शाळेत गुरुजी सकाळच्या प्राथने नंतर अर्धा तास शाळेच्या प्रांगणातच नीतिमुल्याचा पाठ घेत असत.त्यामध्ये सुविचार,बातम्या, दिनविशेष,दररोज नवीन बोधकथा सांगायचे त्यातून काय बोध शिकायला मिळेल हे सुद्धा सांगायचे.दुसरी-तिसरीत जोडाक्षरासह माय -मराठीचं वाचन करायला शिकलो.पहिली दुसरीत कथा फक्त ऐकायचो.कारण वाचायला फारसे जमत नव्हते.मात्र ऐकायला खूप छान वाटायचं.जस-जशी अक्षरांची ओळख होऊन वाचायला यायला लागलो. तस तशी वाचनाची गोडी लागली.वाचनाची गोडी लागण्याचं कारण असं की,काही गमतीदार, मनोरंजनपर,रहस्यमय कथा. या कथा गमतीदार कथा गंमत म्हणून वाचल्या तरी, त्यामधून खूप गहन अर्थ निघायचा. तो आजही लक्षात आहे.शाळेत शिकतांना वर्ग तिसरीमध्ये छान-छान गोष्टीचे पुस्तक बाजारातून घेतलं.त्यामध्ये रामायण, महाभारत यातील सुंदर कथा होत्या.त्या छान-छान गोष्टीच्या पुस्तकांमधील या कथा आम्ही पोरं वाचायचो. त्यातून आनंद मिळायचा व बोधही मिळायचा.
बोधकथेतील कथा ज्यामध्ये अकबर-बिरबल च्या कथा होत्या अकबर बिरबल च्या कथा ह्या कथा ह्या चतुर कथा म्हणून प्रसिद्ध आहे. कारण अकबराच्या दरबारामध्ये बिरबल हा अति कुशाग्र बुद्धिमत्तेचा प्रधान होता. तो एखादा कठीणातला कठीण विषय अगदी सोप्या पद्धतीने कसा करता येईल.अशा कल्पना सुचवायचा. त्यामुळे राजकारभारामध्ये त्याचा उपयोग व्हायचा. वास्तविक पाहता बिरबल हा अकबरच्या दरबारात एक मंत्री नोकरी करत होता.मात्र त्याच्या बुद्धी -कौशल्यामुळे त्याच्या शब्दाला मान होता. अर्थात मनुष्याच्या संपत्तीपेक्षा ज्ञानाला महत्त्व असतं हे त्यावरून सिद्ध होतं.म्हणून कुठलेही कार्य करताना ते सफाईदार कसे करता येईल अशा स्वरूपाच्या बोधकथा शालेय जीवनात वाचल्यामुळे भविष्यात विद्यार्थी त्या पद्धतीने नियोजन करतात व यश संपादन करतात म्हणून बालवयातील कथा या नुसत्या कथा नसतात तर भविष्यात जगण्यासाठी नीतीमूल्याचा शिक्षण देणारं एक माध्यम असतं.
बाल वयात विशेषतः मनोरंजनपर कथा आम्हां मुलांना आवडायच्या. त्यामध्ये विशेषता रहस्यमय कथा, सामाजिक कथा, विनोदी कथा, पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा या प्रकारातील कथा असायच्या.या कथा ऐकल्या व पुस्तकात वाचल्या त्यातील रहस्यमय कथा जसे की,सोन्याचा-खजिना, दृष्टाचा अंत, जादूची छडी या कथेत शेवटपर्यंत काय घडेल? याची आतुरता लागलेली असायची. त्यातून कळायचं कि, एखाद्या ठिकाणचं एखाद्या व्यक्तीला तेथील वस्तू विषयी गूढ रहस्य माहीत असतं.तो त्याचा आयुष्यात लोकांना बोध करू शकतो. त्याचा उपयोग जीवन विकासासाठी करू शकतो. अथवा समाज विकासाठी सुद्धा करू शकतो. मनोरंजन कथेत लेखक आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना टिपत असतो. तो त्यात त्याच्या कल्पनेची सांगड घालतो.त्यातून आम्हा मुलांचे मनोरंजन व्हायचे. कथानकातील पात्र कशा पद्धतीने स्वतःचा बचाव करते किंवा कथेतून मुलांना कशाप्रकारचा बोध देता येईल हे दाखवलेलं असतं. जसे की आजीबाईच्या गोष्टीतील भोपळ्याची गोष्ट, लबाड कोल्ह्याची गोष्ट. अशा कथेतून म्हातारी आजी राक्षसाच्या तावडीतून सुटण्यासाठी कशी शक्कल लढवते व लबाडकोल्हाची कशी फजिती होते याचे मनोरंजनातून आम्हांला शिकायला भेटले. आजीबाईच्या कथा वाचताना आपल्या स्वतःच्या आजीबाईची आठवण यायची. आपली आजीपण तीच्या काळातील काही काही गोष्टी सांगायची. तेव्हा आम्हीमुलं आजी समोर बसून अगदी निमुटपणे ऐकायचो.आजी तिच्या काळातल्या गोष्टी सांगायची तेव्हा,म्हणायची "आम्ही लहान होतो तेव्हा....! अन गोष्टीं सांगायला सुरुवात करायची. आजीच्या गोष्टीं लिखित स्वरूपात नसल्या तरी आयुष्यात घडलेलं सुखदुःख ती सांगायची तेव्हा कधी हसायला तर कधी रडायला यायचं. कारण गरिबीचाकाळ, हालाखीची परिस्थिती, खेड्यातील लोकजीवन,अशा स्वरूपाच्या जीवनाबददल गोष्टी सांगायची तेव्हा मात्र निश्चितच असावांनी डोळे भरून आल्याशिवाय राहत नव्हते. कारण आजीचा एक तासाचा सहवास,जुन्या आठवणी, जुन्या गोष्टी म्हणजे कथेचं एक पुस्तक वाचल्यासारखं वाटायचं.
शाळेत अभ्यासक्रमातही मनोरंजनातून बोध देणाऱ्या कथा होत्या. अतिवैचारिक व तत्व चिंतनपर पाठ वाचून-वाचून कंटाळा आल्यावर कुठेतरी मनोरंजनातून आम्हाला उत्साहित करण्यासाठी विनोदी कथाही पाठ्यपुस्तक मंडळांनी अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या होत्या. जसे की, विसरभोळा गोकुळ,ही कथा बालभारतीच्या इयत्ता सहावीतील राम गणेश गडकरी यांच्या "प्रेमसंन्यास" या कादंबरीतील होती. या गोकुळ हा विसरभोळा असल्यामुळे त्याला सांगितलेल्या कामाची अजिबात आठवण राहत नाही.त्यामुळे त्याच्या आयुष्यात अनेक विनोदी प्रसंग घडतात. त्याचबरोबर एक होता बाळू. या कथेमध्ये बाळूला जेवढे सांगितले तेवढेच तो करायचा. कथेच्या सारांशा नुसार बाळू घोडा डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करतो. खिडकीतून एक मुलगी त्याला बघते. त्याच्याकडे बघून हसते. ती मुकि असते मात्र त्याच्या या गमतीदार कृत्या वर हसायला व बोलायला लागते. त्यामुळे सांगकाम्या बाळूला घोडा व फेटा बक्षीस म्हणून मिळतो. तो घोड्यावर बसून घरी येतो. आई खुश होते.अर्थात जरी कथा ही काल्पनिक असली तरी, आम्हा मुलांच्या मनाला या कथा मनोरंजनातून बरंच काही बोध मिळायचा.त्याचबरोबर "नुसती उठा-ठेव" यातून एका माकडाची शेपूट लाकडाच्या फटीत अडकून कशी फजिती कशी होते याचं वर्णन केलेलं आहे. शालेय जीवनामध्ये या कथा अजूनही स्मरणात आहेत.
विनोदाबरोबरही काही पौराणिक,देवी देवतांच्या कथा,दंतकथा आम्ही ऐकायचो व वाचायचो.या छान छान गोष्टीच्या पुस्तकातील कथासुद्धा खूप रंजक होत्या.जरी अभ्यासक्रमात त्याचा समावेश नसला तरी,आई-बाबा बाजारातून आम्हां मुलांसाठी गोष्टीचे पुस्तक आणायचे.अभ्यासक्रमाबरोबर रामायण, महाभारत, यातील कथा वाचून आनंद व्हायचा. त्याचबरोबर तथागत गौतम बुद्धांच्या काही उपदेशपर कथाही जीवनात अजूनही कायम स्मरणात आहेत. "तोडो नही जोडो" या हिंदी विषयातील कथेतून तथागत गौतम बुद्ध अंगुलीमाल सारख्या महाभयंकर दरोडेखोरवृत्तीच्या व्यक्तीला त्यांच्या उपदेशातून सन्मार्ग कसा दाखवतात.या कथांचं स्मरण झाल्यावर अजूनही भरकटलेलं मन सुविचारांकडे धावते.तेव्हा त्या कथेचा स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. त्या कथांचा मानवी जीवनाशी संबंध होता.अहो अगदी छोटीसा बोध असा कि,"लोभाचे फळ"किती वाईट असते वाईट असते. हे आपल्याला इयत्ता दुसरी-तिसरी मध्येच गुरुजींनी "सोन्याची कोंबडी" या कथेतून सांगितलं. मात्र मानवी स्वभाव किती विचित्र आहे.वयाच्या तिशी व चाळीशीतही त्याचे मर्म कळत नाही. लोभापायी कितीतरी वाईट कृत्य करतात. भ्रष्ट वृत्तीला बळी पडतात. की जे,आपण वयाच्या आठ ते दहाव्या वर्षी शाळेत शिकलो.बोध घेतला.तरीही आपण जीवनात सुविचार अवलंवत नाही.हल्ली आपण बघतो.समाज प्रबोधन कार्यक्रम जसे की,कीर्तन,व्याख्यान,भाषण ऐकतो. त्यामध्ये तरी काय वेगळे सांगतात..तेच ना...!की जे, आपल्या आदरणीय गुरुजींनी आपल्या शालेय जीवनात शिकवले.शाळेतील पुस्तकांच्या पानापानात ज्ञानाचा साठा भरलेला होता त्यामध्ये कथा, कविता, ललित,लेख,अभंग भारुड यासारखे बोधपर साहित्य आपण बालवयातच ऐकले. वाचले. त्यामध्ये आपल्या उज्वल भविष्यासाठी आदरणीय कवी,साहित्यिक, लेखक यांनी ज्ञान अमृतरसाचा साठा भरून ठेवला होता.सारं जीवनाचे मर्म त्यात दडलेलं होतं.पण दुर्दैव असं की,त्या ज्ञानमयकुंभातील रस आपण योग्यवेळी प्राशन केलं नाही. मात्र ज्यांनी तो "ज्ञानमय अमृतरस" प्राशन केला त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं.
मित्रांनो!शालेय जीवन बालवयात पुस्तकांच्या ओझ्याखाली अन शिस्तीच्या निश्चित नियमांच्या चौकटीतील असलं तरी पुस्तकातील या बोधपर कथा आपल्या जीवनात पावलोपावली उपयोगी ठरणाऱ्या असतात. मन देऊन ऐकलेल्या,वाचलेल्या कथा,निती मूल्यांचे शिक्षण देणाऱ्या बोधपर कथा यांची एका विशिष्ट वयात पोहोचल्यावरही त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जरी तुम्ही भले मोठे ग्रंथ,कादंबरी,वाचल्या नाही तरी त्या बालवयातील कथा व त्यातील बोध तुम्हाला वाईट मार्गाचा अवलंब करून देणार नाही एवढी शक्ती त्या पाठ्यपुस्तकात व कथेतील बोध व नीती मूल्यांमध्ये दडलेली असते.
समस्त गुरुजणांना समर्पित....!
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा
.jpeg)
Post a Comment
0 Comments