Type Here to Get Search Results !

सेकंड लँग्वेज



कुटुंबात सर्वजण मराठी भाषिक अर्थात मातृभाषा माय मराठी असल्यामुळे घरी,गल्लीतील मित्र मंडळी एवढेच काय गावातही सर्व मराठी भाषिक असल्यामुळे दुसरी भाषा कानावर येण्याचा फारसा प्रश्नच नव्हता.त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर सह्याद्री हे एकच वाहिनी होती.त्या वाहिनीवर काही ठराविक वेळेतच हिंदी कार्यक्रम लागायचे.जसे की,चित्रहार व शुक्रवार शनिवार हिंदी चित्रपट, बातम्या त्याचबरोबर काही ठराविक हिंदी मालिका त्यामुळे फक्त या माध्यमातूनच सेकंड लैंग्वेज कानावर पडायची. मित्रही सर्व मराठी भाषिकच होते.वर्ग पहिलीपासूनचा हिंदी-भाषिक मित्र इकबाल. तोही आमच्या सोबत शुद्ध मराठीतच बोलायचा त्यामुळे सेकंड लैंग्वेजचा त्यावेळी दैनंदिन व्यवहारात फारसा उपयोग झालाच नाही.

 चौथा वर्ग पास झाल्यावर इयत्ता पाचवी पासून सेकंड लॅंग्वेज हिंदी विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली होती. तेव्हा हिंदीचं ज्ञान मिळायला लागले व भाषेचा वापर वापर व्हायला सुरुवात झाली.वाचायला, लिहायला सुरुवात झाली. हिंदीची बाराखडी लिखाणाला फारशी अडचण आली नाही. कारण अगोदरच माय मराठीची बाराखडी गिरवायला शिकलेलो होतो. अक्षरे जवळपास सर्वच सारखी उलट त्यामध्ये ळ हे अक्षर नाही. त्या ऐवजी ल वापरतात. बाकी सर्व मराठीतील बाराखडी ही हिंदीतील वर्णमाला सारखीच...!कारण अगोदरच माय मराठीची बाराखडी गिरवायला शिकलेलो होतो. इयत्ता पाचवीत हिंदी विषय गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला विषयाची काठिण्य पातळी कमी होती. नाव,वस्तूंची ओळख पटवण्यासाठी चित्रांचा वापर केलेला होता.जसा मराठीच्या बाराखडी मध्ये आ साठी आई व बाळाचे चित्र तसेच हिंदीसाठी सुद्धा आपल्या अवतीभोवतीच्या वस्तूंची ओळख पटवण्यासाठी सुद्धा सुंदर चित्रांचा वापर पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळांनी केलेला होता. जसे कि,आ साठी आम म्हणजे चित्रावरून आम म्हणहेच आंबा हे लगेच लक्षात यायचं. पुस्तकावरील नाव हिंदी सुलभभारती आणि सुगम भारती असे होते. इयत्ता पाचवीच्या ऐवजी कक्षा पांचवी अशी ओळख पटली व हिंदी विषयाची सुद्धा माहिती होऊ लागली. त्यानंतर अनुक्रमणिकेनुसार पहिली इकाई, दुसरी इकाई,अनुक्रमांक, पाठ का नाम आणि पृष्ठ क्रमांक अशी रचनेतून छान,सोप्या व आकर्षक पद्धतीने पुस्तकाची निर्मिती केलेली होती.

 पहिल्या पाठामध्ये "देखो और सुनो" या पद्धतीने सेकंड लँग्वेज शिकवायला गुरुजींनी सुरुवात केली. त्यामध्ये चित्र बघायचं आणि गुरुजी त्यांचे नाव सांगतील ते ऐकायचे. ध्यानात ठेवायचे. जसे की,कुत्ता,मछली,पौदा या प्रकारच्या अवतीभोवतीच्या वस्तूंची,प्राण्यांची ओळख पुस्तकातून होऊ लागली.त्यानंतर "सुनो और गाओ" या पाठामध्ये सुंदर सुंदर कविता होत्या, बालगीते होती, त्यामुळे विषयांची गोडी लागण्यास मदत झाली. पढो और लिखो अर्थात आम्हां विद्यार्थ्यांना वाचायला व लिहायला गुरुजींनी सांगितले. यातून हळूहळू एका वाक्याची लिहायला सुरुवात झाली. त्यासह हिंदी विषयाच्या व्याकरण विषयी गुरुजींनी मार्गदर्शन केले. कारण भाषा शुद्धीसाठी व्याकरणाची आवश्यकता असते. त्यातून शुद्ध भाषा वाचन लिखाण करण्यास मदत होते.विरामचिन्हाचा वापर जसे कि, स्वपविराम,पूर्णविराम,अनुस्वार,ऱ्हस्व,दीर्घ, वेलांटी-उकार यामुळे शब्दांचा नीटसा अर्थ लावण्यास मदत होते.शब्दावरील अनुस्वार सुद्धा दुसऱ्या शब्दावर लिहल्या गेल्यास शब्दाचा अनर्थ निघू शकतो म्हणून गुरुजींनी व्याकरण विषयक अगदी बारीक-सारीक कृलुप्त्या आम्हाला शिकवल्या. हिंदीतील वाक्याच्या शेवटी पूर्णविराम हा सरळ एक रेषा असते. याविषयी लक्षात आले. नाहीतर ती उभी रेषा अक्षराला काना म्हणून दिल्यास वेगळा अर्थ निघु शकतो.असे गुरुजी सांगायचे. म्हणून वाक्य पूर्ण झाल्यावर किंचित अंतर ठेवून पूर्णविरामची उभी रेषा मारावी. असं हे अमूल्य मार्गदर्शन गुरुजींनी केलं.

 इयत्ता पाचवीनंतर पुढील वर्गांमध्ये विषयाची काठिण्य पातळी वाढत गेली.अभ्यासक्रमांमध्ये हळूहळू गीत,कविता,कथा यांचा समावेश झाला.काही वैचारिक लेख त्याचबरोबर प्रसिद्ध कादंबरीतील काही समाजप्रबोधन लेखन इयत्ता नववी, दहावीतील हिंदीच्या पाठात वाचावयास मिळाले.शेतकरी जीवन, व्यावसायिक जीवन त्याचबरोबर महापुरुषांचे विचार जसे की, "समय का सदुपयोग"या पाठातून विद्यार्थी दशेत वेळेला किती महत्त्व असते. याचे मार्गदर्शन मिळाले. आयुष्यातील वेळ ही व्यर्थ ठिकाणी वाया न घालवता.त्याचा वापर योग्य ठिकाणी केल्यास,सत्कारणी लावल्यास जीवनाचा विकास होण्यास मदत होते.कारण शालेय जीवनात वर्गाबरोबर वयाला महत्त्व असतं. दहावी-बारावीतील वर्षात बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागते, त्या वयात इतर वाईट गोष्टींकडे लक्ष न देता.अभ्यासाकडे लक्ष दिल्यास भविष्यात यश संपादन करता येते.या स्वरूपाचे उत्तम मार्गदर्शन अशा या वैचारिक पाठातून मिळाले.त्याचप्रमाणे "तोडो नही जोडो"या पाठातून तथागतांनी अंगुलीमाल सारख्या दरोडेखोरवृत्तीच्या व्यक्तीला त्याच्या दुष्कर्मातून सन्मार्गावर कशा पद्धतीने आणले.याविषयीचे मार्गदर्शन केले आहे. जीवनात कोणावरही अन्याय,अत्याचार जुलूम करू नये.त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्र,पशुपक्षी यांच्यावर प्रेम करावे.असा बोध मिळाला.सारे जहाँ से अच्छा या गीतातून देशप्रेमाची ओळख निर्माण झाली.

या शालेय अभ्यासक्रमातून मातृभाषा मायमराठी नंतर सेकंड लैंग्वेज म्हणून ओळखली जाणारी हिंदी भाषा अवगत झाली. मित्रांसोबत वार्तालाभ तसेच काही शासकीय पत्र-व्यवहार करू लागलो.दहावी मध्ये बोर्डाची परीक्षा देऊन पास झालो.तेव्हा सर्टिफिकेटवर आपली राष्ट्रभाषा म्हणून ओळखली जाणारी व सेकंड लँग्वेज हिंदी या विषयात पास झालो.या सेकंड लँग्वेजचे ज्ञान अवगत झाल्यावर,पुढील शिक्षण घेऊन राज्य व केंद्र सरकारच्या नोकरीसाठी अर्ज केला.तेव्हा काही विभागामध्ये परीक्षेचे माध्यम हिंदी विषय होता.त्यासाठी हिंदी भाषिक पुस्तके आणून वाचली.तेव्हा स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासाठी या सेकंड लैंग्वेजची खूप मोलाची भर पडली.स्पर्धेच्या या युगात हजारोंच्या संख्येत संघर्ष,मेहनतीने तग धरून उभा राहू शकलो.म्हणून, मित्रांनो!भाषा ही विचारांची देवाण-घेवाण करण्याचे माध्यम आहे.भिन्न -भिन्न भाषेचे ज्ञान अवगत करा.नवीन पुस्तके वाचा.त्यातून नक्कीच आपल्या ज्ञानात भर पडेल व जीवनाचा विकास होईल.

 सर्व गुरुजनांना तथा विद्यार्थी मित्रांना समर्पित.....!

श्री विनोद शेंनफड जाधव

मासरूळ ता जि बुलडाणा

Post a Comment

0 Comments