गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
पाटस:दौंड तालुक्यातील रोटी येथील श्री रोटमलनाथ मंदिरात महिलांच्या मुंडण करण्याच्या परंपरेवरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी या प्रथेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवर शितोळे परिवाराच्या समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. चाकणकर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत बेताल असून, ते एका प्रतिष्ठित परिवाराची सामाजिक प्रतिमा मलिन करणारे असल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
शितोळे परिवार हा दौंड तालुक्यातील एक अत्यंत मान-सन्मानाने वागणारा आणि देणारा परिवार म्हणून ओळखला जातो. राजकीय आणि सामाजिक जीवनात अनेक उच्च पदांवर काम करत असतानाच या परिवाराने सर्वसामान्यांच्या सुख-दुखात नेहमीच हिरीरीने सहभाग नोंदवला आहे. अशा सुसंस्कृत परिवाराच्या परंपरेबाबत भाष्य करताना महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वस्तुस्थितीचा विचार करायला हवा होता, अशी टीका आता केली जात आहे.
समर्थकांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "प्रत्येक परिवाराची एक स्वतंत्र धार्मिक परंपरा असते आणि ती पिढ्यानपिढ्या श्रद्धेने जपली जाते. शितोळे परिवाराची ही परंपरा देखील श्रद्धेचा भाग असून ती आजपर्यंत जपली गेली आहे आणि यापुढेही जपली जाईल. ही परंपरा कोणीही रोखू शकत नाही आणि ती रोखण्याचा प्रयत्न देखील करू नये." या वादात आम्ही संपूर्णपणे शितोळे परिवारासोबत खंबीरपणे उभे असून, परंपरेच्या नावाखाली परिवाराला लक्ष्य करणे थांबवावे, असा इशाराही यावेळी समर्थकांनी दिला आहे. आता या प्रकरणाला 'श्रद्धा आणि कायदा' यांच्यातील संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले असून, आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment
0 Comments