जि प मराठी शाळा मासरूळ येथील अर्थात गावातल्या शाळेतच इयत्ता चौथीची बोर्डाची परीक्षा दिली.बोर्डाची परीक्षा म्हणजेच चौथीच्या द्वितीय सत्राचे पेपर खाली फरशीवरच बसूनच दिले. मात्र एका निश्चित नियमाच्या चौकटीत,कारण एकेक हाताचे अंतर घेऊन गुरुजींनी बसण्याची व्यवस्था केली आणि खडूने खाली परीक्षार्थीचा नंबर वगैरे टाकले त्याच नंबरवर बसून मागेपुढे न पाहता अगदी शिस्तीत पेपर सोडवला. वर्गात परीक्षेच्या वेळी गडबड गोंधळ नव्हता.त्यामुळे परीक्षेचे गांभीर्यही तेवढेच म्हणून ती आमच्यासाठी जीवनातील पहिली बोर्डाची अन खडक शिस्तीची परीक्षा होती. वर्ग चौथीतील जेमतेम सर्वच मित्रमंडळी पास झाले. निकालाच्या दिवशी म्हणजे एक मेला गावातल्या मारुतीला नारळ फोडला आणि वर्ग पाचवीच्या प्रवेशासाठी तयारीला लागलो.
वर्ग पाचवी म्हणजे उच्च प्राथमिकच परंतु त्यावेळेस वर्ग पाचवीसाठी जिल्हा परिषदची शाळा नव्हती,म्हणून पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या,श्री शिवाजी हायस्कूल मासरूळ येथे शिकायला जावे लागायचे.चौथीपर्यंतच्या गावातल्या शाळेत पहिली सुट्टी,माध्यान्ह भोजनाची आणि नंतर लघुशंकेची सुट्टी यामुळे गावातल्या गावात शाळा असल्यामुळे फारसं वाटत नव्हतं.मात्र हायस्कुल गावापासून उत्तर दिशेला मढ- बुलढाणा रोडवर जवळपास सोळाशे मीटर अंतरावर अर्थात दीड किलोमीटर अंतरावर होती. अजूनही आहे. आमचे वरील वर्गातील अर्थात सिनियर मित्रमंडळी अन भाऊमंडळी सांगायचे, तेथील गुरुजी मंडळी खूप कडक आहेत.चुकलं की शिक्षा करतात. बापरे बाप!हायस्कुल विषयी मनात भीती उत्पन्न झाली. हायस्कूलला शिकायला गेल्यावर कसं होईल?त्यात इंग्रजी,हिंदी अवघड गणित या विषयामुळे गुरुजी बरोबरच विषयांचीही भीती वाटू लागली.निकालानंतर जि प च्या गावातील शाळेतून शाळा सोडण्याचा दाखला घेतला. भावासोबत वर्ग पाचवीत दाखल होण्यासाठी हायस्कूलवर सायकलवर डबल सीट गेलो,कारण एवढं सव्वा ते दीड किलोमीटर पायी जायाची सवय नव्हती.मढ रोडवरील रस्त्याच्या उजव्या बाजूला श्री शिवाजी हायस्कूलच्या भव्य प्रवेशद्वारातून आत शिरलो. रस्त्याच्या दुतर्फा बांबूची झाडे होती. पन्नास ते साठ मीटर अंतरावर शाळेतील भव्य प्रांगण,वर्गखोल्या व त्यासमोरच मुख्याध्यापक कार्यालय होते. प्रांगणाच्या लागूनच लिपिक रूम होती.तेथे दाखला जमा केला. त्यानंतर आम्ही सर्व शाळा हिरावून क्रीडांगण समोरील बाजूला उंच वाटेवरील वर्ग खोल्या त्यांच्या पाठीला हिरवीगार सहा ते सात एकर एवढे भव्य मैदान त्याचबरोबर भव्य मैदानाच्या बाजूला अर्थात पूर्व दिशेला उजव्या बाजूला काही वर्गखोल्या व श्री शिवाजी निवासी मुलांचे वस्तीगृह होते. स्वयंपाक खोल्या होती.बाजूलाच मुलांच्या निवासाची व्यवस्था होती. तेथून पूर्व दिशेला समोरच खो-खो चे मैदान मैदान होते. बाकी पूर्ण मैदान मोकळे होते.त्यामध्ये सोयीप्रमाणे कबड्डी, क्रिकेट व इतर केळ खेळ खेळण्यासाठी क्रिडांगण बनवलेली होती. हायस्कुल चे प्रवेश द्वार वगळता तिन्ही बाजूला गावातील शेतकऱ्यांचे शेती होती.हायस्कुलच्या ताराच्या कुंपणाबाहेर शेतकऱ्यांचे शेतातले कुडाचे व छपराचे गुराढोरांचे गोठे होते. हे सर्व बघून तेथे मन रमले. तेथून निघावेसे वाटत नव्हते. कारण एवढे मैदान आणि खेळायला मोकळी जागा...! त्या वयात काय हवे? खेळण्यासाठी मोकळी मैदान आणि मनसोक्त खेळणे.त्या काळातील आम्हां वयातील लहान मुलांचा आवडीचा विषय, कारण त्यावेळी मैदानी खेळात आम्ही मुलं जास्त रमून जायचो. कारण घरोघरी रंगीतच काय ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पण नव्हत्या. त्यामुळे खेळण्यासाठी मोकळं मैदानाविषयी खूप आकर्षण होतं. म्हणून तेथील भव्य मैदाने बघून मन खुश झाले.
हायस्कुलवरच शिपाई पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे छोटसं घर होतं.त्याच्यासमोर अर्थात हायस्कुलच्या मुख्य प्रवेशद्वारा दिशेने प्रार्थना व राष्ट्रगीतच्या ग्राउंड च्या बाजूला शिक्षक वृंदांसाठी खोल्या. तेथे सर्व शिक्षक वृंदांचे कपाटं होते. त्यामध्ये हजेरी, डस्टर,खडू वगैरे ठेवलेले असायचे.त्याचबरोबर समोर सिमेंटची पाण्याची टाकी होती. त्याला लोखंडी नळे बसवलेली होती. आजूबाजूला हिरवेगार झाडे होती. हे सर्व दृश्य बघून मनाला अगदी प्रसन्न वाटायचे. हे सर्व डोळ्यात टिपून घेतलं. दिवसभर तिथंच हुंदडलो.
शाळेतील पाचव्या वर्गातील प्रवेश निश्चित झाला.तेथील लिपिक सरांनी शाळा कधी उघडणार याविषयीची सूचना दिल्या. त्यावेळेस साधारण दीड ते दोन महिने उन्हाळ्याच्या सुट्टी असायच्या.मात्र हायस्कूल वर प्रवेश घेतला म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीतही डोक्यात शाळेचे सुविचार होते. कारण सीनियर मित्रांनी शाळेविषयी बरंच काही सांगितलं होतं.अन तेथील भव्य मैदान, निसर्गरमम्य वातावरण बघून हायस्कुलची ओढ लागली होती. गावापासून हायस्कूलचे अंतर जवळपास सव्वा ते दीड किलोमीटर असल्यामुळे सायकल हवी होती.वर्ग चौथीपर्यंत भाडेतत्त्वावर तासाने सायकल चालवायला घेऊन, कैची-कैची शिकलो.परंतु एकदम नवीन सायकल विकत घ्यायची म्हणजे शक्य नव्हते. म्हणून काही दिवस मित्र-मित्र आम्ही पायीचं हायस्कूल वर जायचो.आमचे दोन पाय हीच आमची स्कूल वॅन होती.
उन्हाळा संपल्यावर पावसाच्या तोंडी शाळा उघडल्या. शाळेसाठी दप्तर म्हणून असे वेगळे नव्हतेच, वावरातल्या बि- बियाण्यांच्या थैल्या किंवा वायरची पिशवी हीच आमची स्कूल बॅग होती.मित्रांकडून अर्ध्या किमतीत जुनी पुस्तके विकत घेतली. अन एक रेघी, दोन रेघी अन चाररेघी वह्या घेतल्या.कारण पाचवीपासून इंग्रजी विषय शिकवयाला सुरुवात झाली होती. त्याचबरोबर हिंदी,इतिहास,भूगोल, विज्ञान,चित्रकला हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाले होते. सगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या वह्या विकत घ्यावा लागल्या. त्यात विशेषतः इंग्रजीसाठी चारही वही घ्यावी लागली आणि चित्रकलेसाठी चित्रकलेची वही व रंग कामासाठी रंगकांड्या, वॉटर कलर वगैरे हे सर्व थोडं थोडं करून खरेदी केले.अन शिकायला हायस्कूल वर जाण्यासाठी तयार झालो. सकाळी शाळेची वेळ दहा वाजताची होती, म्हणून घरून थोडं लवकरच निघावं लागायचं.आणि जेवणाचा टिफिन सोबत घेऊन जावे लागे. कारण एवढ्या दुरून दुपारच्या जेवणासाठी पहिल्यासारखे घरी येता येत नव्हतं. म्हणून माय स्टीलच्या डब्यात नाहीतर पालवात भाकर-ठेचा किंवा लोणच्याची एखादी फोड बांधून द्यायची. हाच आमचा टिफिन...! पिण्यासाठी पाण्याची वेगळी बॉटल कसली हो..! झाडाखाली बसून जेवण झाल्यावर,झण झणीत तिखटाch तोंड शु..शु करत पाण्याच्या टाकीजवळ पळत जायचो आणि टाकीतील नळाखाली ओंजळीने पाणी प्यायचो.
गुरुजींनी आमच्या पाचव्या वर्गाच्या दोन तुकडे केल्या. तेथे पहिली ते चौथी सारखं नव्हतं. एक सर आणि एकच विषय शिकवतील तर,वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे गुरुजी होते. वर्ग पाचवीला आम्हांला वर्गशिक्षक म्हणून, श्री एस टी सोनुने होते.ते इंग्रजी शिकवायचे. गणित पवार सर, इतिहास तायडे सर, विज्ञान श्री आर पी सर,भूगोल श्री.आळेकर सर,चित्रकला श्री गिरीसर,हिंदी श्री रूपने उच्च माध्यमिक मध्ये अर्थात आठवी ते दहावीला इंग्रजी श्री म्हस्के सर, मराठी श्री जामनिक सर, इतिहास श्री जाधव सर, विज्ञान श्री रत्नपारखीसर, बीजगणित व भूमिती श्री एस एस सोनुने सर यां गुरुजींनी शिकवले.यां आदरणीय गुरुजींच्या मार्गदर्शनाने हायस्कूलच्या शिक्षणाला अर्थात उच्च प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात झाली ते दहावीपर्यंत.या सहा वर्षाच्या पर्वामध्ये,जिवलग मित्र मिळाली. उत्तम मार्गदर्शन करणारे शिक्षकवृंद लाभले.हळूहळू मनातील हायस्कूल, शिक्षकवृंद त्यांची कडक शिस्त याविषयींची भीती कमी झाली. कारण शिक्षक हे आपल्या जीवनात अत्यंत मोलाची भूमिका निभावतात.त्यांचा राग,शिस्त यापाठीमागे त्यांची तळमळ असतें.त्यांच्या मनात एकमेक अशी भावना असतें कीं, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने यशाचा शिखर गाठवा. तो जीवनात यशस्वी व्हावा. अन हो! माहितीये विदयार्थी जर एखाद्या मोठ्या पदावर गेला. यशस्वी झाला तर, शिक्षक गर्वाने सांगतात,कीं, हा माझा विध्यार्थी आहे. तेव्हा त्यांची छाती गर्वाने फुलून येते.
मित्रांनो!याच हायस्कूल मधील इयत्ता पाचवीतील प्रवेश,शाळेचा भव्य परिसर,मैदान यांनी शिक्षणाची गोडी अजूनच वाढवली.इंग्रजी,हिंदी, चित्रकला सारखे विषय व त्याचबरोबर मन मिळावू गुरुजन वर्ग व त्यांच्या हसत-खेळत शिकवण्यातून व मार्गदर्शनातून वर्ग दहावीपर्यंत बरंच काही शिकायला मिळाले.त्यातून जीवनाचा कायापालट झाला.जीवनातील सुखं दुःख,संघर्षावर ध्येर्याने कशी मात करायची याविषयीची भक्कम अशी ज्ञानाची शिदोरी सोबत घेऊन भविष्याची वाट चालतोय.
समस्त गुरुजनांना समर्पित...!

Post a Comment
0 Comments