Type Here to Get Search Results !

उजळणी ते जीवनाचं गणित



वर्ग पहिलीत प्रवेश घेतल्यावर माय मराठीच्या बालभारती बरोबर गणिताचे पुस्तक भेटलं.रंगीत मुखपृष्ठावर आकर्षक असं मोठ्या क्षरात एक-दोन लिहिलेलं होतं.एक पाटी त्याच्या बाजूला दोन पोरं आकडे गिरवत आहे असं चित्र होतं.नैसर्गिक वातावरणात उडणारे फुलपाखरू वगैरे त्यामुळे पुस्तकाविषयी आकर्षण अधिकच वाढलं होतं.हातात घेतल्याबरोबर त्याच्या प्रेमात पडावं असं हे पुस्तक उकललं की,आतील पानावर उजळणी,एक ते दहा असं पहिल्या प्रकरणात होतं. या आकड्याचे वाचन एक, दोन,तीन...! असं पाठ करणं सोपं झालं.पण त्याचं व्यवस्थित लिखाण कसं करावं? म्हणून गुरुजींनी फळ्यावर उजळणी रेखाटली.पहिल्या पानावर रंगीबेरंगी फुलपाखरे,फळांचे, प्राण्यांचे चित्र होते त्यामुळे मन प्रसन्न व्हायचं.नुसतं बघत बसायचो. सुरुवातीला उजळणीतील शून्य गुरुजींनी शिकवला.तशी त्याची किंमत काहीच नसते परंतु,एका समोर मांडला तर तर त्याची किंमत दहा पटीने वाढवतो.एवढं सामर्थ्य शून्यात असतं.आकड्यांच्या बाजारात सर्वात मौल्यवान आकडा जर कोणता असेल तर,तो शून्यच आहे कारण,एकाला कोटी बनवण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते.

 गुरुजींनी पुस्तक,पाटी,लेखन दप्तरातून काढायला लावली. फरशीवर बसून मांडीवर घेतलेल्या काळ्या पाटीवर पांढऱ्या लेखनीने गुरुजींनी फळ्यावर काढलेला शून्य पाहून-पाहून गिरवला.गुरुजी या शून्याला उपमा देत.कधी त्याला मायने हाताने बनवलेल्या चुलीवरची गोल-गोल भाकर तर कधी भोपळा म्हणायचे.या त्यांच्या हसत-खेळत शिकवण्यामुळे गणिताची ओढ लागली. व आर्यभट्ट यांनी शोधून काढलेल्या शून्याला लागूनच एक रेषा खेचली तर त्याचा एक बनला.गणितातील आकडे समजून पाटीवर गिरवायची सुरुवात झाली. ते आजतागायात आयुष्यात त्याच्यापासून पान हालत नाही. पावलोपालोही त्याचा कुठेतरी उपयोग आहेच.कधी वेळ,तारीख,पैसे हिशोब घ्या किंवा इतर ठिकाणी या एकाने जीवनात सुरुवात झाली. आकर्षक अश्या शाळेतील पुस्तकात एकासमोर एक फुल,एक चेंडू असं छापलेलं होतं.एक म्हणजे एक वस्तू असं मोजायला अन समजायला सोपं झालं.त्यानंतर गुरुजींनी दोन तीन नऊ पर्यंत रेखाटन करून फळ्यावर चिन्हांच्या स्वरूपात रेखाटून दिले. आम्ही पोरं डब्याच्या पाटीवर एका शिस्तीत "एक दोन" गिरवू लागलो ते नऊ पर्यंत...! घरी कधी मायने तर कधी बाबाने हातात लेखन घेऊन गिरवणं शिकवलं. कधी-कधी प्रेमाने गुरुजींनी जवळ येऊन प्रत्यक्ष हात धरून गिरवायला शिकवलं.गुरुजींनी प्रेमाने शिकवलेलं अजूनही कायम लक्षात आहे.

 शून्य ते नऊ पाटीवर गुरुजींनी गिरवायला शिकवल्यावर फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असल्याचं ते फळ्याजवळ बोलावून काडीने वाचायला लावत असत. हातात काडी घेऊन शून्य या अंकावर शून्य म्हणायचं बाकीचे पाठीमागे म्हणायचे. असं नऊ पर्यंत म्हणायचो. असं नऊ पर्यंत वाचलं कि मुलं परत पाठीमागे म्हणायचे.एका सुरातील तो आवाज ऐकण्यास खूप छान वाटायचा.गुरुजी बाजूला लाकडी खुर्चीत बसलेल्या असायचे. एवढ्या पोरांसमोरं अन गुरुजीसमोर वाचायचं म्हणजे जीव घाबरायचा.हात पाय लटलट कापायचे. हातातील काडी हीच गुरुजींची छडी होती.हीच छडी आमच्यासाठी शिस्त लागण्याचं अन विद्याप्राप्तीच जणू जबरदस्त माध्यम होतं. थोडी थोडी बोबडी वळायची. पण फळ्यासमोर जाऊन वाचायचा नंबर आला म्हणजे वाचा वच लागायचं.तेच फळ्यासमोरील वाचनाने जीवनाचा कायापालट व जगण्यास बळ मिळालं. नाही अर्थतज्ञ किंवा गणित तज्ञ झालो,परंतु भविष्यात जीवनाचे गणित सुधारण्यातस मदत झाली. त्यातून हिशोबाचंज्ञान आणि फसव्या खोटारड्या दुनियेत आर्थिक व्यवहार कसा करायचा तो कळला. अन्यथा या दुनियेत अज्ञानपणाच्या नावाखाली कितीतरी ठिकाणी लुटलं असतं.

" एक दोन" चं ज्ञान झाल्यानंतर 11 ते 100 पर्यंत आकड्यांची ओळख गुरुजींनी करून दिली. या शून्य ते नवातूनच पुढील कोटीपर्यंतची आकड्यांची ओळख,वाचन आण लिहायला गुरुजींनी शिकवलं.एकावर एक अकरा ते एकावर दोन शून्य म्हणजे शंभर हे शिकता-शिकता चौथीपर्यंत गणितातून आठवड्याचे वार सात,महिन्याची दिवस तीस किंवा ऐकतीस, वर्षाचे महिने बारा, घड्याळाचे तास बारा, साठ सेकंदाचा एक मिनिट,साठ मिनिटाचा एक तास तर चोवीस तासांचा एक दिवस असं बरंच काही त्या गणितांन शिकवलं.पाच पैसे,दहा पैसे, पंधरा पैसे,पंचवीस पैसे,पन्नास पैसे असा पैशाचा हिशोब शिकलोकलो.एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये,दहा रुपये यांचे ज्ञान मिळाले.आईने वस्तू आणायला दुकानात पाठवलं तर दहावीची नोट दिली की, त्यातील वस्तू किती रुपयाची झाली? बाकी किती उरले?हे हाताच्या बोटावर लगेच करू लागलो. गावच्या बाजारात आई-अण्णांसोबत भाजीपाला घेतांना एक पाव,अर्धा किलो, एक किलोच्या वस्तू घेताना भाजी विक्रेत्यांच्या तराजूकडे मोजताना मापाकडे बघू लागलो. दोनसे पन्नास ग्रॅम म्हणजे एक पाव,अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम तर एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो असं समजल्या मुळे, असं त्याच्या मोजण्याकडे लक्ष असायचं.खरच...! शाळेतील गणितामुळे जीवनाचं गणित व्यवस्थित जुळवायला शिकलो. वेळोवेळी व्यवहार करतांना समाजातील काही चुकीच्या व भ्रष्ट गोष्टीही लक्षात आल्या.

 शंभर ते हजार पर्यंत आकड्यांची ओळख झाल्यावर साधारण तिसरी, चौथी मध्ये "बे एके बे" असे पाढे शिकलो. त्यातून बेरीज, वजाबाकी, गुणाकार,भागाकार करण्यास मदत झाली. जीवन जगण्यास पुरेसं गणित चौथीपर्यंत शिकलो. पुढील वर्गातील लसावी, मसावी,साईन कॉस थिटा, भूमिती भविष्यात शिकलोचं.मात्र पावलो पावली कामास येणार गणित चौथी पाचवी पर्यंत शिकलो. ते आयुष्यात वेळोवेळी उपयोगात येत आहे.तर कष्टाच्या कमाईतून घर कसं चालावावं,वैयक्तिक कौटुंबिक,खर्च कसा भागवायचा त्यामुळे जीवनाच्या गणिताची घडी बसण्यास मदत झाली.   

 असं हे वर्ग पहिलीच्या गणिताच्या आणि उजळणीच्या पुस्तकातील"एक दोन"हे जगण्यासाठी पावलो-पावली उपयोगात पडणारं असून हिशोबासाठी उपयुक्त ठरलं.हेच जगण्यासाठी बळ देत आहे.या हिशोबाच्या दुनियेत पैशाचे महत्व शिकलो.व्यवहार,उसने-पासने त्यातून जगाची ओळख पटली.जीवनात पैसा सर्व काही नाही परंतु,बरंच काही आहे.याआर्थिक व्यवहारातून याच गणिताबरोबर गणितीय विचारातील व्यवहारी दुनियेची जाणीव झाली.

समस्त गुरुजनांना प्रणाम...!

श्री विनोद शेनफड जाधव 

मासरूळ जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments