इंग्रजी दिनदर्शिकेनुसार आणि ऋतुमानानुसार साधारण ऑक्टोबर महिन्याअखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्यांदा आठवड्याच्या सुरुवातीस थंडीची चाहूल लागते.वातावरणातील हा बदल लक्षात घेऊन आई घरातील कपड्याच्या गाठोड्यातून स्वेटर,मफलर,कानपट्ट्या,टोप्या धुवायला काढायची.त्यावेळेस आताच्या सारखा कापडांचा बाजार जागोजागी नव्हता.मोठ्या बहिण-भावाचे लहान बहीण भावाला कितीतरी वर्ष तेच ते उबदार कपडे घालावे लागायचे.मात्र त्यातही खूपच माया व प्रेम होते.कसलीही कुरकुर न करता आनंदाने घालायचो.गावाकडे आजूबाजूला शेतीचे व निसररमम्य वातावरणा मुळे थंडी बऱ्याच प्रमाणात असायची.सकाळी भल्या पहाटे छान मंदिरातून घंटांचा आवाज यायचा.कार्तिक महिन्यास प्रारंभ चालू झाल्यास कार्तिक स्नान व गावात दिंडी निघायची.त्यामुळे गावातील बाया माणसं सर्वजण सकाळी लवकर उठायचे त्यामुळे आम्हा पोरांनाही उठावंच लागायचं.चुलीवरील गरम-गरम पाण्याने अंघोळ केली की,कोवळ्या उन्हाची वाट बघायचो.मात्र सूर्योदयापूर्वी फारच थंडी वाजायची,म्हणून वाळलेलं गवत,काडी-कचरा वावरातील कपाशीच्या,मिरच्याच्या काड्या जमा करायचो आणि पेटलेल्या चुलीतील एखाद्या विस्तावाचा तुकडा सराट्यावर घेऊन जमा केलेल्या शेकोटीच्या वस्तुंना लावून शेकोटी पेटवायचो.
गावाकडील गरिबीच्या परिस्थितीमुळे अंगभर उबदार कपडे सगळ्यांकडे नसायचे.त्यात आम्हा मुलांना हाफ चड्ड्या असायच्या.त्यामुळे थंडी जाणवायची.महिला व पुरुष मंडळींना सुद्धा कानाला पांढरा रुमालाव्यतिरिक्त थंडीचे संरक्षण म्हणून दुसरे काही नसायचे.सूर्योदयापर्यंत एकदम सकाळी व रात्री साधारण जेवणानंतर थंडी जाणवायला लागली की शरीराला उब मिळावी म्हणून शेकोटी पेटवून बसायचो.एका-एका गल्लीमध्ये जवळपास दोन ते चार शेकोट्या पेटवलेल्या दिसायच्या.जेथे ज्याचे विचार जुळले तेथील घोळक्यात जाऊन बसायचे.शक्यतो आम्हा लहान मुलांची शेकोटी वेगळी व मोठ्या बायका-माणसांची वेगळी असायची.त्यातील एक गट कि, ज्यांना बिडीपीण्याची सवय होती. त्यांना शेकोटीमुळे माचीस वापरायचं कामच नव्हतं, कारण बिडी शेकोटीतील विस्तवावर धरली की पेटवल्या जायची.हे एक विशेष. शेकोटीवर जो शेकायला येईल त्याला थोडी-थोडी शेकोटी पेटवायच्या वस्तू सोबत घेऊन याव्या लागायच्या.आम्ही गावाकडे त्याला "सासू" म्हणायचं.शेकोटीसाठी आणलेल्या गवत,काड्या,लाकडांना "सासू"च का म्हणावं? अजूनही प्रश्न अनुत्तरीत आहे.प्रश्न असा आहे की, सासू मग ती मुलाची किंवा मुलीची सुद्धा असू शकते. शेकोटीवर उब घ्यायला जर मुलगा आला तर भविष्यातील त्याच्या पत्नीची आई म्हणजे सासू.आणि मुलीने आणले तर तिच्या पतीची आई म्हणजे सासूच. यामधील तर्क अद्यापही लक्षात आला नाही.शेकोटीत जाळणाऱ्या वस्तूंना सासूच का म्हणतात. एवढी वाईट असते का सासू? बरं ! एवढं वाईट म्हणावं तर ती स्वतःला जाळून इतरांना थंडीपासून संरक्षण देते.उब देते. म्हणजे सासू वाईट नसतेच मुळी..!कारण ती आई असतें.मग ती मुलाची असो अथवा मुलीची. गमतीचा भाग वगळता, एखाद्या वस्तूसाठी ठेवलेलं नाव हे गंमतीने जरी लोकरूढितून, जनमानसातून आपल्यापर्यंत आले असले तरी,त्याचा अर्थ गहन असतो.
थंडीच्या दिवसात शेकोटी पेटवण्यासाठी जमवलेल्या गुराढोरांचे व बकऱ्यांचे खाऊन उरलेले गवत,काडी-कचरा सुद्धा असायचा. अर्थात त्या जळणा ऱ्या वस्तू कि ज्यातून आग,विस्तव निर्माण होईल त्या आम्ही मुलं शेकोटीसाठी घराच्या पडक्या भिंतीच्या बाजूला जमा करून ठेवायचो. सकाळी जवळपास पाच ते सहा वाजता घरच्यांनी अंथरुणातून उठवून दिल्यावर आम्ही तेच काम करायचो.कारण चुली जवळ जास्त वेळ बसू शकत नव्हतो.अन अंथरुणात लोळत पडल्यास सक्त मनाई होती.एवढ्या सकाळी उठून अभ्यास करावा म्हटलं तर, तेवढे हुशार गटातील आम्ही मुळीच नव्हतो आणि करायचे म्हटलं तरी कुडकुडणाऱ्या थंडीत अभ्यासात मन लागायला तर हवं.म्हणून शरीराला उब मिळावी म्हणून शेकोटीचाच आनंद लुटायचो.त्यानिमित्ताने मित्रमंडळी सोबत खेळण व्हायचं.गप्पा चालायच्या.प्रत्येक जण शेकोटीवर शेकायला येण्याअगोदर थोडं थोडं तरी शेकोटी पेटवण्यासाठी साहित्य सोबत घेऊन यायचेच. अन्यथा त्याला बसू देत नव्हते. ते अगदी सहाजिक होतं.जर शेकोटीची उब घ्यायची तर सगळ्यांना आणायलाच हवे.गावाकडील शेकोटीची हीच तर खरी गंमत असायची.कोणतीही गोष्टी ही सगळे मिळून सहभागी होऊन करायचे.त्यामुळे एकमेकाविषयी आपुलकी,प्रेमाची भावना राहायची.एकलकोंडेपणा नव्हता.मग ती शेकोटी असो अथवा दिवाळीचा फराळ...!घरी रात्रीचे जेवण आटोपल्यावर मकाच्या कणसाच्या आतील भागापासून शेकोटी बनवायचो.त्याला आम्ही लेंडुरं म्हणायचो.आई त्याला लोखंडी टोपल्यामध्ये टाकून पेटवायची.त्याचीही घरगुती शेकोटी बनायची.त्यामुळे घरातील वातावरण रूम हीटर प्रमाणे उबदार व्हायचे.
शेकोटी पेटवल्यावर सर्वजण घोळक्याने गोल रिंगण करून बसायचे.शेकोटी विझायला लागली की,परत त्यावर काडी कचरा टाकून पेटवायचो.धूपट-धुवा यामुळे अंग पूर्ण काळसर पडायचे. मात्र त्याची कोण पर्वा करणार. काळ्या-गोऱ्याचा प्रश्नच नव्हता.शेकोटीतून मिळणारा आनंद महत्त्वाचा होता.आता असं वाटतं.स्वेटर,कान-टोपी,मफलर विकत घ्यायची परिस्थिती नव्हती.अन हो कदाचित नव्हती ते एका दृष्टीने बरच होतं.कारण सगळ्यांनीच थंडीचे उदार कपडे विकत घेतले असते. थंडी जाणवली नसती आणि मित्रांसोबत शेकोटीची आनंद अनुभवता आला नसता.मित्रांसोबतच्या मैफिलीचा आनंद लुटता आला नसता. हल्ली शेकोटी वगैरे कुठे बघायला मिळते.सगळ्यांकडे उच्च दर्जांचे उबदार कपडे, पायात पायमोजे,जोडे,कान-टोप्या बघायला मिळत आहे. असं बरच काही असून केवळ घरातल्या घरात भ्रमणध्वनी मध्ये मुलं गुंतून असतात.एवढेच काय!काही घरांमध्ये वातानुकूलक यंत्र आहे. ऋतुमानानुसार जेव्हा थंड हवे तेव्हा थंडी हवा.जेव्हा उब हवी तेव्हा उब ही त्यातून मिळवता येते. त्यामुळे अशी शेकोटी पेटवायचे मजा कोण घेईल?शेकोटीसाठी कचरा,काडी गवत लाकडे कोण जमा करणार? अन हो!पेटवलीच तर शेकोटीचा आनंद उपभोगायला येईल कोण?कारण प्रत्येक अबाल वृद्ध यंत्रमानवासारखी झाली आहेत. स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त करून घेतलं आहे. या जबाबदारीच्या अन मुलांकडून भविष्यातील वाढत्या अपेक्षामुळे मुले इतकी एकलकोंडी होत चालले आहे कि, त्यांच्या भावनिक विकास होताना दिसत नाही. त्यातून त्यांचं नैराश्य वाढत आहे.चेहऱ्यावरील खळखळणारा आनंद हरवला आहे. लोकांतापेक्षा एकांत वाढल्यामुळे त्यांची समाज,मित्र,नातेवाईक यांचे विषयी प्रेम आपुलकी दिसून येत नाही.कारण शेकोटीतून मिळणाऱ्या शारीरिक उबेसह मित्राबरोबर गोड गप्पांच्या मैफिलीतून मनाला उब मिळवून देणाऱ्या या व्यवस्था लुप्त होताना दिसून येत आहे.
अशा या शेकोटीतून थंडीपासून संरक्षण म्हणून अंगभर मिळणाऱ्या उबेसह मित्रमंडळी आणि सवंगड्या बरोबरच्या गप्पा-गोष्टीतून व खळखळ हास्यातून मनालासुद्धा ऊब मिळायची.एकलकोंडेपणाची भावना कमी होऊन,समूहातून आनंद मिळायचा. मित्रमंडळीमध्ये वाटून घेतलेल्या सुखदुःखातून जगण्याला बळ यायचं.कारण ही शेकोटी फक्त शरीराला उब देत नव्हती तर,खळखळून हसायला लावणारे,प्रेम,आपुलकी माया,सहकार्यची जाणीव करून देणारं हक्काचे प्लॅटफॉर्म होते. मित्रांनो!तर चला पुन्हा एकदा उबदार प्रेमाची शेकोटी पेटवूया. या गार वातावरणात थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून शेकोटीच्या या ऊबदारपणातून शरीराबरोबर सवंगड्यांच्या गप्पा,गोष्टीं अन मैफिलीतून या एकलकोंड्या मनालाही उबदार बनवूया.
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ ता जि बुलडाणा

Post a Comment
0 Comments