Type Here to Get Search Results !

सफर कर्नाळ्याची-भाग1पक्षी अभयारण्य



कर्नाळा हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. त्याचप्रमाणे तो कर्नाळा पक्षी अभयारण्याचाही एक भाग आहे कारण ज्यावेळेस आपण किल्ला बघण्यासाठी जातो तेव्हा, सर्वप्रथम पक्षी अभयारण्य तेथे स्थित आहे.असे हे कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई गोवा महामार्गांवर आहे.पनवेल हायवे वरून जातांना डाव्या बाजूला भव्य प्रवेशद्वार आहे.काही अंतर पायी चालत गेल्यावर आतील बाजूने किल्ल्याच्या चढाईला सुरुवात होते.या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व असे की, हा किल्ला यादवकालीन असून तेराव्या शतकात बांधला आहे असे मानले जाते.

 महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.त्यामुळे लहानपणापासून शिवरायांचे शौर्य पराक्रम मनात ठासून-ठासून भरले आहे.प्रत्येकाच्या मनात किल्ला,ऐतिहासिक वास्तु विषयी विशेष आकर्षण असते..किल्ला म्हटला की मनाला शौर्य, पराक्रम,समर्पण त्यागाची आठवण होते.त्यामुळे किल्ला, ऐतिहासिक वास्तू,संग्रहालय पाहण्यास मन धजावते.त्या विषयी सखोल अभ्यास करावासा वाटतो,म्हणून जशी वेळ भेटेल तसे वाचन अथवा प्रत्यक्ष ऐतिहासिक वास्तू बघण्याचा योग आल्यास,बघावयास जाण्यास तीव्र इच्छा होते.योगायोगाने रेल डाक सेवेत कर्मचारी असल्यामुळे एक ड्युटीचा भाग म्हणून सेक्शनच्या ड्युटी निमित्ताने पुणे,मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याचा योग येतो.तेथील प्रचंड गर्दी,गाड्यांचे कर्णकर्कश आवाज त्यामुळे दिवसभर नकोसे वाटते.म्हणून मनाला ताजेतवाने ठेवण्यासाठी फावल्या वेळेत कुठेतरी फिरायला अथवा ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी जायचे ठरवले. कार्यालयातील सहकारी मित्र श्री विकास परांजपे यांनीही होकार दर्शवला.गुगलबाबा व जी-चॅट नावाच्या ॲपवर आजूबाजूच्या स्थळांची चौकशी केली असता मुंबईपासून जवळच्या किल्ल्यापैकी यादीतील कर्नाळा किल्ला व पक्षी अभयारण्य बघावयास जाण्याचे ठरवले.रात्रीची ड्युटी करून डोळ्यात झोप होती.मात्र सकाळी लवकर उठलो.तयारी केली.ट्रेकिंगचा फारसा अनुभव नाही परंतु तोडक्या ज्ञानानुसार एका बॅग त्यामध्ये पाण्याची बॉटल व इतर आवश्यक वस्तू घेतल्या.सकाळी नऊ वाजता लोकलने पनवेल जाण्यासाठी निघालो.रेस्ट-हाऊस पासून जवळ असलेल्या मस्जिद स्टेशनला गेलो.मस्जिद ते पनवेल असे लोकलचे रिटर्न तिकीट काढले.साधारण चाळीस रुपये येणे-जाणे असे हे अगदी नगण्य तिकीटदर आहे. जवळपास पन्नास ते पंचावन्न मिनिटांमध्ये पनवेल येथे पोहोचलो.पनवेल स्टेशनच्या ईस्ट अर्थात पूर्व दिशेला उतरलो.तेथील फारशी माहिती नसल्यामुळे प्रवाश्यांना विचारत स्टेशनच्या बाहेर पडलो.अगदीजवळच सिटी बसचे स्थानक आहे.तेथे चौकशी केली असता,पायी चालत आणि विचारपूस करत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकापर्यंत पोहोचलो.बस स्थानकाच्या बाजूला एक छोट्याशा टपरीवर भूक लागल्यास खाण्यासाठी बिस्किट,चॉकलेट वगैरे घेतले.किल्ले फिरण्याचा आवडीतून पुढे-पुढे चालत राहिलो.पनवेल बस स्थानकावरून पेन आगाराच्या बसमध्ये पनवेल ते कर्नाळा अभयारण्य हे तिकीट काढले.बसचे भाडे प्रत्येकी एकवीस रुपये होते.बसमधील महिला कंडक्टरने सुद्धा योग्य मार्गदर्शन व सहकार्य करून अगदी कर्नाळा अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ उतरवून दिले.कर्नाळा हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या नं 66 वर पनवेलहून पेनला जाताना डाव्या बाजूला आहे.

 निसर्गरम्य अशा परिसरातील भव्य प्रवेशद्वारातून कर्नाळा पक्षी अभयारण्यात आत शिरलो.साधारण पन्नास ते साठ पावलं चालत गेल्यावर तेथे वन्यजीव विभागाच्या मार्फत सूचनाफलक लावले आहे.वन्य प्राण्यांना त्रास देऊ नये.धोका होऊ शकतो वगैरे.त्याचबरोबर पक्षी अभयारण्य तथा किल्ला बघण्यासंदर्भात शुल्क भारतीय पर्यटक साठ रुपये तर पाच ते बारा वयोगटातील मुले तीस तर विदेशी पर्यटक ऐकशे वीस व मुले साठ असे शुल्क आकरण्यात आले आहे.त्याचबरोबर कॅमेरा शुल्क,पार्किंग शुल्क संदर्भात फलक लावलेले आहे.ते व्यवस्थित वाचून बुकिंग काउंटरवर गेलो.उपवन संरक्षण वन्यजीव विभाग ठाणे मार्फत वनसंरक्षक तपासणी नाका यांनी रोख रक्कम भरण्याची पावती दिली.पावतीवर आधारकार्ड व भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किल्ल्यावरून परत येण्याविषयी तोंडी सूचना दिल्या.संबंधित पावती सोबत घेतली.सोबत बाळगलेल्या वस्तूंची चौकशी करण्यासाठी एका पत्राच्या शेडखाली एक महिला कर्मचारी रजिस्टर घेऊन बसल्या होत्या.तेथे कर्नाळा पक्षी अभयारण्यातील नियम असे फलक लावले आहे.व पर्यटकांसाठी सूचना लिहल्या आहेत.प्लास्टिक डिपॉझिट रक्कम सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिले जातील.अर्थात अभयारण्य प्रवेश करण्याअगोदर तपासणीसाठी एक रजिस्टर होते.तेथे पर्यटकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक,आपण आपल्या बॅगमध्ये कोणत्या वस्तू सोबत घेऊन जात आहे याचा तपशील उदाहरणार्थ सोबत प्लॅस्टिकची बॉटल,चॉकलेट,बिस्कीटचा पुडा वगैरे त्याचा संपूर्ण तपशील तेथे महिला कर्मचारी नोंद करून घेत होत्या.त्याचीच डिपॉझिट रक्कम शंभर रुपये होती.मी ऐकून आश्चर्यचकित झालो व आनंदही झाला.कारण ज्या वस्तू आपण सोबत घेऊन जाणार त्या वापरल्यानंतर त्यांचा प्लास्टिक कचरा होतो.तो कचरा पक्षी अभयारण्य व किल्ल्यांच्या परिसरात टाकल्या जातो. तो तेथे टाकता कामा नये.किल्ल्यावरून परत येतेवेळेस नोंद केलेल्या वस्तूंपैकी जर एखाद्या वस्तूंचे, वापरलेल्या प्लास्टिक कागदाचा तुकडा तपशील नोंदीप्रमाणे कमी पडला तर डिपॉजिट रक्कम परत मिळणार नाही.अशी स्पष्ट ताकीद होती.हा उपक्रम बघून खूप छान वाटले.अश्या या पर्यटकांसाठीच्या ओम गं गणपतये नमो नमः सूचना प्रथमच अनुभवास मिळाल्या.माझ्या मते,ह्या सूचना प्रत्येक किल्ला,राष्ट्रीय उद्यान,प्रेक्षणीय स्थळ,प्रार्थना स्थळावर असायला हव्यात.कारण व्यक्ती आपल्या सोबत बाळगलेल्या खाद्य पदार्थाच्या वस्तू खाऊन त्याचे रॅपर तेथेच फेकून मोकळे होतात.त्यामुळे पवित्र स्थानाचे पवित्र्य अबाधित राहत नाही.कचऱ्याचा डिग साचून भू-प्रदूषण होते. त्यासाठी हा अतिशय सुंदर असा उपक्रम आहे.

 कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या भव्य प्रवेशद्वारावरील हिरव्यागार बोर्डखालून हिरव्यागार जाळीच्या लोखंडी गेटमधून आत शिरलो.रस्त्याच्या दुतर्फा छान फलक लावले होते.त्यापैकी सावधान...! वन्य प्राण्यांना त्रास देऊ नका. त्याचप्रमाणे कर्नाळा पक्षी अभयारण्याविषयी थोडक्यात माहितीसंबंध फलक लावले आहे.थोडक्यात माहिती अशी कि,कर्नाळा अभयारण्याचे क्षेत्रफळ 12.154 चौरस किलोमीटर असून,मुंबई गोवा महामार्गावर वसले आहे. डॉ.सलीम अली यांच्या प्रेरणेतून या पक्ष अभयारण्याची निर्मिती झाली असून, येथे पक्षांच्या अनेक प्रजाती आढळतात.शाहीन ससानाची जोडी घरटे बांधते.त्याचबरोबर ऐतिहासिक कर्नाळा किल्ला हा निसर्गप्रेमी व भटकंती करणाऱ्यांसाठी आकर्षण आहे.या फलकाबरोबर,कृपया हे लक्षात ठेवा.व या गोष्टी करू नका.अशा सूचनांचे फलकसुद्धा तेथे लावलेले आहे.हे वाचत-वाचत रस्त्याने चालत होतो.रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. घनदाट जंगल आहे. या अभयारण्यामध्ये काही पक्षी निरीक्षण करण्याचे स्थळे आहे.तेथे पक्षी आहेत. जसे की, बॅवलर,पबार्वेट,बुलबुल,कावळा,ड्रॅगो,ओरिओल हे अँप्रोच रोड टू रेस्ट हाऊसच्या स्थानावर आहे.बदक,गरुड, फ्लायकेचर,कोरा,खड्या पक्षी हे गोल प्लॅटफॉर्मवर आहे.तर कोकम नाल्याजवळ सूर्यपक्षी,थ्रश व सुतार पक्षी यांची नोंद आहे.मोर टाका ट्रेलमध्ये वरीलपैकी काही तर हरियाली ट्रेल मध्यभाग मध्ये हार्नबिल,परकीट,गुलाबी मानेचा बुलबुल,कावळा,ड्रॅगो,फफाऊल,गरुड पक्षी तर पुढे बर्डवाचर्स पॉईंट या स्थानकावर वरील पक्षांची नोंद आहे,तर सातव्या स्थानावर अर्थात कर्नाळा किल्ल्यावर गरुड व शाहीन,फाल्कन हे पक्षी आढळून येतात.मात्र ऋतुमानानुसार यातील काही पक्षी स्थलांतरित होतात.त्यामध्ये विशेषत: पक्षांच्या 37 जाती ह्या स्थलांतरित होतांना दिसून येतात.अशी नोंद आहे.साधारणपणे वरील या सर्व जाती कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये आढळून येतात.मात्र त्यांना बघण्यासाठी अभयारण्यातील जंगलाच्या आतील काही पाऊलवाटांनी आत प्रवेश करावा लागतो.आम्हीसुद्धा तेथील आजूबाजूच्या पाऊलवाटेने गेलो. काही पक्षी आढळून आले.निसर्गवाटेने घनदाट जंगल दिसून आले.

 कर्नाळा अभयारण्यातील काही दर्शनीय स्थळे आहेत.त्यामध्ये विशेषतः अभयारण्य व्हयू पॉइंट,नागेश पॉईंट,माथेरान पॉईंट पक्षी निरीक्षण पॉईंट अशी स्थळे आहेत.या सर्व निसर्गवाटा आहेत.डांबरी रस्त्याने चालत असताना कडेलाच काही सुंदर फलक लावलेले आहेत जसे की,आमची ही निसर्ग संपदा उद्याची कृत्रिम उत्पादने होऊ नयेत म्हणून काय करायला हवे. त्याचबरोबर साधारण सहा ते आठ फुटाचा भव्य असा कर्नाळा अभयारण्याचा नकाशा पोपटी रंगाच्या फलकावर पिवळ्या रंगाचे स्थानिक व बाजूला कर्नाळा किल्ल्याच्या टॉप पॉइंटचे चित्र आहे. एका बाजूला झाडाच्या फांदीवर एक चिमणी तर फलकाच्या उजव्या बाजूला हरणाचे चित्र आहे.नकाशाप्रमाणे अभयारण्याचे दोन भाग दिसून येतात.अर्थात अभयारण्य हे पनवेलहून पेनकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला एक भाग आहे.त्यापैकी डाव्या बाजूला सरड्या टोक,नागेश पॉईंट,सरड्या माळ,घेवराडी व मोर टाका हे स्थानक आहेत.तर उजव्या बाजूला अर्थात पुलाच्या उजवीकडील बाजूने कारवी टोक, मोहरमाळ,हेदु दांड, कणी डोंगर अशी ठिकाणी आहेत.नेमकं आम्ही ज्या दिवशी अर्थात सहा नोव्हेंबर 2025 ला गेलो असता पक्षी सप्ताह होता. अर्थात पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर पर्यंत पक्षी सप्ताह चालू होता.त्या संदर्भात जागोजागी पोस्टर्स लावलेले होते.काहीशा अंतरावरच वाटेने उजव्या बाजूला एकवीरा देवी महिला बचत गटाची खानावळ आहे.अभयारण्यातील काही अंतर पाऊलवाटेने चालत जाऊन रस्त्याच्या कडेला वनातील झाडांविषयी माहिती अर्थात झाडांचे खोड,त्यांचे सुंदर चित्र काढून प्रत्येक भागाला नावे दिलेले आहेत.असे फलक आहे तर,वनस्पतींचे पाने या विषयी माहिती,प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया,याविषयी माहिती दिसून येत होती. डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूने काही निसर्गवाटा आहेत व डांबरी रस्त्यावर निसर्गाबद्दल माहितीफलक दिसून येते.पाना-फुलांचे महत्त्व कशा प्रकारचे आहे.त्याविषयी माहिती दिसून येते.त्यातील "हिरवी फुफ्फुसे"या फलकावर अतिशय छान लिहिलेले आहे.जंगले ही कार्बनडायऑक्साइडचे रूपांतर प्राणवायूत करून वातावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. खरोखरच या फलकाप्रमाणे तेथील निसर्गरम्य वातावरण आहे.चहूबाजूंनी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत.त्यापैकी विशेषतः कोशिंब,किंजल,कळंब,जांभूळ,आवळा,उंबर,ऐन,बेल,मोह,चिंच तसेच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत.त्याचबरोबर झुडपांमध्ये दिंडा, वावडिंग,कारवी आणि वेलीपैकी गुळवेल,पळसवेल हेही दिसून येतात.काही मोठ्यावृक्षांमध्ये चिंच,आंबा,जांभूळ,आपटा,आवळा हे दिसून येतात.काही औषधी वनस्पती पैकी कोकम,बेहडा,रिठा,आवळा आहेत.पर्यावरण तज्ञांच्या अभ्यासानुसार व नोंदीनुसार जवळपास 642 वृक्ष प्रजाती या परिसरामध्ये दिसून येतात.

 पायी चालत गेल्यावर सखल भाग आहे.तेथे उजव्या बाजूला प्राणी,पक्षांसाठी लोखंडी जाळ्यांचे पिंजरे आहेत.त्यामध्ये मोर,चिमणी, कावळा,पोपट लांडोर हे पक्षी आढळून आले.विटा दगड माती व सिमेंटच्या चबुतऱ्यावर जाळीचे पिंजरे बनवलेले आहेत. पर्यटकांना बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन्यजीव विभाग ठाणेमार्फत लाकडी बाक बसवलेले आहेत. वन्य अधिकाऱ्यांसाठी रेस्ट रूम आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी,स्री-पुरुषांसाठी शौचालय आहे.माकडे,मांजर तसेच कुत्रे,कावळे चिमण्या हे ही तेथे भटकतांना दिसून येतात.भर दिवसा उष्णतेच्या वेळीसुद्धा वातावरण अगदी थंड व शांत वातावरण दिसून येते.पर्यटकांसाठी रिफ्रेशमेंटसाठी व भोजनासाठी महिला बचत गटामार्फत कॅन्टीनची सोय आहे.तेथे बसूनआम्ही अगदी अल्प दरात वडापाव व चहाचा आस्वाद घेतला.कॅन्टीनमध्ये सर्व महिला कर्मचारी कार्यरत होत्या. कारण कॅन्टीन ही कल्ले गावातील महिला बचत गटाने शासन नियम लक्षात घेता पर्यटकांसाठी अगदी स्वस्त दरात चालू केली आहे.

 अशा या कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून शैक्षणिक सहली भेटी देतात. त्याचप्रमाणे ट्रेकर, निसर्गप्रेमी व पक्षीमित्र भेटी देतात. कारण तेथील नैसर्गिक वातावरण,पक्षी,प्राणी हे मन वेधून घेतात. सुट्टीचा योग बघून नक्कीच कर्नाळा येथील पक्षी अभयारण्याला भेट द्या.क्रमशः...

श्री विनोद शेनफड जाधव 

मासरूळ ता जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments