प्रतिनिधी : गणेश ठाकरे, लासलगाव
निफाड तालुक्यातील शिवडी, उगांव परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून त्याचा वाढता वावर स्थानिकांसाठी धोकादायक ठरत आहे. या कालावधीत बिबट्याने दोन कुत्रे व दोन मेंढ्यांचा फडशा पाडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उगांव रेल्वे स्टेशन व शिवडी परिसरात बिबट्या तळ ठोकून असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील विविध ठिकाणी त्याचे दर्शन होत असून, शिवडी भागातील दोन शेतकऱ्यांचे कुत्रे बिबट्याने ठार केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी महेश शिंदे यांच्या घरालगत शेतात असलेल्या मेंढपाळाच्या कळपातून रात्रीच्या वेळी बिबट्याने एक मेंढरू उचलून नेले. त्यानंतर शुक्रवार, दि.२६ रोजी मध्यरात्री पुन्हा दुसरे मेंढरू उचलून नेल्याची घटना घडली.
बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून शाळा - महाविद्यालयात जाणारी मुले, शेतात कामासाठी जाणारे मजूर तसेच शेतात घर करून राहणारे शेतकरी व हंगामी कामगारांमध्ये भीती पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ उपाययोजना करत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शिवडी येथे पिंजरा लावावा, अशी मागणी शिवडीच्या सरपंच संगिता सांगळे, सोसायटीचे चेअरमन रामनाथ शिंदे, माजी सरपंच प्रमोद क्षीरसागर, संजय शिंदे, अरुण क्षीरसागर, रोशन शिंदे, महेश शिंदे, विश्वनाथ शिंदे, रामनाथ सांगळे, राजेंद्र वाबळे, अब्दुल शेख, दत्तात्रेय सुडके, धर्मा क्षीरसागर, सचिन क्षीरसागर आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments