Type Here to Get Search Results !

रेणुकामातेचे उपपीठः हिवरा चोंढाळा गावात विवाह न लावण्याची, दुमजली घर न बांधण्याची परंपरा विहामांडवा



, ता. २१ (अनिल गाभूड); 

पैठण तालुक्यातील श्री क्षेत्र हिवराचोंढाळा येथील रेणुका मातेचे मंदिर श्री क्षेत्र माहूर गडावरील रेणुका मातेचे उपपीठ म्हणून सर्व दूर प्रसिद्ध आहे हे गाव इतर गावापेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहे. या गावात एकही दोन मजली घर नाही आणि गावात एकही विवाह समारंभ होत नाही. विहामांडवापासून दोन किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र चोंढाळा येथील टेकडीवर वसलेले रेणुका मातेचे हेमाडपंती मंदिर आहे. हे मंदिर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात बांधलेले आहे. मंदिराचे प्रशस्त भव्य बांधकाम वास्तुशास्त्रातील अजोड नमुना आहे. भक्कम दगडी चिरेबंदीच्या आत प्रशस्त प्रांगणातील मंदिर व भव्य पन्नास फुटी दीपमाळ भाविकांचे लक्ष वेधून घेते.

मंदिराच्या भव्य प्रवेशद्वाराला पाहताच मंदिराच्या भव्यतेची महंती लक्षात येते. भाविकांची येथे मोठी गर्दी असते. युवराज चोंडाळा गावात सुमारे चारशे घरे आहेत या गावाभोवती पूर्वी दाट जंगल होते. यात हिवराच्या झाडाची संख्या जास्त असल्याने चोंढाळा या गावाला हिवरा चोंढाळा असे नाव पडले. येथील मंदिरा ला कळत नाही मंदिराला 20 खांबाचा भव्य सभा मंडप आहे. या खांबावर कोरीव काम केलेली आहे. सभा मंडप सुमारे 102 फूट लांबीचा असून मंदिराचा गाभारा चार खांबावर उभा आहे मंदिराला तीस फूट उंचीची दगडी तटबंदी केली आहे. हिवराचोंढाळा या गावात लग्नच होत नाही हे विशेष रेणुका देवी कुमारीका आहे अशी श्रद्धा असल्यामुळे गावात लग्न लावले जात नाही. या गावातील सगळी लग्न गावाबाहेरील मारुती मंदिराजवळ होतात. गावात कोणीही दोन मजली किंवा त्यापेक्षा अधिक मजल्याचे घर बांधलेले नाही आणि बांधत नाही. आपण रेणुका मातेच्या पायाशी असावे अशी त्या मागची भावना आहे. त्याचबरोबर त्या गावात कोणीही बाज केव्हा पलंग वापरत नाही त्या ऐवजी लोक घरात झोपण्यासाठी ओटे तयार करून घेतात. या मंदिराच्या अवतीभवती मोठमोठ्या दगडी शिळा दहा किलोमीटर लांब पाच किलोमीटर रुंदी पर्यंत जमिनीवर पसरलेल्या आहेत या शिळाना लग्नाचे वराड म्हटले जाते. याबाबत आख्यायिका अशी आहे की एका राक्षस राजाने देवीशी लग्न करण्याचा अट्टाहास धरला आणि मोठे वराड तो लग्नाला घेऊन आला. लग्नासाठी मोठा विवाह मंडप विहामांडवा येथे टाकण्यात आला ते ठिकाण म्हणजे आताचे विहामांडवा हे गाव होय. देवीला हे लग्न मान्य नव्हते आणि देवीने लग्न करण्याकरिता अट

 घातली होती. लगतच्या क्षेत्रातून गोदावरी नदी वाहते त्या नदीचे पाणी सूर्योदयापूर्वी आणायचे अशी ही अट होती. परंतु पाणी वेळेच्या आत न आणू शकल्यामुळे सर्व वऱ्हाडाचे शिळेत रूपांतर झाले याच बरोबर महाराष्ट्राचे थोर संत एकनाथ महाराज यांना मातेने साक्षात्कार देऊन चोंढाळा येथे मी आहे असे सांगितले तेव्हापासून दर पौर्णिमेस संत एकनाथ महाराज दर्शनात येथे येत आणि आजही नाथ वंशज नियमित दर्शनाला येतात. चौढाळ्याची रेणुका माता हे वारकरी संप्रदायाचे तसेच संत एकनाथ महाराज यांचे कुलदैवत आहे. आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी नवरात्र महोत्सवात घटस्थापनेपासून दूरवरचे भाविक मोठ्या संख्येने येतात सातव्या माळेला येथे मोठी यात्रा भरते. या काळात यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होते. एक महिना अगोदरच उत्सवाची तयारी चालते रंगरंगोटी, विद्युत रोषनाई व मोठ्या प्रमाणावर येणारे भाविक पाहता पैठण येथून जादा गाड्या सोडण्यात येतात. घटस्थापने पासून मंदिरात दररोज धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देवीला अभिषेक, सप्तशतीपाठ, नवमीला हवन व दसऱ्याला पंचक्रोशीतील भाविक सिमोललघन करून दर्शनासाठी येतात अष्टमीच्या दिवशी विहामांडवा येथून देवीला टिपूर आणला जातो हा टिपूर येथील जागृत ग्रामदैवत बलखंडे मंदिर व गावातून वाजत गाजत चोंडाळा येथे देशमाने परिवार परंपरेनुसार आणत असतात. कुलदैवत असल्यामुळे दर मंगळवारी व शुक्रवारी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. फोटो ओळ १) रेणुका माता २) पन्नास फुटी दीपमाळ ३) भव्य प्रवेशद्वार

Post a Comment

0 Comments