प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मंजूर पदे तातडीने न भरल्यास शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी प्राथमिक शाळेला कुलूप लाऊन, निफाड पंचायत समिती कार्यालयावर विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे
या शाळेत एकूण चार उपशिक्षक, दोन पदवीधर शिक्षक आणि एक मुख्याध्यापक अशी सात पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ तीनच शिक्षकांवर सात वर्गांचा संपूर्ण कारभार चालत आहे. इयत्ता पहिली ते पाचवीत १९७ विद्यार्थी असून या वर्गांसाठी पटाधारीत चार शिक्षक आवश्यक आहेत; मात्र सध्या तीनच शिक्षक कार्यरत आहेत. इयत्ता पाचवी व सहावीचा एकूण ५८ पट असून या दोन वर्गांसाठी दोन पदवीधर शिक्षक आवश्यक आहेत, मात्र सध्या एकही पदवीधर शिक्षक नाही.
सन २०१९ पासून शाळेत भाषा पदवीधर शिक्षकच नाही, तर गणित पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त कारभार पाहत गणित शिकवत होते. त्यांच्या बदलीनंतर आता गणित शिक्षकही नसल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. काही दिवसांपूर्वी शाळेला मुख्याध्यापक नेमण्यात आले होते, मात्र त्यांनी केवळ आठच दिवसांत बदली करून घेतली. या शाळेत तब्बल १८ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. त्यामुळे त्यांची सरल पोर्टलवर नोंद होत नाही. त्यामुळे ते विद्यार्थी ‘बोगस’ ठरले आहेत. परिणामी विद्यार्थी संख्या कमी दिसत असल्याने शिक्षक संख्येत अजून कपात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने मंजूर पदे भरावीत, याबाबत पालकांनी वेळोवेळी मंजूर शिक्षक पदे भरण्यासाठी वारंवार लेखी व तोंडी विनंती केली आहे, मात्र ग्रामस्थांना केवळ आश्वासनाशिवाय काही मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ पूर्वी मंजूर पदे तातडीने न भरल्यास शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी प्राथमिक शाळेला कुलूप लाऊन, निफाड पंचायत समिती कार्यालयावर विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
निवेदनाच्या प्रति, मा.तहसिलदार साहेब, निफाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक लासलगाव, मा.शिक्षण विस्तार अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment
0 Comments