शिरवाडे वाकद येथे ग्रामसुरक्षा दलाची स्थापना
प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत अलीकडील काळात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भुरट्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी आणि गावागावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लासलगाव पोलिसांनी एक सकारात्मक व आदर्श पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात शिरवाडे वाकद येथे ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे, पोलीस हवालदार संदीप शिंदे व औदुंबर मुरडनर उपस्थित होते. यावेळी ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांना काठ्या व शिट्ट्यांचे वाटप करण्यात आले. रात्रीच्या वेळी गस्त घालणे, संशयास्पद व्यक्ती व हालचालींवर लक्ष ठेवणे, तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधणे, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या.
या कार्यक्रमास पोलिस पाटील रामनाथ तनपुरे, दिपक चिताळकर, अशोक आवारे, विश्वनाथ आवारे, चेअरमन संदीप आवारे, संजय काळे, श्रीकांत चिताळकर यांच्यासह ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करत गावाच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments