Type Here to Get Search Results !

ड्रेनेज सिस्टीमअभावी दिवा शहरात साथीच्या रोगांचा धोका; शिवसेना ठाकरे गटाच्या ज्योती पाटील यांची प्रशासनावर नाराजी




प्रतिनिधि अरविंद कोठारी

दिवा : दिवा शहरातील वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे गट) दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवा शहरासाठी सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणाच नसल्याने अशी यंत्रणा कधी कार्यान्वित केली जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दिवा शहरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली असून, लोकसंख्येच्या तुलनेत सोयी-सुविधांचा अभाव तीव्रतेने जाणवत आहे. अनेक इमारती आणि चाळींच्या आसपास सांडपाणी साचलेले दिसते, ज्यामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका असतो . अनेक जुन्या इमारतीच्या बाजूला घाणीचे साम्राज्य दिसते.ही गंभीर बाब लक्षात घेऊन, पालिका प्रशासनाने तातडीने दिवा शहरासाठी सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था लागू करावी, अशी मागणी ज्योती पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

सध्या दिवा शहरात ड्रेनेज सिस्टीम नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या निष्क्रियतेबद्दल ज्योती पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रशासनाला या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, दिवावासियांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.लवकरात लवकर दिव्यासाठी ड्रेनेज प्रकल्प राबवावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments