वणी/ प्रतिनिधी
नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असताना, राज्याच्या राजकारणाप्रमाणेच वणीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्ता पुन:प्राप्तीसाठी जोरदार 'मोर्चेबांधणी' सुरू केली आहे. मनसेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणण्याचा पक्षाचा निर्धार असून, याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उंबरकर यांचे अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ठतेचे मूर्तीमंत उदाहरण मानले जाणारे धनंजय त्रिंबके यांना प्रभाग क्रमांक चारमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
▪️ मनसेचा इतिहास आणि सत्ता गमावल्याची वेदना
२०११ साली नगर पालिका निवडणुकीत पहिल्याच झटक्यात ११ नगरसेवक निवडून आणून वणी नगर परिषदेवर मनसेचा झेंडा डौलाने फडकवला गेला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या 'मोदी लाटे'मध्ये' ही सत्ता पूर्णतः भारतीय जनता पक्षाच्या हातात गेली आणि उर्वरित पक्षांना आपले खातेही उघडता आले नाही. या दारुण पराभवाचा वचपा काढण्यासाठी उर्वरित पक्ष आता कामाला लागले असून, मनसेनेही जुने वैभव पुन्हा मिळवण्यासाठी कमर कसली आहे.
▪️उंबरकरांचा 'शिलेदार' मैदानात
राजू उंबरकर यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणून धनंजय त्रिंबके यांची ओळख आहे. त्यांची हीच एकनिष्ठता आणि जनमानसातील लोकप्रियता पाहता त्यांना प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असल्याची चर्चा आहे.
मनसेच्या सत्ताकाळात त्रिंबके यांनी आरोग्य सभापती म्हणून यशस्वीपणे कारभार सांभाळला होता. त्यांच्या कार्यकाळात प्रभागामध्ये आणि शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये भरीव विकास झाल्याचे स्थानिक सांगतात.
▪️ जनतेशी नाळ आणि लोकप्रियतेची कसोटी
धनंजय त्रिंबके यांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांचे जनतेशी असलेले घट्ट नाते. ते केवळ राजकारणी नसून, मनसे रुग्ण सेवा केंद्राच्या माध्यमातून सातत्याने रुग्णांची सेवा करत असतात. गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीत धावून जाणे आणि त्यांना मदत करणे, हा त्यांचा स्थायीभाव आहे. यामुळे त्यांची लोकप्रियता शहरात चांगलीच वाढली आहे.
याच जनसेवेच्या आधारावर धनंजय त्रिंबके हे प्रभाग क्रमांक चारमधून विजय खेचून आणतील, असा प्रबळ विश्वास मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. उंबरकरांच्या नेतृत्वाखाली मनसे पुन्हा पालिकेवर कब्जा करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments