"अनचारेन मालिन्यम अत्याचारेन मूर्खता | विचाराचारयोयोर्ग: सदचार: स उच्यते ||"अर्थात आचार हिनतेमुळे जीवनास मालीन्य तर आचारधित्यामुळे मूर्खता येते. आचार व विचार यांचा सुंदर मेळ म्हणजे सदाचार होय. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीते म्हणतात," यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥" जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी अर्थात अधर्म बोकाळतो तेव्हा-तेव्हा तो अधर्म आचारणाऱ्या दृष्टांचा नाश करण्यासाठी मी युगानुरूप वारंवार अवतार धारण करेल. त्याचप्रमाणे ज्या काळात दैत्य दानवांनी अनाचार व अत्याचाराच्या रूपाने भूमीवर थैमान घातले त्या वेळी आदिशक्तीने दुर्गा रुपातील विविध अवतार धारण केले आणि सज्जनांची त्या दुर्जनांपासून मुक्तता करून सद्धर्म व सदाचार यांची तिने स्थापना केली. शक्ती देवीच्या महत्त्वकृत्याची दिव्य स्मरणगाथा म्हणून साजरा केला जाणारा दुर्गा महोत्सव भारतात कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रचलित आहे. वर्षभर विविध ऋतुकाळात संपन्न होणाऱ्या दुर्गा पूजेमध्ये शरद ऋतूतील अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत केला जाणारा नवरात्र महोत्सव विशेष प्रचलित व लक्षणीय आहे. आदिशक्तीनेच शारदीय महोत्सवाचे (महापूजेचे ) महत्त्व सांगताना दुर्गा सप्तशती ग्रंथातील बाराव्या अध्यायात बाराव्या श्लोकात म्हटले की, शरत्काले महापूजा क्रियते या च वार्षिकी। तस्यां ममैतन्माहात्म्त्यं श्रुत्वा भक्तिसमन्वित:।। अर्थात जो शरत्कालामध्ये वार्षिक महापूजा किंवा महोत्सव आयोजित करून त्याप्रसंगी देवीचे महात्म्य भक्ती भावाने ऐकेल त्याला सुख-समृद्धी लाभेल.
नवरात्रोत्सव संपूर्ण भारतातील बहुतेक कुटुंबात कुलधर्म स्वरूपात संपन्न होतो. हा महोत्सव नऊ दिवसांचा व रात्रीचा असल्यामुळे त्यास नवरात्र असे संबोधले जाते. या दिवसात संपन्न होणारी दुर्गापूजा आपापल्या कुलस्वामिनीच्या उदा. आई तुळजाभवानी,रेणुका माता,आई करवीर निवासिनी,आई एकविरा,आई कामाक्षी इ. स्वरूपात केले जाते. नवरात्रातील कथानकानुसार देवीने नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला, हेच महिषासुर सध्या कालात देखील मानवांच्या अंतर्मनात व वाईट कृत्यातून जसे की, भ्रष्टाचार, बलात्कार, व्यसनाधीनता, लुटारूवृत्ती, व्याभिचार, जातीय - धार्मिक दंगली अशा या विकार रुपाने कमी जास्त प्रमाणात थैमान घालत असून तेच मानवाच्या व समाजाच्या अधोगतीस कारणीभूत ठरत आहे. दुर्गा महोत्सवाचे औचित्य साधून याच वाईट प्रवृत्तीच्या महिषासुरांचा विनाश करायचा आहे. ज्याप्रमाणे नऊ दिवसांच्या युद्धानंतर देवी कडून महिषासुरांचे पारिपात्य झाले त्याचप्रमाणे आपल्यातील असुरांच्या नाशांची जिद्द मणि बाळगून नवरात्रीतील नऊ दिवस देवीच्या सानिध्यात मनोभावे आराधना केली असता हे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होते.
दुर्गा नवरात्र उत्सव काळात घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेचे मानवी जीवनामध्ये काय महत्त्व आहे किंवा ते मानवी जीवनाचे सूत्र कसे आहे ते सांगायचे झाल्यास नवरात्रात घट,नंदादीप,पुष्पमाला व बिजारोपण या चार महत्त्वाच्या गोष्टी असून त्या मानवी जीवनाशी एकरूप आहे जसे की,नवरात्रातील घटस्थापनेमध्ये प्रथम म्हणजे मातीचा घट. हा विकारवश व नाशवंत देहाचे प्रतीक आहे,अर्थात मातीच्या घटाप्रमाणे मातीतून निर्मिलेला व मातीतच विसर्जित किंवा विलीन होणारा मानवी देह नाशवंत आहे. परत मातीतून जसे पुननिर्माण ही सृष्टीचक्रातील वास्तविकता सूचित होते त्याचप्रमाणे मानवी देह हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो मात्र चैतन्य रुपी आत्मा अमर आहे.ज्याप्रमाणे घटामध्ये वरुणरूपी चैतन्याची स्थापना केली जाते, त्याचप्रमाणे मानवी शरीरामध्ये आत्मारूपी चैतन्य प्रस्थापित केले जाते. नवरात्रोत्सवातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंदादीप. नंदादीप हा ज्ञानमयी देवीचे प्रतीक आहे. अखंड प्रज्वलित राहणारा नंदादीप अंधकारावर मात करून चहुकडे प्रकाश पसरवत असतो त्याचप्रमाणे, ज्ञानाने मनुष्य प्रगल्भ होतो. अज्ञानरूपी अंधकारावर मात करून ज्ञानरूपी प्रकाशाची वाटचाल करतो तेव्हा, त्याला सत्याची जाणीव होते. सत्य शोधनानंतर मानवी जीवन विकसित होते,म्हणून ज्ञानरूपी नंदादीपाप्रमाणे, सतत ज्ञानाचे उपासक होऊन अज्ञानरूपी अंधकारावर मात करा.असे नंदादीपाप्रमाणे मानवी जीवनाचे सूत्र आहे. नवरात्रोत्सवातील तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुष्पमाला. ज्याप्रमाणे पुष्पमाला तयार करताना बागेतील अथवा परडीतील कीड लागलेली खराब झालेली फुले आपण बाजूला काढतो व छान,सुंदर, सुगंधित फुलांचा हार करून देवाला अर्पण करतो त्यामुळे, देवाजवळ वातावरण प्रसन्नमय होते, त्याचप्रमाणे वाईट कर्माचा त्याग करून सत्कर्म परमेश्वरास अर्पण करावे व पुष्पमालेचा सुगंध जसा इतरत्र पसरतो व सभोवतांलचे वातावरण प्रसन्नमय करतो, त्याचप्रमाणे आपल्या सत्कार्यांचा सुगंध चहू दिशा पसरावा. नवरात्रातील चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे बिजरोपण.घट व नंदादीप समीप एका पत्रावळीवर किंवा बांबूच्या बारीक काड्यांपासून बनवलेल्या दुरडीमध्ये काळी माती टाकून त्यामध्ये सप्त धान्य किंवा नव धान्यांचे बिजारोपण केल्या जाते.बिजारोपण हे नवनिर्मितीचे प्रतीक आहे बिजारोपण झालेल्या धान्यातून नवांकुरासारख्या जिवात्म्याचे उन्नयन होते, त्याचप्रमाणे जीवन जगत असताना नवनवीन काहीतरी शोध लावायला हवा, परंतु त्यातून समाज विघातक कार्य न घडता मानव हित व समाजहीत जोपासल्या जायला हवे. सृष्टीचा विध्वंस व्हायला नको म्हणून बिजारोपणाप्रमाणे नवनिर्मिती करायला हवी.
हिंदू धर्मातील सर्व जातीपातीमध्ये प्राचीन काळापासून चालत आलेला नवरात्र महोत्सव त्यांच्या - त्यांच्या पथेप्रथेनुसार साजरा केला जात असे.क्षात्रवर्णीय लोक धर्मावरील संकट टाळण्यासाठी असूरी प्रवृत्तीच्या शत्रूचा पाडाव करण्यासाठी सिमोलंगणा नंतर युद्धास जात असत. सध्या कालीन बदललेली समाज रचना लक्षात घेता सर्व वर्गीयांसाठी प्रत्यक्ष युद्धावर जाण्याचे प्रयोजन नाही, परंतु आपल्यातील विकारुपी असुरांचे दमन अपेक्षित आहे.
अशा प्रकारे नवरात्राच्या या नऊ दिवसाच्या पूजापाठ उपासना सत्कार्य यातून जणू नव्याने जन्म झाल्याप्रमाणे आपल्यातील असुरी प्रवृत्तीवर मिळवलेला विजय हा नवरात्रीनंतर येणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी साजरा केला जातो.नवरात्रोत्सव साजरा केल्यास मनातील विकारवशमता क्षीण होऊन, त्याने अध्यात्मिक उन्नती तर होईलच, परंतु त्याचबरोबर समाजसंस्था ही अधिकाधिक निकोप व एकसंध होण्यास सहाय्य होईल, म्हणून नवरात्रोत्सव हे मानवी जीवन जगण्याचे सूत्रच आहे असे म्हणावे लागेल.
नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा...!
श्री. विनोद शेनफड जाधव
मासरूळ ता जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments