Type Here to Get Search Results !

आम्हां शेतकऱ्यांची दिवाळी



माझ्या बापाचं फाटलयं धोतर 

 माय नेसतसे ठिगळाचं लुगडं...!

 वाटे मनी यंदाच्या दिवाळ सणाला

 बाळगुनी स्वप्न उरी घेऊ नवीन कापडं...!

 ओल्या नयनी सौं विचारत असे मज 

 अहो ! धनी, शेतातला विकला का माल..!

 कसं सांगू तिला या अवकाळ्यानं

 पिकलं सोनं त्यानं केलं मातीमोल..!

 सुगीच्या या काळात माझ्या भरल्या शेतात 

 बरसला अवकाळी जणू येड लागल्यावानी...!

 स्वप्नांना माझ्या पाडलं आडवं 

 साचवलं डोळ्यात अश्रूरूपातून पाणी..! 

 सट्टा-जुगाराच्या या खेळापरी 

 जगतोय मी हे शेतकरी जीवन...!

 सारे म्हणती मज गर्वानं शेतकरी राजा 

 या राजाच्या नशिबी असं गरिबीचं लेणं..!

 वाटे जीवा यंदा आम्ही सारे शेतकरी 

 मन भरूनी करू साजरी थाटात दिवाळी..!

 कुठे? नशिबी आमुच्या सुखाचं हे जिणं

 सदा आम्हां भाळी शिमगा अन होळी...!

 नसे नवीन कापडं मिठाई अन लाडू 

 जगामुखी घालुनी घास भुके दिवाळ सणी...!

 गर्व याचा वाटे जीवा आम्ही जगाचे-पोशिंदे 

 फुलून येईल छाती मन होई समाधानी..!

 सोसुनिया हाल होई जीवाची या दैना 

 संकटासह पूररुपी नियतीही खेळ खेळी...!

 विनू जोडूनी हात साद घालतो दैवाला 

 कारे ! नशिबी आम्हा अशी फाटकी ही झोळी...!

श्री विनोद शेनफड जाधव

मासरूळ ता जि बुलडाणा

Post a Comment

0 Comments