जि प मराठी प्राथमिक शाळेतील वर्ग चौथीतील अतिशय आवडणारा विषय म्हणजे शिवछत्रपतींचा इतिहास.महाराष्ट्राचेच नव्हेतर सकल हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी राजे यांच्या जीवन वृत्तांत विषयी महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक मंडळांनी अभ्यासक्रमाचा विषय म्हणून मागील पंचेचाळीस वर्षापासून समाविष्ट केला आहे.परकीय आक्रमणापासून अखंड हिंदुस्थानातील छोटी-छोटी संस्थाने हव्याशा पोटी अमिषाला बळी पडून त्यांनी परकीयांना येथे वास्तव्य दिले.परकीयांनी त्यांच्या धर्मांध वृत्तीमुळे हिंदू धर्मावर अत्याचार करावयास सुरुवात केली.हिंदुस्थानाला परकीयांचे ग्रहण जवळपास दहाव्या ते अकराव्या शतकात लागले व हळूहळू त्यांनी समस्त हिंदुस्थान खिळ खिळ करून सोडला.तब्बल पाच ते सहा शतक हिंदुस्थानात या काळात हिंदूंना जागृत करण्यासाठी संतांची भूमिका महत्त्वाची ठरली. महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांमधील संतांनी हिंदू जागृतीचे कार्य केले. वेळप्रसंगी बलिदानही दिले.मात्र सकल हिंदूंसाठी एक छत्री अंमल असणारा राजा नव्हता. सर्व संस्थाने विखुरलेली होती. राज्य-राज्यांच्या सीमारेषा ठरलेल्या नव्हत्या.जो तो आप-आपला खंड,भूप्रदेश वाचवण्याचा प्रयत्न करायचा.मात्र इतर हिंदूंवर अन्याय अत्याचार होतो आहे का? आया-बहिणींवर अत्याचार होतो आहे का? शेतकरी शेतसारा अतिरिक्त कर याने ग्रासला आहे का? व्यापार -उद्योगधंद्यावर अतिरिक्त कर लादले गेले आहे का? त्याचबरोबर गोरगरीब जनता हवालदिल झाली का?अशा या धार्मिक अस्तित्व कोणाच्या लक्षातच आले नाही. सर्व समाज, जनता, संस्थानेट जणू मेलेल्या मढ्यागत निपचित पडलेली होती. याच मढ्यामध्ये नव-संजीवनी ओतण्यासाठी माँ जिजाऊच्या पोटी जन्माला आला एक सूर्य तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा.याच शिवछत्रपतींचा इतिहास आमच्या बालवयात आम्हाला आमच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता चौथीतील परिसर अभ्यासातंर्गत येणाऱ्या चौथीच्या इतिहास या पुस्तकातून शिकायला मिळाला.आतापर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकातील सर्वात आवडीचं आणि प्रिय पुस्तक म्हणजे "शिवछत्रपती". या पुस्तकाचं मुखपृष्ठ एवढं छान आहे की, हातात घेतलं की,एक वेगळी शक्ती निर्माण व्हायची.इतर पुस्तके तर विद्येचे रूप होतीच मात्र, हे पुस्तक म्हणजे दिव्यतेचं प्रतिक होतं. हातात घेतल्यावर दर्शन घेण्यासाठी कपाळापर्यंत नेल्याशिवाय कधी पान उकललंच नाही.या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेतील प्रथम धडा म्हणजे,शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र".छत्रपती शिवरायांच्या जन्मा अगोदर सर्वत्र संस्थाने,राजेशाही यांचा अंमल होता.संस्थानीक,राजे जनतेच्या हितापेक्षा चैन विलासात मग्न होते आणि याच संधीचा फायदा घेऊन मुघल उत्तरेकडून भारतात आले. त्यांनी जनतेवर जुलूम केला.त्याला विरोध म्हणून संतांनी महत्त्वाची भूमिका बजावली.धर्मजागृतीचे कार्य केले.याविषयी "संतांची कामगिरी" या पाठात माहिती उल्लेखित आहे.सर्वप्रथम चक्रधर स्वामी यांनी महानुभव पंथांची स्थापना करून मानवतेचा संदेश दिला. संत नामदेव यांनी विठ्ठल भक्तीमार्गातून समाज प्रबोधन केले. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी धार्मिक रुढी परंपरेवर कराडून विरोध केला.गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरीची निर्मिती केली व जगाच्या कल्याणासाठी परमेश्वरा जवळ दान मागितले. संत ज्ञानेश्वर महाराजांची विठ्ठल भक्तीची परंपरा कायम ठेवून संत एकनाथांनी अभंग,ओव्या,भारुडे या माध्यमातून समाज प्रबोधन केले. जातीभेदाला कडाडून विरोध केला. त्यानंतर छत्रपती शिवरायांचा काळात जगद्गुरु संत तुकाराम यांनी शक्ती बरोबर भक्तीचे महत्त्व सांगून शिवरायांच्या राज्यकारभारामध्ये तरुणांना मावळे म्हणून स्वराज्यासाठी लढण्याचे बळ दिले व संत रामदासांनी मनाचे-श्लोक, दासबोध यातून मनुष्याने कसे वागावे याची जाणीव करून दिली.
शिवछत्रपती या पुस्तकातील तिसरा पाठ म्हणजे मराठा सरदार व कर्तबगार भोसले घराणे गुरुजींनी छान हसत-खेळत पद्धतीने शिकवून इतिहासाची जाणीव करून दिली. छत्रपती शिवरायांचे भोसले घराणे.त्यांच्या घराण्यातील कर्तबगार व्यक्ती म्हणून वेरूळचे भोसले घराणे त्यापैकी विशेषतः शहाजीराजे भोसले यांच्या विषयी माहिती व घृष्णेश्वर मंदिर याविषयी माहिती दिसून येते. गुरुजींनी छान -छान गोष्टीच्या रूपाने समजावून सांगितले व इतिहासाची गोडी लावली.छत्रपती शिवरायांचे बालपण हा चौथा धडा.यामध्ये छत्रपती शिवरायांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झालेला जन्म,त्यांच्या बालपणीतील आठवणी व माँ जिजाऊंनी बाल शिवरायांना महाभारत, रामायण यातीलगोष्टी सांगितल्या.त्या शौर्य कथा शिवरायांना राजकारभारा मध्ये उपयोगी आलेल्या आपणांस दिसून येतात.शिवरायांचे सवंगड्यांसोबत सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातील खेळणे, बागडणे याचा उल्लेख आहे.त्यानंतर बाळराजे व मा जिजाऊ कर्नाटकात दाखल झाले. याविषयी वर्णन आहे. कर्नाटकात शहाजीराजेंच्या देखरेखीखाली शिवरायांना शिक्षण देण्यात आले. मात्र दोन अडीच वर्षातच कर्नाटकातून माँ जिजाऊ व शिवबा पुणे येथेआले. त्यांनी लालमहल येथे वास्तव्य केले. राजकीय शिक्षण घेतले. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाने युद्ध प्रशिक्षण घेतले, त्यानंतर शिवरायांचा विवाह झाला व वयाच्या 15 व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मावळे जमवले. प्रथम तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गनिमीकावा युद्ध पद्धतीचा वापर करून स्वराज्याची घोडदौड सुरू केली. गुरुजींनी सांगितलेल्या शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्रातील परिस्थिती व जनतेवर होणारे अन्याय अत्याचार त्यामुळे डोळे भरून यायचे. मात्र शिवरायांचा जन्मानंतर,स्थिती बदलली. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली.जनतेला न्याय मिळवून दिला..तेव्हा मात्र खूप छान वाटले..आनंद वाटला व पुढील इतिहास वाचनाची ओढ लागली.गुरुजींनी पुढील पाठ शिकवण्या अगोदरच शिवरायांचा इतिहास भरभर वाचून काढला एवढी गोडी व ओढ या पुस्तकाची लागली.
छत्रपती शिवरायांची कर्तबदारी वाचता-वाचता, या महान राजाच्या आयुष्यात एवढी संकटे असू शकतात याची जाणीव झाली.आठवा पाठ वाचताना ते लक्षातआले.शिवाजी राजे यांना परकींयाबरोबर स्वकींयासोबतही लढा द्यावा लागला. मेहुणा, सावत्र भाऊ, त्याचबरोबर जावळीचे मोरे सरदार यांचा बंदोबस्त करावा लागला.त्यांना स्वराज्याचे महत्त्व समजावून सांगावे लागले. त्याचबरोबर अफजल खानचा वध करून धर्मावरील व आया बहिणीवर संकट दूर केले. हे प्रतापगडावरील पराक्रम यात गुरुजींनी नव्या पाठातून शिकविले. छत्रपती शिवरायांचे सहकारी मित्र,मावळे, सरदार शिवाजीराजे साठी मरायला सुद्धा तयार व्हायचे त्यातील जिवंत उदाहरण म्हणजे बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशीद यांच्या पराक्रमाची जाणीव शर्थीने खिंड लढवली यातून झाली. जीवनात सच्चे मित्र किती महत्त्वाचे याची ओळख पटली.त्याचबरोबर छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानाची हाताची बोटे कापून कशी फजिती केली हे अकराव्या पाठात शिकलो.तेव्हा मात्र हसायला आले, कारण छत्रपतींनी शाहिस्तेखानाची चांगलीच फजिती केली होती व त्याची खोड मोडली होती.. या सर्व घटनेतून शिवरायांचे प्रस्थ वाढत होते. सर्व मुस्लिम राजवटीवर वचक बसला होता. मात्र कर्नाटकातून दुःखद बातमी आली की शहाजीराजे यांचे निधन झाले. तेव्हा मात्र छत्रपती शिवाजी राजे व मातोश्री जिजाऊ माँ साहेब दुखी झाले.त्याच संधीचा फायदा घेऊन मिर्झा व दिलेरखानने पुरंदरला वेढा दिला. मोरारजी सारख्यांनी पराक्रम गाजविला मात्र युद्धात एक -एक सैन्य कामी येईल म्हणून त्यांनी मिर्झासोबत पुरंदरचा तह केला करण्याचे ठरवले. या तहात शिवरायांना खूप झळ सहन करावी लागली. लाखोंची खंडणी व तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले.धूर्त मिर्झाने शिवरायांसोबत खेळी केली त्यांना आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला बोलावले.त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. पण राजे जुमानले नाही म्हणून, त्यांना कपटी वृत्तीने आग्रा येथे नजर कैदीत ठेवले.मात्र शिवाजी राजे सीताफिने बादशहाच्या हातावर तुरी देऊन पेटार्यातून प्रसार झाले. वेशांतर करून मायभूमी कडे परतले.या पाठातून छत्रपती शिवाजीराजेच्या प्रति आदर वाढत गेला व शिवरायांच्या कर्तुत्वाची व शौर्याची जाणीव झाली.
तानाजी मालुसरे सारख्या निष्ठावंत सरदारांने जीव गमावून कोंढाणा जिंकून दिला व स्वराज्याची तहामुळे विस्कटलेली घरी नीट बसवली.हे "गड आला पण सिंह गेला" यातून शिकलो तेव्हा मात्र डोळ्यातून अश्रू टपकले. राजे छत्रपती झाले.हा अभूतपूर्व सोहळ्यातून ज्ञात झाले.वाचता-वाजता डोळ्यातून आनंदाश्रू खळखळ होऊ लागले. राजे स्वराज्याचे छत्रपती झाले. यातून शिवरायांच्या कर्तुत्वाची ओळख सर्व जगभर पसरली. छत्रपती शिवरायांनी स्वतःचे चलन, मुद्रा,मंत्रिमंडळ, राजकारणाची घडी बसवली. अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून,संरक्षण व्यवस्था, मराठ्यांचे आरमार,किल्ले, हेरखाते, मुलकी व्यवस्था अश्या सर्व नियोजनबद्ध राजकारभाराची उभारणी केली. छत्रपती शिवराय यांनी दक्षिण दिग्विजय मोहीम गाजवली. जिंजी जिंकली. सावत्र भाऊ व्यंकोजीची समजूत काढली.मोहिमांवर-मोहिमा,दगदग यामुळे राजेंचे स्वास्थ बिघडू लागले.या दगदगीतून वयाच्या पन्नासव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.या रयतेच्या राजाचा जीवन वृत्तांत पाठ्यपुस्तकात अगदी ओझरता होता. मात्र या एवढ्याश्या पाठय पुस्तकातून राजेंचा जीवनसंघर्ष लक्षात आला. शिवरायांची युद्धनीती, राज्यकारभार,जनतेवरील प्रेम आया -बहिणींचा सन्मान,स्वराज्य प्रेम अश्या अनेक घडामोडीतून इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातून शिकवलेला शिवरायांचा जीवन वृत्तांत अजूनही कायम स्मरणात आहे.
मित्रांनो!राजे छत्रपतींच्या जीवनावर आधारित शिवछत्रपती हे परिसर अभ्यास अंतर्गत येणार इतिहासाचं हे पुस्तक सन 1970 पासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने वर्ग चौथीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे.आज सन 2025 पर्यंत जवळपास 45 वर्षाचा कालखंड ओलंडला असून, लाखो विद्यार्थ्यांनी हे पुस्तक अभ्यासलं. छत्रपती शिवरायांना जाणून घेतलं.खरं सांगा मित्रांनो, वर्ग पहिलीपासून ते दहावीपर्यंत,बारावीपर्यंत शिक्षण घेतले कितीतरी पुस्तके शिकता-शिकता वाचली त्यांच मुखपृष्ठ व मलपृष्ठ स्मरणात आहे का?मात्र असा एकही जण नसेल कीं,चौथीतील शिवछत्रपती हे पुस्तक ज्याच्या स्मरणात नाही.मुखपृष्ठ मलपृष्ठतर नाहीतर,शिवरायांच्या संघर्षाची कहाणी सांगणारं हे पुस्तक प्रत्येकाच्या स्मरणातआहे.त्यातील एक-एक ओळी व एक -एक पान हे त्यांच्या जीवनातील संघर्ष,समर्पण याचीसाक्ष देतं.रयतेबद्दलचं प्रेम,स्वराज्याबद्दलची निष्ठा,महिलांचा मान- सन्मान,स्वच्छ कारभार,मित्र-प्रेम हे सर्व काही शिकवते. हे पुस्तक केवळ एक पुस्तक नव्हे तर, आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी भूतकाळातील गोष्टींवरून भविष्याचा वेध घेण्यास शिकविणारं ज्ञानसेतू आहे.आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कसा संघर्ष करावा करावा यासाठी उत्तम मार्गदर्शक आहे.
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ ता जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments