डोळ्यासमोर होता. यासोबतच भगवान परमात्मा मथुरा,गोकुळ सोडून द्वारकेला गेले. तेव्हा आपल्या सवंगड्याना सोडून जाण्याचा विरह त्यांनी बघितला.भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या माध्यमातून जगाला अनमोल असा ठेवा दिला.जगाच्या पाठीवरील असा एक प्रश्न नाही की,ज्याचे उत्तर भगवदगीतेत नाही.मनुष्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर भगवत गीतेत सापडतात.जेष्ठ साहित्यिक व पु काळे म्हणतात, आपण"सर्व अर्जुना आहोत"कारण अर्जुनाला महाभारतातील युद्धप्रसंगी अनेक प्रश्न पडले.तसेच अनेक प्रश्न आपल्या भोवती घिरट्या घालत असतात. त्या प्रश्नाचे उत्तर भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिले.अर्जुनाच्या खचलेल्या मनाला धीर दिला.तसंच सुख दुःखात धीर देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण समस्त मानव जातीसाठी उत्तम मार्गदर्शक आहे.
युद्धभूमीवर अधर्माविरुद्ध धर्माची लढाई-लढताना अर्जुनाने आपल्याच सग्या सोयऱ्यांना समोर बघून हातपाय गाळून टाकले. गांडीव धनुष्य खाली ठेवून भगवान श्री कृष्णाला की,माझेच सर्व नातेवाईक-सगेसोयरे हे की ज्यांच्या अंगा-खांद्यावर खेळलो. त्यांच्यासोबत वाढलो. त्यांच्यासोबत युद्ध कसे करू.यात माझे कसे भले होणार.अर्जुन नात्यातील भावनेत गुंतून कृष्ण परमात्म्यासमोर हात जोडतो.रानांगण सोडून पळपुट्यासारखं पळून जायचं ठरवतो.मी यांना मारून सुखी राहू शकणार नाही मला एक इंचही जमीन आणि कुठलेच वैभव नको.मी भिक मागून जीवन जगेल परंतु हे युद्ध नको.तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ,गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 38 व्या ओवीतून म्हणतात,"सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यशि||"वरील ओवीत भगवान कृष्ण म्हणतात,अर्जुना,हे युद्ध तुझ्या संपत्तीसाठी नाही.तुला ऐश्वर्य प्राप्त व्हावं यासाठी नाही. सुख मिळावे यासाठी नाही. कारण सुख दुःखाचा विचार करत बसशील तर ते, सर्व समान आहे.युद्धतील जय-पराजयाचा विचार करत असतील तर ते सुद्धा परिणामांवर अवलंबून आहे.मात्र हे युद्ध तुला करायला हवं कारण,हे युद्ध धर्माचे अधर्माशी आहे.युद्धातून जो परिणाम होईल त्याचे तुला पाप लागणार नाही.त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही भगवान श्रीकृष्ण असाच पाठीशी उभा राहतो. वेळोवेळी सांगत असतो कि,झुंज दे. तेही"सर्वे्षु कालेशु"म्हणजे सर्व काळात जेव्हा प्रसंग घडेल तेव्हा लढ.मला आठवून लढ...! जणू कृष्ण सखा आपणास सांगू इच्छितो की, मी नाही का अगदी लहान असताना पूतना मावशी सोबत झुंजलो, कंसाच्या चाणूर आणि मुष्टिक पैलवानाना नमवलं.प्रत्यक्ष मामाशी युद्ध केलं.त्याला शासन केलं.तेव्हा तर मी लहानच होतो ना.म्हणून कृष्ण सखा आपणास कायम युद्धाचं स्मरण करून देतो व जगण्याचं बळ देतो.
आताच्या काळातील समस्त तरुणाईला आपल्या कर्तव्यपालनात अडचणी आल्या तर, नक्कीच कृष्ण सख्याला स्मरण करा.आपल्या अस्तित्वासाठी,न्यायासाठी,हक्कासाठी, स्वाभिमानासाठी, स्वातंत्र्यासाठी पर्यायाने देशासाठी...! मग त्या यावेळेस स्त्री पुरुष, लहान-मोठा,पशुपक्षी,नातीगोती,लाभ-हानी भावभावना हे सर्व बाजूला ठेवून.या लढाईत कधी समूहाने लढायचे आहे तर,कधी कधीही एकट्याने लढायचे आहे. कधी शश्त्र हाती घेऊन लढायचे आहे तर,कधी शास्त्राविना लढायचे आहे.अन हो! युद्ध फक्त दुसऱ्याशी किंवा शत्रूंशीच लढायचं असतं असं नाही तर कधी-कधी स्वतःशी सुद्धा लढायाचं असतं. आपल्या आत पेटलेल्या अंतर्मनातील अंतर्मनाशी. मनातील युद्ध हे न संपणार आहे त्याला घट्ट करून सुखदुःखात संयमाने,धीरानं त्यावर मात करायची असते.
असा हा कृष्ण परमात्मा केवळ बाललीला किंवा बासरीच्या नादात गुंतवून ठेवणारा देव नाही तर, सतत संघर्ष,कर्तव्य आणि धर्मासाठी झुंजणारा एक उत्तम मार्गदर्शक,सखाआहे. समस्त मानव जातीसाठी जीवनात येणाऱ्या सुखदुःखाना सामोरं जाऊन कायम युद्धाचं स्मरण करून देणारा सारथी आहे.तो म्हणतो, तुझ्या जीवनरुपी आयुष्याचा रथ मी हाकलणार आहे. केवळ तू माझा सतत स्मरण कर आणि झुंज दे. संघर्ष कर आणि युद्धाला सज्ज हो.असा हा कृष्णसखा आपल्या शांतप्रिय मनाला संयमाने तर कधी धैर्याने युद्धासाठी सिद्ध होण्याची शिकवण देतो. श्रीकृष्ण जयंतीच्या समस्त कृष्णप्रेमींना खूप खूप शुभेच्छा...!
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments