मायमराठी बरोबर गणितही पहिलीपासूनच अभ्यासक्रमात असल्यामुळे गुरुजींनी शून्यापासून ते शंभर पर्यंत उजळणी लिहायला वाचायला शिकवली. मात्र हिशोबासाठी आणि गणितातील गुणाकार,भागाकार शिकायला पाढे पदरात पडले. ते तिसरी चौथीच्या वर्गात. पाढे म्हणजे अंगावर काटे आणणारा विषय. मुळातच गणित विषय गंभीर. वास्तविक पाहता गणिताशिवाय जीवनात पाणी हालत नाही. पण काय कुणास ठाऊक गणित विषय म्हटला की, डोक्याला मुंग्या यायच्या. "ते आकडे आणि पाढे,गणिताच्या नावे पोरं बोट मोडे"अशी स्थिती होती.अर्ध्यापेक्षा जास्त, तेवढेच काय अजून त्याहीपेक्षा जास्त म्हणजे ऐंशी ते पंच्या ऐंशी टक्के आम्हा पोरांना गणिताची भीती वाटायची.काही वगळता हुशार मित्र होतेच,मात्र गणिताविषयाला घाबरणारा आमचा लॉट जास्त होता.
गणितातील गुणाकार,भागाकार उदाहरणे शिकवायला सुरुवात झाली की पाढे आलेच म्हणून समजा. त्या पाढ्याशिवाय गणिताचं जणू पाणच हलत नव्हतं.त्यात गुरुजींनी आमच्याभोवती पाढे तोंडपाठ करण्यासाठी तगादा लावलेला असायचा.आम्ही गणितात,पाढ्यात तरबेज व्हावं म्हणून गुरुजी त्यासाठी प्रयत्न करायचे परंतु, आमचं डोकं तर तेवढे चालायला हवं ना...!बे एक बे चे पाढा पाठ झाला.त्यांनतर तीन, चारचा पाठ झाल्यावर पाचचा पाढा म्हणायला सोपा जायचं,कारण पाच, दहा,पंधरा वीस हे पाचच्या पटीतील म्हणणं सोपं जायचं. मात्र सहा सात आठ नऊ यामध्ये फजिती व्हायची. डोक्याला हात लावू-लावू बसायचो. उजळणीचे पुस्तक डोक्याजवळ घेऊन झोपायचो. उठता बसता पाढेच पाढे..! घरी बाबा समोर पाढ्याचा काढला तर म्हणायचे,आमच्या काळात तर निमकी, पावकी,दीडकी होती. अरे देवा!मग काय गप्प बसायचो.तेव्हा अजून डोक्याला ताप...! त्या काळात शिकले बाबा शिकले.मग काय, आपण का नाही? म्हणून घ्या रफ कागद आणि लिहा त्यावर पाच वेळेस,पाटीवर लिहा पाच वेळेस असा हा आमचा नित्यनेम चालू झाला. मित्र,भाऊच्या मदतीने त्याला सांगायचो, मी म्हणतो, बघ चुकते का? तर चुकले कि म्हणायचे, अरे थांब! सहा-साते पंचेचाळीस नाही रे ! सहा साते बेचाळीस होतात रे. अरे बापरे बाप ! कारण मागील पाचव्या पाढ्यात पाच नवे पंचेचाळीस होते.आणि तेच अचानक मध्येच चालू व्हायचं. पुन्हा म्हणायचो.या आकड्यांच्या बाजारात डोकं पूर्ण गांंगरून जायचं.बरं! गंमत अशी व्हायची कि,गुरुजी एकदम विचारायचे सांग, सहा आठे किती?तेव्हा तर परत गोंधळ उडून जाण्याचा जे लागोपाठ पाठ नाही ते एकदम कसे सहा आठ हे कसे येईल? शेवटी काय? कसंतरी घोंकंपट्टी करून करून पाढे पाठ केलेच नऊ पर्यंत...!त्यानंतर दहा चा पाढा पाचासारखाच होता दहाच्या म्हटलं कि पाढा पाठ,दहा एके दहा,दहा दुणे वीस,तीस, चाळीस, पन्नास ते शंभरपर्यंत म्हटलं की, झालं समाधान.पाचचा पाढा अन दहाचा पाढा या दोन बिचाऱ्यांनी फारसा त्रास दिला नाही. तेवढी धन्यता मानायचो.
वर्गात गुरुजींनी उभे राहून दोनच्या पाढ्यापासून एका-एकाला एक-एक पाढा म्हणायचे सांगितले की,ज्याच्या वाट्यावर दोन, पाच,अन दहाचा पाढा आला कि, तो खुश व्हायचा. मात्र आमचं नशीब कसलं बलवत्तर? नेमकं माझ्या वाट्याला सात किंवा नऊचा यायचा. म्हणजे पाढ्यालाही माझी पाठ सोडायचीच नव्हती म्हणायची बहुतेक.मग काय!उभ राहायचो.डोळे मिटवायचो.मनातल्या मनात देवाला प्रार्थना करून पाढ्याला सुरुवात करायचो. म्हणता-म्हणता पाढ्याची गाडी थांबली की, खाकी पॅंटीच्या खालचा कोपरा डाव्या आणि उजव्या हाताने पिरगळा मारायचो आणि साते-आठे, साते-आठे म्हणून थांबून जायचो.खाली बसलेल्या जिवलगाला उडलेली तारांबळ बघवत नव्हती. तो हळूच बारीक आवाजात म्हणायचा,"छपन्न"मग काय जणू पाढा पाठच आहे, तेव्हाचं मेणघुन्ह्यावाणी बंद पडलेलं तोंड एकदम उघडायचो. मोठ्यानं सात ते आठे छपन्न म्हणून,पाड्याची थांबलेली गाडी पुढे धकायची जीवात-जीव यायचा.अन हिमतीन सात नवे त्रेसष्ठ आणि सात दाहे सत्तर म्हटलं की, गपकन खाली बसायचो.मोकळा श्वास सोडायचो.खरंच! काही जिवलग मित्रांना अशी बिकट अवस्था बघवत नसायची म्हणून ते निभवून घ्यायचे. मात्र,काही याला गुरुजींचा हातचा मार बसला पाहिजे म्हणून सांगतही नव्हते.त्यातील काहीच बोटावर मोजणे इतकेच होते कारण ते हुशार,शिस्तप्रिय अन अभ्यासू विद्यार्थी...!
दहा पर्यंत पाढे तोंडपाठ झाल्यानंतर, अकरा ते वीस पर्यंत पाढे तोंडपाठ करण्यासाठी ही कसरत करावीच लागली.अकरा आणि विसच्या तर लवकर पाठ झाला मात्र बारा ते एकोणवीसचं मात्र कठीणच काम होतं. अकरा व विसचा पाढा तर अगदी सोपे होता अकरा एके अकरा दुणे बावीस अर्थात,एकावर एक अकरा दोनावर दोन बावीस तीनावर तीन ते तेहतीस अशा पद्धतीने अकरा दाहो ऐकशे दहा अन वीसचा पाढाही अगदी तसाच वीस च्या पटीत म्हणजेच वीस एके वीस,वीस दुणे चाळीस,साठ, अश्या पद्धतीने वीस दाहो दोनशे म्हटलं कि पाढा झाला. मात्र बारा ते एकोणवीसपर्यंतचे पाढे पाठ करायला बरीच कसरत करावी लागली.चौथी सरली. पण पाढे मात्र पाठ झालेच नाही. अद्यापपर्यंत पंधरा-सोळा च्या पुढील पाढे पूर्ण पाठ नाहीच. तेव्हा गुरुजी पाठ करवून घ्यायचे. तेव्हा गुरुजींचा धाक होता आता जीवनातल्या हिशोबांच्या आयुष्याचे वेगळेच पाढे चालू आहेत. जीवनातील आकडेमोडींची संख्या वाढली परंतु ज्या धाकांनी गुरुजींनी पाढे पाठ करून घेतले तो,आनंदच वेगळा होता. तेव्हा आकड्यांचा व्यवहार फारसा नव्हता परंतु पाढे करून घेणारे गुरुजी सोबतीला होते. आता या आकड्यांच्या आणि हिशोबांच्या गर्दीत स्वतः स्वतःलाच शिकवावे लागत आहे आणि आयुष्यातील पाढे वाचावे लागत आहे.
उच्च-प्राथमिक वर्गात तर आकड्यांचा हिशोब वाढत गेला. गणिताचे स्वरूप व्यापक होत गेले. तेव्हा एकवीसचे पाढे पाठ्यपुस्तकात होते. पण खरं सांगू, नंतरचे पाढे आयुष्यात माझ्याकडून कधीच पाठ झाले नाही. जेमतेम वीस पर्यंत होते. त्यातही बऱ्याच वेळेस अडखळत होतो आणि आताही पाठपुरेशे नाहीच.एकवीसच्या पुढील पाढे कदाचित आमच्या पिढीतील मुलांचे पाठ असतील की नाही माहित नाही. माझ्या मते कदाचित नसेलच..! कारण आयुष्याला पुरेल एवढं गणित सातवी-आठवीपर्यंत शिकलो. त्यापुढील गणित आयुष्यात फारसे उपयोगी पडले नाही. अभ्यासक्रमातील व पाठ्यपुस्तकातील गणित,बीजगणित उपयोगाचे नव्हते असे मी म्हणत नाही.त्याचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रात झालाच.भूमी- अभिलेख मध्ये भूमितीचा उपयोग जागा, जमीन,घर प्लॉट मोजणीसाठी उपयोगात येतोच. त्यात शंका नाही.आणि बीजगणितातील एक्स, वाय,झेड ची गणितं ही कुशाग्र अभियंते, कॉन्ट्रॅक्टर यांना उपयोगाचे ठरले व ठरत आहे.गणित व भूमिती या सर्व निर्जीव आणि भौतिक गोष्टी मोजण्यासाठी उपयोगाचे आहेच.मात्र मानवी जीवनातील दैनंदिन व्यवहार हा मात्र माझ्या पहिली ते सातवीपर्यंतच्या गणितातील आणि गणिताच्या पाढ्यांमध्ये दडलेला आहे.
मित्रांनो! ही गणितातील हे पाढे जरी आकडेमोडीमुळे आपणास कंटाळवाणे वाटत असले तरी,आपल्या गुरुजींची आपल्याविषयी तळमळ होती. माझा विध्यार्थी जीवनातील आर्थिक व्यवहारात मागे राहता कामा नये.त्यांनी जीवनातील दैनंदिन व्यवहारातील पावलोपावली पडणाऱ्या हिशोबसाठी गणित व गणितातील पाढे किती महत्त्वाचे आहे याचीजाणीव करून दिली. कारण ही दुनिया फसवी आहे.खोटारडी आहे. मानवांच्या फसव्या स्वभावाच्या व वाईट वृत्तींच्या लोकांसमवेत माझा विद्यार्थी फसला जाऊ नये.असा त्यांचा मुख्य उद्देश होता. म्हणून गणित शिकवणारे गुरुजी कायम स्मरणात आहे व कायम स्मरणात राहतील कारण,पावलोपावली जीवनात गणित आणि गणितातील पाढ्यांचा संबंध येतो.तेच गणित व पाढे जीवनातील दैनिक व्यवहार सुखकर करण्यास मदत करत आहे.
समस्त गुरुजनांना समर्पित..!
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments