Type Here to Get Search Results !

शेळ्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत, दुचाकी जप्त, आरोपींना पोलिस कोठडी

 



प्रतिनिधी :-  गणेश ठाकरे लासलगाव 


देवगाव फाटा परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतातील सहा शेळ्या चोरल्याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तपासादरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

   दि.४ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १ ते २ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सौ. द्रोपदाबाई बाजीराव शिंदे यांच्या पत्र्याच्या शेडमधून काळ्या, तांबड्या व पांढऱ्या रंगाच्या एकूण ३० हजार रुपयांया सहा शेळ्या चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गु.र. नं. १९३/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरही शिरवाडे, वाकद परिसरात मोठ्या प्रमाणावर शेळ्या चोरी सुरू असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली चोरीचा केंद्रबिंदू असलेल्या शिरवाडे गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले. सोम.दि. २२ डिसेंबर रोजी रशीद शेख यांच्या शेळ्यांची चोरी करताना ग्रामसुरक्षा दलाने चोरांचा पाठलाग केला असता मोटारसायकल टाकून चोरटे पसार झाले. त्यानंतर पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी बाळू गंगाधर कुऱ्हाडे (वय ४६) आणि कृष्णा पेव्हल माळी (वय ३५, दोघे रा.धामोरी, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर यांना अटक करण्यात आली.

तपासात आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली अंदाजे १५ हजार रुपयांची किमतीची काळी विना नंबरची कावासाकी मोटारसायकल जप्त करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. औदुंबर मुरडनर करत आहेत. या कारवाईत शिरवाडे ग्रामसुरक्षा दलाचे दिपक चिताळकर, श्रीकांत चिताळकर, गणेश चिताळकर, नितीन शिंदे, विशाल पवार, संभाजी चितळकर आदी सदस्यांनी सक्रिय सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments