प्रतिनिधी गणेश ठाकरे लासलगाव
भरवस फाटा ते शिर्डी राज्यमार्ग क्रमांक ७ च्या देवगाव फाटा परिसरात अशोकराव मानकर यांचे वस्तीजवळ मुखेड , ता.येवला येथील प्राथमिक शिक्षक प्रकाश यशवंत कांगणे हे चासनळी येथून रविवार दि.१६ रात्री ८ वाजेच्या सुमारास येत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना घडली आहे.
बिबट्याने त्यांच्या पोटरीला चावा घेतला. देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.यावेळी त्यांच्या मागे असलेल्या बाहेर गावच्या दोन दुचाकीवरील प्रवाशांवर देखील हल्ला करण्यात आला. मात्र, सुदैवाने प्रवासी सुद्धा थोडक्यात बचावले.
वाकद येथील संजय बडवर यांनाही याच वेळी पायाला चावा घेतला. काही वेळानंतर मानोरी परिसरातही बिबट्याने पाळीव जनावरावर हल्ला केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चार दिवसांपूर्वी बिबट्याला देवगाव येथे जेरबंद केले होते. त्याला ठार मारावे यासाठी नागरिकांनी विशाल मोर्चा व रस्ता रोको केलेला होता. त्यानंतर या परिसरात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून बिबटे जेरबंद केले जातील असे आश्वासन वनाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र ते हवेत विरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments