Type Here to Get Search Results !

@विसर्जनसमयी बाप्पाची तरुणांना प्रेमळ साद@

 


मित्रहो! आज माझ्या विसर्जन दिनी मला तुमच्या सोबत थोडं हितगुज साधायचं आहे.मागील वर्षी तुम्ही म्हटलं ना,"गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या" तुमच्या प्रार्थनेप्रमाणे मी दिलेल्या हाकेला"ओ"दिला आणि भाद्रपदच्या चतुर्थीला विराजमान झालो.माझ्या येण्याअगोदर तुम्ही जय्यत तयारी केली.मला आईप्रमाणे मातीतून फक्त मला मातीतून घडवायला हवं होतं,परंतु हल्ली तुम्ही मला प्लास्टर ऑफ पॅरिस पासून घडवत आहात.काही काळ मी तेही मान्यही केलं,परंतु त्याचबरोबर तुम्ही मला तुमच्या अपेक्षापोटी आणि कदाचित इतर मंडळांसोबत तुलना करण्यासाठी अतिशय भव्य रूपात स्थापन विराजमान करत आहे.काही ठिकाणी तर पन्नास-पन्नास फुटापर्यंत भव्य मूर्ती बनवून मला विराजमान करण्यासाठी भव्य मिरवणूक काढून स्वागत करताहेत.हे सुद्धा मी मान्य केलं,परंतु मित्रांनो! एक सांगू, एवढं भव्य स्वरूपाचं रूप नकोय मला. आई पार्वतीचा बाळ गोजिरी रूपातच मी खूप छान शोभून दिसतो. मला तेच आवडतं,कारण मायेनं प्रेम करून घ्यायला मला खूप आवडतं.या भव्य रूपातून हल्लीच्या तुमच्या रहदारीच्या आणि मर्यादित जागेतून मला आगमनाला आणि विसर्जनाला अडचणी येतात रे! स्वागतसमयी आणि विसर्जन समयी तुम्ही डीजे लावताय.मान्य आहे. काळ बदलत चालला आहे.नवीन काहीतरी स्वीकारायला हवं. मलाही ते आवडेल परंतु, त्याचा कर्णकर्कश आवाजाने लहान बालकं आणि आपलेच वृद्ध आई-बाबा यांना त्यांच्या हृदयाला त्रास होतो.म्हणून मला तर असं वाटतं की, छान आपले पारंपरिकवाद्य ढोल-ताशाच्या गजरात माझे स्वागत केले, तर मला खूप आवडेल.माहितीये,त्याच्यासोबत बाबांच्या डमरूचा आवाजही मला खूप आवडतो.तुम्ही म्हणताच ना,"डम डम डम डम डमरू वाजे,डमरूच्या तालावर बाप्पा नाचे" तर नक्कीच मी तुमच्यासोबत नाचत नाचत येईल.पण मित्रांनोखरं सांगू या डीजेचाआवाज मला सहन होत नाही रे .!

 मित्रांनो! तुम्ही मला घरो-घरी विराजमान केले.बाल गोपाळांनी छान सजावट केली.दररोज छान छान नैवेद्य खाऊ घातला.मला खूप आवडले. तुमच्या प्रेमाने मी स्वतःला विसरून गेलो की, मला तुमच्या सोबत फक्त दहा दिवसच थांबायचे आहे. तसा तर,मी संकटसमयी तुमच्या नेहमी सोबत आहे.कारण तुम्ही माझे भक्त नंतर परंतु त्याअगोदर प्राणप्रिय मित्र आहात.सखे आहात परंतु,एक सांगू, हल्ली मला या पृथ्वीवर का?कुणास ठाऊक?अस्वस्थ वाटतंय.काही गोष्टीचे दुःख होते.कारण मला विराजमान करण्यामागील तुमचा जो उद्देश होता. सर्वांनी एकत्रित यावं एकीतलं बळ दाखवावं.सगळ्यांनी गुन्या-गोविंदाने नांदावं.परंतु मला हे तर कुठेच जाणवलं नाही.तुम्ही जाती-जाती,धर्मा- धर्मामध्ये विभागले. एवढेच काय!सार्वजनिक मंडळा-मंडळामध्ये सुद्धा एकी दिसत नाही.मला गरीब-श्रीमंतीतही विभागून टाकले. भव्य मूर्ती,डेकोरेशनची भपके बाजी,याबरोबर आता तर मी नवीनचं ऐकलय,व्ही आय पी दर्शन.हे नेमकं काय? माझ्या दर्शनासाठी तासंतास उभा राहणारा भक्त,हा माझ्या दर्शनासाठी आसुसलेला असतो. कुणीतरी दिखाऊ भक्त येतो आणि त्याला तुम्ही प्रथम स्थान देता.का?कशासाठी? अरे तुम्ही सर्वजण माझ्यासाठी सारखेच आहात. वावरातून लूसलुसित,हिरवीगार दुर्वा घेऊन,एक जास्वंदाचे फुल आणि मला आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक आणणारा माझ्यासाठी तेवढाच प्रिय आहे जेवढा हजारोंची देणगी देऊन बडेजावपणाची प्रोढी मिरवतो.मग सांगा मित्रांनो! दर्शनासाठी चा हा गरीब-श्रीमंतीचा भेदाभेद कशासाठी?

 मित्रांनो! या काळात मोबाईल आणि पाश्चिमात्य अनुकरणातून तरुण-तरुणीचे वर्तन बिघडत चालले आहे.तरुण-तरुणी मद्यप्राशन करून,अश्लील गाणे लावून डान्स करत आहे.यामध्ये हल्ली तरुणी सुद्धा सहभागी होताना दिसून येत आहे. त्यांच्या अशा या नशेगिरीतून त्यांच्यावर अत्याचार होताना दिसून येत आहे. मित्रांनो! असे हे चित्र बघून खूप वाईट वाटतं.खूप मन दुखतं. हल्ली,येणे यामुळेच नकोसं वाटायला लागलंय.अश्लील गाण्यावर डान्स करणे. तोटके कपडे,अंग-प्रदर्शन करून नाच-नृत्य करणे. हे सण साजरे करण्यासाठीची फॅशन होऊन बसली आहे. मित्रांनो!त्याऐवजी सुंदर स्तोत्र पठण ठेवा.व्याख्यानें ठेवा. महिला सशक्तिकरण्यासाठी मेळवे आयोजित करा. तरुण-तरुणी व्यसनाच्या आहारी गेले. त्यांच्यासाठी समुपदेशन,सल्लागार शिबिरे आयोजित करा. त्याचप्रमाणे हल्ली गंभीर समस्या म्हणून प्रदूषणाची समस्या जाणवते आहे. जशी की जल,वायू,भू-प्रदूषण यातून सृष्टीची हानी होताना दिसून येत आहे. ती कशी टाळता येईल त्यावर चर्चा करा.पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करा.हे बघायला मला नक्की आवडेल. 

 मित्रांनो! तुम्हाला असं वाटतं ना की,मी पुढच्या वर्षी लवकर यावं म्हणून, मग माझं थोडंसं ऐकाल का? माझी पीओपीची भव्य मूर्ती बनवण्यापेक्षा छोटीशी गोजिऱ्या रूपातील मातीची मूर्ती बनवून मला विराजमान करा. कर्णकर्कश डीजे न लावता पारंपरिक वाद्यांनी आगमन व विसर्जन करा.व्हीआयपी दर्शन बंद करून सर्वांसाठी दर्शन खुले करा.दहा दिवसांच्या काळात अश्लील गाणे,डान्सचे आयोजन करण्याऐवजी,धर्म रक्षण, संस्कृतीची जोपासना कशी करता येईल यासाठी कार्यक्रम आयोजित करा.महिला सशक्ती करण,महिलांवरील अत्याचार कसे थांबतील त्याचप्रमाणे पर्यावरणाची हानी कशी कळेल? यासाठी व्याख्यानें आयोजित करा. मोबाईलच्या अतिवापरामुळे लयास चाललेल्या पिढीसाठी मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी-मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करा. या सर्व कार्यक्रमातून येणाऱ्या पिढीसाठी खूप मोलाचे मार्गदर्शन मिळेल.मित्रांनो! तुमचं हे कौतुक बघण्यास मी आतुर राहील.तेव्हा मात्र,नक्कीच मी तुमच्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात आणि डमरूच्या तालावर नाचत येईल.सुखी रहा.आनंदी रहा...!

श्री विनोद शेनफड जाधव

मासरूळ जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments