Type Here to Get Search Results !

"ए"फॉर ॲपल



सन 2000 पासून जिल्हा परिषद मराठी शाळेत जगद्गुरू संत तुकोबाराय यांचे दहावे वंशज श्री रामकृष्ण मोरे शिक्षणमंत्री असतांना त्यांच्या प्रयत्नातून वर्ग पहिली पासून इंग्रजी विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला.त्या अगोदर जिल्हा परिषद मराठी शाळेत इंग्रजी विषय वर्ग पहिलीपासून अभ्यासक्रमात नव्हता.माय मराठी,गणित, जिल्ह्याचा भूगोल आणि चौथीतील राजे शिव छत्रपतीचा इतिहास एवढेच विषय होते.पुढील शिक्षणासाठी जेव्हा श्री शिवाजी हायस्कुल मध्ये वर्ग पाचवी मध्ये दाखल झालो. तेव्हापासून इंग्रजी विषय शिकायला सुरुवात झाली.गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्या-त्या विषयांची पुस्तके घेतली. त्याचबरोबर संबंधित विषयासाठी वह्याही विकत घेतल्या. त्यात विशेषतः इंग्रजीसाठी चाररेघी वही घ्यावी लागली, कारण नवशिक्यांसाठी एबीसीडी वळणदार लिहिण्यासाठी चाररेघी वहीच योग्य होती.कारण इंग्रजीचंही आपल्या माय मराठी सारखचं होतं.जरी उकार,वेलांटी नव्हते तरी रेषेच्या वर अन रेषेच्या खाली काही अक्षरे होती,त्यासाठी सुरुवातीला चाररेघी वहीच सोयीस्कर होती. त्यामुळे अक्षरांची मांडणी व अक्षर सुधारायला मदत झाली.विषयानुसार वेगवेगळ्या वह्यापैकी एक म्हणजे इंग्रजीची चाररेघी वही ही आमची पहिली इंग्रजीची विषयाची वही.

 इंग्रजीच्या या चाररेघी वह्या जसे कि,काही वह्यावर पेन-पेन्सिल,शाळकरी मुला-मुलींचे चित्र होते.अश्या ह्या आकर्षक वह्या बाजारात उपलब्ध होत्या.गुरुजींनी पाचवीतील इंग्रजीच्या पहिल्या तासिकेत चाररेघी वही हातात घेऊन आम्हां सर्व मुलांना दाखविली.चार रेषांचा एक संच बनवून एक ओळी तयार व्हायची.आम्हां मुलांच्या सोयीसाठी छापाई कंपनीने सुद्धा मुलांच्या लक्षात येण्यासाठी वरील रेषेचा लाल रंग, मधील दोन निळा रंग,परत खालची लाल रंग असा चार रेषांचा एक संच बनवला होता. त्याखाली किंचित अंतर सोडून परत चार रेषांचा संच बनवून, असा छोट्या वहीमध्ये फक्त सहा ते सात होळींचा संच बनवलेला असायचा.सुरुवातीला आम्हा मुलांच्या नेमके इंग्रजीतील हे अक्षरे कसे लिहायचे म्हणून लक्षात आले नव्हते. म्हणून गुरुजींनी वही प्रमाणेच फळ्यावर रंगीत खडुने चाररेघी वहीतील ओळ्यांचा नमुना रेखाटून दाखवला व वह्यासमोर ठेवायला लावल्या. गुरुजींनी फळ्यावरील चार रेघींच्या नमुन्यावरील इंग्रजीमधील कॅपिटल लेटर व स्मॉल लेटर कोणत्या रेषेखाली अथवा रेषेवर लिहावं याविषयी फळ्यावर रेखाटून दाखवले.कॅपिटल अर्थात मोठी एबीसीडी ही वरील तीन रेषेवर व स्मॉल लेटर अर्थात छोटी एबीसीडी कोणत्या रेषेवर लिहावा लागेल हे फळ्यावर बघून बघून आम्ही सुद्धा गिरवायला सुरुवात केली.कॅपिटल अर्थात मोठी एबीसीडी ही वरील तीन रेषेवर व स्मॉल लेटर हे सर्व चारी रेषेवर रेखाटावे लागे.त्यातील मधल्या दोन रेषेवर काही अक्षरे जसे कि,सी,ई एम एन वगैरे लिहावे लागे.वरील तीन रेषेवर बी, डी, एफ,एच तर खालील तीन रेषे वर जी,पी,क्यू वाय ई.अक्षरे रेखाटावी लागे.याविषयी गुरुजींनी मार्गदर्शन केले.

 इयत्ता पाचवीसाठी पहिल्यांदा इंग्रजी विषयासाठी घेतलेल्या चाररेघीवहीवर गुरुजी फळ्यावर काढलेल्या तो तीन रेषेवरील कॅपिटलमधील"ए" आम्ही सर्व मुलांनी बघून-बघूनवहीमध्ये पेन्सिलने गिरवला.तेथूनच इंग्रजीलाशिकायला सुरुवात झाली. त्यानंतर बी ते झेड पर्यंत आम्ही गुरुजींनी सांगितलेल्या प्रमाणे पाहून-पाहून गिरवले.त्यातील गोलाकार अक्षरे लिहायला काही अंशी अडचण येत होती.जसे की, बी,डी,ई,जी सारखे अक्षरे लिहतांना कधी त्याचा छोटा तर कधी मोठा व्हायचा परंतू माय मराठीतील त्या स्वरूपाची अक्षरे लिहिण्याची सवय असल्यामुळे वळणदार अक्षरे काढण्यास मदत होऊ लागली. तसं बघितलं तर, इंग्रजीतील कॅपिटल लेटर रेखाटण्यास फारसा त्रास झाला नाही.मात्र स्मॉल लेटरमुळे डोक्याला मुंग्या यायल्या लागायच्या. कारण त्यांचा चारीरेषेत मेळ साधावा लागायचा जसे की, मधल्या दोन रेषेत सी एम एन, वरील तीन रेषेवर डी एफ एच वगैरे तर खालील तीन रेषेवर क्यू, पी सारखे अक्षरे रेखाटावी लागायची. जर यांचा मेळ जमला नाहीतर, शब्दांची जुळवणूक व अक्षर वळणदार येण्यास अडचण निर्माण व्हायची.इंग्रजीतील कॅपिटल लेटरला गुरुजींचे फारसे लाल पेनचे शेरे भेटले नाही परंतु स्मॉल लेटरला मात्र सुरुवाती-सुरुवातीला गुरुजींच्या लाल पेनच्या शेऱ्याने वाहिचं पान लालभडक व्हायचं.नंतर हळूहळू सवय झाली व अक्षरे वळणार काढण्यास जमायला लागले.

 इंग्रजीतील चाररेषेवरील हे दोन्ही लेटर अर्थात एबीसीडी गिरवायला शिकता-शिकता जसा माय मराठीतील बाराखडी शिकतांना "अ" अननसाचा "अ"गुरुजींनी शिकवला अगदी तसंच इंग्रजीतील अल्फाबेट शिकवतांना,अक्षरांपासून सुरुवात झालेल्या "ए"ला ओळखायला "ॲपल"सांगितला.तो आजही कायमचा स्मरणात आहे.ए फॉर ॲपल ने इंग्रजी शिकायला सुरुवात झाली ती झेड फॉर झेब्रा पर्यंत अजूनही कायमची जशीच्या तशी पाठ व स्मरणात आहे.त्यानंतर हाच ए ॲपल आणि इंग्रजी विषय जीवनात बऱ्याच ठिकाणी उपयोगात येत आहे.जरी इंग्रजी परकीय भाषा असली तरी अथवा थर्ड लैंग्वेज असली तरी हल्ली बऱ्याच ठिकाणी वापरल्या जात आहे.केंद्र शासनाच्या पोस्टल विभाग, रेल्वे विभाग आणि आर्मी,नेव्ही एयरफोर्स या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात वापर होतांना दिसून येत आहे.भाषा म्हणजे विचारांचे देवाण-घेवाण करण्याचे माध्यम आहे.आत्मसात करायला हवी.तिच्याविषयी द्वेष नसावा कारण, भाषेमुळे आपल्या ज्ञानात भर पडते. नव नविन काहीतरी शिकायला भेटते.वर्तमान काळाबरोबर भूतकाळातील गोष्टींची माहिती होते व त्यातून भविष्याचा वेध घेता येतो.

 असा हा इंग्रजीतील चाररेघी वहीत गुरुजींनी शिकवलेला "ए फॉर ॲपल"पासून इंग्रजी भाषेचं ज्ञान मिळवण्यास सुरुवात झाली.आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषा म्हणून ओळखली जाणारी ही व्यवहारापुरती का होईना शिकलो.जरी अस्खलित बोलता येत नसलं तरी मात्र,कोण काय बोलतं हे कळतं.आणि कामापुरतं का होईना दोन ओळी लिहू शकतो. अहो! एवढेच काय कदाचित एखाद्या इंग्रजी भाषिक देशात जाण्याचा योग आला तर,त्यांच्यासोबत कमीत-कमी दैनंदिन गरजा व व्यवहारापुरतं बोलता येईल असं शालेय जीवनातील इंग्रजीच्या चाररेघी वहितील"ए फॉर ॲपल"पासून झालेल्या अक्षर ओळखीतून ज्ञान मिळालं.मित्रांनो!नव-नविन भाषेचं ज्ञान अवगत करत रहा.त्यातून संस्कृतीची ओळख होते व नवनिर्माण क्षमतेचा विकास होतो.

श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments