प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
महागांव तालुक्यातील आमणी (बु) येथील औद्योगिक वसाहतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून येथे प्रत्यक्ष उद्योग उभारणीपेक्षा केवळ शासकीय अनुदान मिळवण्याच्या उद्देशाने काही मंडळींकडून योजनाबद्ध प्रकार घडत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजक व सुशिक्षित बेरोजगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीतील काही भूखंड कागदोपत्री उद्योग दाखवून विविध शासकीय सवलती व अनुदान मिळवण्यासाठी घेतल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात काही मंडळींच्या त्रिकुटाने संगनमताने काम करत उद्योगासाठी भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक सुशिक्षित बेरोजगारांकडून मोठ्या रकमा उकळल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. त्यामुळे काही जणांना आर्थिक फटका बसल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, आमणी (बु) औद्योगिक वसाहतीतील प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली असता औद्योगिक विकासाचे चित्र अपेक्षेप्रमाणे दिसून येत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, वसाहतीतील सुमारे २५ ते ३० औद्योगिक गाळ्यांपैकी मोजकेच गाळे प्रत्यक्ष कार्यरत आहेत. अनेक गाळे वर्षानुवर्षे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत असून काही ठिकाणी उद्योग सुरू होण्याऐवजी जागा ओस पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचा मूळ उद्देशच धुळीस मिळत असल्याचे मत उद्योजकांकडून व्यक्त केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर काही मंडळींनी राजकीय पाठबळाच्या जोरावर भूखंड मिळवून ते इतरांना विक्रीस काढल्याच्या आरोपांनाही जोर मिळत आहे. उद्योगाच्या नावाखाली भूखंड घेऊन नंतर त्यांचे व्यवहार केल्याच्या चर्चेमुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये प्रत्यक्ष उद्योग उभे राहण्याऐवजी केवळ कागदोपत्री व्यवहार सुरू राहिल्यास भविष्यात ही वसाहत केवळ शासकीय अनुदान घेण्याचे केंद्र बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित औद्योगिक विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून सर्व गाळ्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, अशी मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे.
तसेच नियमांचे उल्लंघन करून भूखंड घेऊन ते वर्षानुवर्षे रिकामे ठेवणाऱ्या किंवा अनधिकृत व्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजवंत व उद्योग उभारण्यास इच्छुक उद्योजकांना मिळावा आणि या औद्योगिक वसाहतीत प्रत्यक्ष उद्योग सुरू होऊन स्थानिकांना रोजगार मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एकंदरीत, आमणी (बु) औद्योगिक वसाहतीतील सद्यस्थितीमुळे उद्योग विकासाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments