वणी : आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतर समाजांकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी वणी विधानसभा क्षेत्रातील वणी मारेगाव व झरी तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने"आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चा" चे भव्य आयोजन सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे.आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी, झरी व मारेगाव आणि विविध आदिवासी संघटनांच्या नेतृत्वात हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर काढण्यात येणार आहे.
आदिवासी समाजाच्या आरक्षणावर बंजारा आणि धनगर समाजाकडून हैदराबाद गॅझेटच्या आधारावर दावा केला जात आहे. या दोन्ही समाजांना स्वतंत्र आरक्षण असताना, ते आदिवासी समाजात समाविष्ट होऊन आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. बंजारा आणि धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करत नसून, त्यांना आदिवासी आरक्षणात समाविष्ट करणे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे, असे समितीचे म्हणणे आहे.
आदिवासी समाज हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेला आहे. जर बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट केले, तर मूळ आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येईल आणि त्यांची परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती समितीने व्यक्त केली आहे. यामुळे आदिवासी समाजाने एकजुटीने या मोर्चात सहभागी होऊन आपले हक्क आणि अस्तित्वाचे संरक्षण करावे, असे आवाहन आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी, झरी व मारेगाव यांनी केले आहे.
हा आक्रोश मोर्चा सोमवारी, 29 सप्टेंबर 2025 रोजी वणी शहरात काढला जाणार असून, सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments