प्रतिनिधी. : गणेश ठाकरे लासलगाव
उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री.मतोबा महाराज यांचा यात्रोत्सव दि.३ जानेवारी पासून उत्साहात सुरू होणार असून हा उत्सव दि.१८ जानेवारी पर्यंत अखंड सुरू राहणार आहे.यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री.मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव बोरगुडे व विश्वस्त मंडळाने दिली.
नाशिक - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथे दरवर्षी पौष पौर्णिमेनिमित्त श्री.मतोबा महाराजांचा यात्रोत्सव भरवला जातो. यावर्षी दि.३ जानेवारी रोजी पौष पौर्णिमा असल्याने यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटे ५ वाजता भागवताचार्य ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शिंदे (साधना आश्रम, रुई) तसेच कृषीराज अॅग्रो सर्व्हिसचे संचालक प्रकाश पगार व छाया पगार यांच्या हस्ते श्री.मतोबा महाराजांच्या नवीन चांदीच्या मूर्तीची महापूजा होणार आहे.
त्यानंतर सकाळी ८.३० वाजता बोकडदरे येथील भारत माता आश्रमाचे महंत श्री महामंडलेश्वर १०८ जनेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते रथपूजा संपन्न होणार आहे. यावर्षी रथ मिरवणुकीस प्रारंभ करताना रथाला पहिली बैलजोडी जुंपण्याचा मान सिन्नर तालुक्यातील पाटवाडी येथील शेतकरी नंदकिशोर महात्मे यांना देण्यात आला आहे.सध्या देवस्थान परिसरात विविध ठिकाणी बांधकाम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दर्शन रांगेसाठी बांबू - बल्ल्यांची बांधणी करण्यात येणार असून भाविकांना उन्हापासून संरक्षणासाठी मंडप उभारण्यात येणार आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.
यात्राकाळात गर्दीचे नियोजन व नियंत्रणासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना ओळखीसाठी टी - शर्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच नारळ फोडण्यासाठी यंत्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात्रोत्सव काळात दररोज सकाळी ६, दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता संगीतबद्ध आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री.मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टचा चांदीची नवीन मूर्ती करण्याचा निर्णय
आराध्य दैवत श्री.मतोबा महाराज मंदिरातून दि.३ डिसेंबर रोजी मध्यरात्री दोन मूर्तींची चोरी झाली होती. निफाड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा चोरी प्रकरणाचा तपास करीत आहेत. संतप्त नागरिकांनी रास्तारोको आंदोलन करून तातडीने मूर्तींचा तपास लावावा अशी मागणी केली होती. त्यावेळी पोलिस उपअधिक्षक कांतीलाल पाटील यांनी तातडीने तपास पूर्ण करून आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, सदर घटनेला तीन आठवडे उलटूनही अद्याप चोरट्यांचा शोध न लागल्याने देवस्थान ट्रस्टने तातडीची बैठक घेऊन श्री.मतोबा महाराजांची नवीन चांदीची मूर्ती बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment
0 Comments