Type Here to Get Search Results !

रफवही-शालेय आठवण



रफवही विषय अगदी साधा आहे. विचार केला तर,अगदी सामान्य परंतु गहन विचार केला तर असामान्य आहे. नव्वदच्या दशकातील शिक्षणासाठी धडपडणाऱ्या आमच्या पिढीला खरंच खूप अडचणीचा सामना करावा लागला.त्या काळातील आई-वडिलांच्या गरीबीमुळे ज्यांना शिक्षण घेणं कठीण होतं त्यांना शासकीय शाळेतील शिक्षण हे अगदी निशुल्क असल्यामुळे जणू वरदान होतं. कारण सर्व गोर-गरिबांचे पोरं शाळेत जायचे अन मन लावून अभ्यास करायचे.त्यात मुलेही अगदी समजूतदार होती.आई-वडिलांकडे काही न मागता, निमूटपणे आपल्या साध्यासुद्या गोष्टीत समाधान मानायचे. महागडे कपडे लत्ते, पुस्तकं, चप्पल असली किंवा नसली तरी हरकत नाही. पाठीवरचं दफ्तर नसलं तर साध्या वावरातील बियाण्याच्या पिशवीत पुस्तकं कोंबले कि, शाळेत जायचो.फापटपसारा नव्हताच मुळी...! अन हो!आई बाबांचं आर्थिक संतुलन बिघडेल असं कधी मागत नव्हतो. ना कधी हट्ट करत नव्हतो.आणि मागतील तर काय! उघड्या डोळ्यांनी आई-वडिलांचे दारिद्र्य बघत होतो.बापाच्या फाटलेल्या बनीयानच्या भोकातून उघड शरीर आम्ही पोरांनी बघितलंयं अन माचं दोन लुगडे कापून त्याला दांड भरून त्याचं एक लुगडं शिवून घालणारी माय आम्ही बघितली. सांगा! त्या मायबापाकडे सुखाच्या आणि चैनीच्या वस्तूंच्या मागण्या कशा करायच्या? कदाचित! त्या विधात्यानेच अशी समजदारी वृत्ती आम्हा मुलांमध्ये भरून दिली असावी अन त्याची शिकवण अशी कि, बाळा,तुझे मायबाप तुझ्यासाठी सर्वस्व आहेत.गरीब असले तरी असले त्यांना त्रास होईल असं वागू नको.ही सर्व त्या विधात्याचीच कृपा...!

 शालेय जीवनातही आम्हांला खूप समजदार गुरुजी लाभले.कारण त्यांनीही गरिबीचे चटके सहन केलेले असावेत. या भौतिक गोष्टींकडे लक्ष न देता केवळ ज्ञानदानावर भर द्यायचे. आमच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असे.ज्ञानदान आणि शिस्त हाच त्यांचा शिक्षणाचा पाया होता.प्राथमिक पहिली ते चवथीच निम्न प्राथमिक जि प च्या शाळेत पूर्ण केल्यावर,इयत्ता पाचवीपासून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकायला गेलो.पाचवी मध्ये विज्ञान विषय होता. विज्ञान विषयाचे शिक्षक आदरणीय श्री आर पी सोनुने गुरुजी होते.त्यांची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी होती. शिकवतांना पुस्तक हाती कधी घेत नसत.वर्गानुसार विषयातील घटक-उपघटक फळ्यावर खडूने लिहिला की,त्यांची शिकवायला सुरुवात शिकवायला सुरुवात व्हायची. उदाहरणार्थ.विज्ञानातील मानवी शरीर हा घटक शिकवायचा असेल तर, गुरुजी फळ्यावर मानवी शरीर लिहायचे व त्यातील उपघटक म्हणून,"मानवी शरीराचे अवयव"शिकवायचे असल्यास वहीमध्ये त्याप्रमाणे लिहायला सांगायचे.या मानवी शरीराच्या उपघटकातील मानवी शरीराचे अवयवाचे व मानवी शरीराचे सुंदर स्पष्टीकरण करून सांगायचे. उदा. डोक्यापासून सुरुवात केल्यास त्यातील "डोळे"मुद्दा हा अवयव घेतल्यास, डोळे म्हणजे काय? डोळ्याचे कार्य कोणते?त्याची रचना कशा प्रकारची असते. डोळ्यांना होणारे आजार व आजारावरील उपचार पद्धती अशी विस्तारित माहिती सांगायचे.त्यानंतर डोळ्याची निगा कशी घ्यायची.अश्या अनेक बारीक सारीक गोष्टींचे ज्ञान आम्हां मुलांना अगदी हसत खेळत शिकवायचे.जरी पाचव्या वर्गाच्या पुस्तकातील अभ्यासक्रमात एवढी माहिती नसली तरी, गुरुजी सखोल माहिती सांगायचे.त्यामुळे घटक- उपघटक समजण्यास मदत व्हायची.दैनंदिन जीवनात वावरतांना शारीराचे अवयवाचे कार्य, महत्व निगा घेतांना गुरुजींची वेळोवेळी आठवण यायची.आजही येते.

 गुरुजी शिकवतांना आम्हा मुलांना एक वही व प्रेम सोबत ठेवायला सांगायचे. जे शिकवलं त्याची वेळोवेळी वहीमध्ये नोंद ठेवायला सांगायचे.मग ही वही कोणती होती तर ती म्हणजे "रफवही"...!". हल्ली बाजारात या रफवह्या खूप उपलब्ध आहेत. "पैसे द्या व रफवही घ्या" परंतु आमच्या आर.पी.गुरुजीची रफ वही अगदी वेगळी होती. पूर्ण बिनखर्चिक...! त्यांचा साधेपणा मात्र,शिक्षणाचा दर्जा त्याहीपेक्षा उच्च होता. गुरुजी म्हणायचे घरून रफवही बनवून आणा.मग ती कशी बनवायची? तर गुरुजी सांगायचे, मागील वर्षाच्या सर्व विषयाच्या वहीतील सर्व कोरे कागद फाडा.ते सर्व एकत्रित जमा करा. त्याचा आकार लहान मोठा असला तरी हरकत नाही. त्याला सुई-दोऱ्याने टाके मारून शिवून घ्या. अन हि रफवही माझ्या विज्ञान विषयासाठी वापरा.गुरुजी म्हणत,"मी जे वर्गात फळावर लिहून देईल त्याची नोंद ठेवा. वही कशीही असो.आपले लिखाण महत्वाचे. त्याचबरोबर शिकवलेलं तुमच्या लक्षात येणे हे त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे. सगळ्यांचे आई-बाबा अगदी गरीब आहेत ते काबाडकष्ट करतात. त्यांना उगाच आपल्यामुळे त्रास नको." बाप रे बाप! एवढे प्रगल्भ विचार. थोडक्यात म्हणजे, त्यावेळेस शिक्षणाला महत्त्व होते. या भौतिक गोष्टी,हा इतर गोष्टीचा फाफटपसारा नव्हता.

 गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे आम्ही मुले मागील वर्षीच्या जुन्या वह्या जमा करायचो.त्यातील सर्वात शेवटी उरलेले कॊरे पानं व्यवस्थित फाडून घ्यायचो.सर्व वह्यातील पाच-दहा,पाच-दहा कोरे पानं जमा करून ते सर्व एकत्रित करायचो.त्यातील काही कमी जास्त असले तरी, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्याला एका सरळ रेषेत लावायचो व मायच्या गोधडी शिवायच्या सुई- दोऱ्याच्या डब्यातून सुई दोरा घ्यायचो व छान एका रेषेत शिवायच्या दोऱ्याने टाके मारायचो.रफवहिला घट्ट आवळून छान बांधून घ्यायचो.जेणेकरून पाने एकमेकापासून विलग होणार नाही.पहिल्या पानावर पेनने रफवही, विषय-विज्ञान लिहायचो व खाली विषय-शिक्षक म्हणून श्री.आर पी सोनुने गुरुजी असं लिहायचो.आजूबाजूला स्केचपेनने दोन-चार फुले काढायचो. त्यामुळे आमची रफवही अजूनच आकर्षक दिसायची.खरंच! कीती साधेपणा होता ना! जगण्यातला आणि शिक्षण घेण्यातला सुद्धा..! अगदी थोड्या-थोड्या गोष्टीत समाधान मानायचो. अन तेच कौतुक डोक्यावर घेऊन नाचवायचो.

 मित्रांनो!विचार केल्यास रफवही अगदी साधा विषय आहे.मात्र त्या रफवहीत गुरुजींची विद्यार्थ्यांचा गरीब आई-वडिलांच्या भावना होत्या.त्याच्यावर खर्चाचं ओझं नको.अगदी छोटा अन सूक्ष्म विषय आहे ना खरंच परंतु ज्याने जो अनुभवला त्यालाच कळतो.शिक्षणासाठी जास्त फाफटपसारा नको.अगदी साधेपणातून अन कमी खर्चातूनही तुम्ही कसं शिक्षण घेऊ शकता. हे त्याचं जिवंत उदाहरण आहे.त्यासाठी केवळ तुमची ज्ञान प्राप्त करून घेण्याची जिद्द हवी.ज्ञान मिळवण्यासाठी मनापासून तळमळ होईल.मग, ते तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मिळवू शकता.तुम्हाला ज्ञानाची कडाडून भूक लागायला हवी. त्याचबरोबर ज्ञान देणारे गुरुजी ही त्याच पात्रतेचे हवे.अगदी निस्वार्थ, समजदार,व इतर गोष्टीपेक्षा फक्त ज्ञानाचे मनापासून बाळकडू पाजणारे हवे.त्यातील आमचे गुरुजन वर्ग होते

      अशी ही रफवही सदैव स्मरणात राहील.कारण ती आमच्यासाठी सामान्य नव्हती.तर अतिशय असामान्य होती. कारण ती अनेकांच्या भावनांशी जुळलेली होती.

 समस्त गुरुजींना समर्पित...!

श्री विनोद शेनफड जाधव

मासरूळ जि.बुलडाणा 

Post a Comment

0 Comments