आपल्या आराध्य दैवतेची मूर्ती आपल्या अंतर्मनात घर करून बसते. सर्व धर्मामध्ये परमेश्वराला मानण्याचं एक प्रतीक असतं. काहींना मूर्ती पूजा मान्य नाही नसली तरी वेगवेगळ्या माध्यमातून परमेश्वराच्या अस्तित्वासमोर नत होऊन आपल्या अंतर्मनातील इच्छा,आकांक्षा त्याच्यासमोर व्यक्त करतात.सुख समाधानासाठी प्रार्थना करतात मग तो कुठल्याही रूपात असो. प्रार्थना स्थळावर आपले मन हलके करतात. जणूकाही तो आपलं सारं काही ऐकतोय अशी मनातून आपली त्याच्याप्रति श्रद्धा असते आणि हो हे तेवढंच खर आहे...! आपल्या प्रिय श्रद्धास्थानासमोर अंतर्मनापासून केलेली प्रार्थना तो नक्की ऐकतो.हिंदू संस्कृतीमध्ये मूर्ती पूजेला मान्यता आहे.वेगवेगळ्या प्रकारचे आराध्य दैवत आपण पूजतो.विशेषतः भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला समस्त देशासह विदेशातही घरा- घरात गणपतीबाप्पा विराजमान होतो. त्याची सर्व मनोभावे पूजा अर्चना करतात.
आपल्या कुठलेही आराध्य दैवताची प्राणप्रतिष्ठा होण्या अगोदर किंवा विराजमान होण्याअगोदरची पार्श्वभूमी मात्र वेगळी असते.आपण उदाहरणादाखल संकटमोचन गणपती बाप्पा बद्दल थोडंसं बघूया.श्रावणातील भगवान शिवजींची पूजापाठ,व्रत वैकल्य संपले की,आपणास भाद्रपदातील चतुर्थीची ओढ लागते.दिनदर्शिकात बघून आपण गणपतीबाप्पा येण्याची आतुरतेने वाट पाहतो.सार्वजनिक गणेश मंडळे तर,एक ते दोन महिन्याअगोदर बाप्पाच्या आगमनाची तयारी करतात.पुणे,मुंबई सारख्या महानगराप्रमाणे इतर जिल्ह्यातील व तालुक्यातील लोकप्रिय गणेश मंडळ सुद्धा बाप्पाच्या जय्यत तयारीला लागतात.मंडळातील सदस्य ज्याच्या त्याच्या सवडीप्रमाणे वेळ काढून आपला उद्योग,व्यवसाय सांभाळून तयारी करण्यासाठी मदत करतात.त्यासाठी आवश्यक वर्गणी जमा करतात.त्याचप्रमाणे घरगुती गणपतीसाठी सुद्धा लहान मुले,चिमुकले आपल्या आई- बाबांसमोर गणपतीचा मखर, डेकोरेशन, यासाठी हट्ट धरतात.बाजारामध्ये स्वतः आई-बाबांसोबत जातात.आई बाबा सुद्धा मुलांच्या हट्टा साठी मुलांच्या आवडीच्या वस्तू खरेदी करतात. छान-छान डेकोरेशनसाठी शोभेच्या वस्तू घेतात.कारण बाप्पा सर्वांचा लाडका आहे.अबालवृद्धांचा बाप्पा हे प्रिय दैवत आहे.सर्वांच्या अंतर्मनात बाप्पाच्या आगमनाची एक वेगळी ओढ दिसून येते.
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कितीतरी महिन्यापासून पूर्वतयारी करतात.व्यावसायिक मूर्तिकार तर वर्ष-वर्षअगोदर पासून सुंदर मूर्ती बनवण्यास गुंतले असतात.कलाकार वेगवेगळ्या आकारामध्ये मुर्त्या बनवतात.अगदी लहानात लहान ते सार्वजनिक मंडळातील भव्य अश्या शाडू मातीच्या मूर्ती बरोबर पीओपीच्या मूर्ती बनवून कलाकारवर्ग रंग कामासाठी कित्येक दिवसापासून गणपती बाप्पांची मूर्ती आकर्षक कशी दिसेल यासाठी आपले कला-कौशल्य पणाला लावतात.बाप्पाच्या सुंदर-सुंदर मुर्त्या जेव्हा मूर्तिकार मूर्ती बाजारात विकण्यासाठी आणतो.आपण ठेवलेल्या आकर्षक मुर्त्या बघतो सर्व मुर्त्यापैकी आपल्या अंतर्मनाला आवडेल ती निवडतो.खरंच त्यांची रचना किती न समजणारी व आपल्या न उलगडण्या पलीकडची सते ना खरचं...!तो स्वतःला बाजारात विकण्यासाठी उभा ठाकतो, ते केवळ कुणाचं तरी पोट भरावं म्हणून,कुणाचातरी उदरनिर्वाह चालावा म्हणून एका मूर्तीच्या रूपात.याच जगाचं दुःख निवारण करणाऱ्याची आपण किंमत ठरवतो.अहो! एवढेच काय,हाताच्या बोटाने इशारा करून ती मूर्ती कितीला आहे?अंतर्मनात बसलेला बाप्पा,सर्व जगाचे दुःख निवारण करणारा बाप्पा,सर्वांच्या आयुष्यात सुख घेऊन येणारा बाप्पा,जेव्हा मूर्ती म्हणून खरेदी केल्यानंतर आपल्या हातात घेतो.त्याला मस्तकावर घेऊन मिरवतो.ढोल ताशांच्या गजरात त्याला आपण घरासमोर आणतो.आपली आई, बहीण,पत्नी त्याचे अष्टगंध,हळदी-कुंकवाने पूजन करून घरात घेतो. योग्य मुहूर्तावर त्याची विधिवत पूजा करून विराजमान करतो. त्याच्यासाठी छान-छान मोदक,दुर्वा, सुगंधी फुलाचे हार आपण अर्पण करतो. त्याच्यासाठी छान आसन मांडतो. सर्वजण आनंदात आरती म्हणतो.तो आपल्याला त्याच्या भक्तीचा लळा लावतो.बुद्धीचे देवता, संकट निवारक म्हणून आपले संकट निवारण करतो व तेवढ्याच अभिमानाने आपण सर्व लहान-थोर आपल्या घरात विराजमान झालेल्या बाप्पाला म्हणतो आमचा बाप्पा...!
बघितलं ना! मूर्तिकाराकडे हाच बाप्पा आपण निवडे पर्यंत, आपल्या अंतर्मनात ठसून बसेपर्यंत एक मातीची मूर्ती असतो, मात्र त्याच्या अपार प्रेमाने,मायेने अन आशीर्वादाने तीच मूर्ती आपल्या अपार श्रद्धेतून,भावातून आपल्यासाठी "देव" बनून जातो...!
गणपती बाप्पा मोरया...!
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments