Type Here to Get Search Results !

टाकळी विंचूर चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केशव जाधव बेपत्ता

 


 

निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथे खळबळजनक घटना

 प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव 

टाकळी विंचूर (ता. निफाड) येथील ४५ वर्षीय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केशव यशवंत जाधव हे दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता घरातून कामानिमित्त बाहेर पडले आणि त्यानंतर परतलेच नाहीत. आठ दिवसांचा कालावधी उलटूनही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून गावात खळबळ उडाली आहे.

       केशव जाधव यांनी लासलगाव गटातून जिल्हा परिषद उमेदवारीची तयारी केली असून त्यांनी लोकसंपर्क ही वाढवला होता. केशव जाधव हे राजकीय व सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून ओळखले जात होते. गावातील विविध सामाजिक उपक्रम, सार्वजनिक प्रश्न व स्थानिक घडामोडींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचा मोठा संपर्क व वावर होता. तसेच टाकळी विंचूर येथे ‘के के सुपर मार्केट’ नावाने त्यांचे किराणा दुकान सुरू होते. रोजच्या व्यवहारात सक्रिय असलेली व्यक्ती अचानक बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

तक्रारदार कविता केशव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दिवशी ते कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून घरातून निघाले. मात्र त्यानंतर मोबाईलवर संपर्क होत नसल्याने नातेवाईक, मित्रपरिवार व ओळखीच्या ठिकाणी शोध घेण्यात आला. तरीही कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने दिनांक १३ फेब्रुवारी रोजी लासलगाव पोलीस ठाणे येथे मिसिंग क्रमांक ०९/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. केशव जाधव यांची उंची अंदाजे ५ फूट ५ इंच, शरीरयष्टी मध्यम, रंग सावळा, चेहरा गोल, वाढलेली दाढी अशी ओळख आहे. ते घरातून निघताना पांढरा हाफ शर्ट, पांढरी पॅंट व काळे शूज परिधान केले होते. त्यांच्या जवळ अँड्रॉईड मोबाईलही असल्याची माहिती आहे.

        दरम्यान, संबंधित व्यक्तीबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ लासलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप निचळ करत असून विविध ठिकाणी चौकशी व शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments