प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
महागांव :उमरखेड-महागाव मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. इंजि. किसन वानखडे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत मतदारसंघातील विविध प्रश्न विधीमंडळात मांडले. अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेल्या मागण्यांमुळे या मतदारसंघातील सिंचन, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
१२ मार्च रोजी विधानभवनात अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरू असताना आ. वानखडे यांनी उमरखेड-महागांव मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न उपस्थित केले. प्रामुख्याने मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना गती देण्याबरोबरच औद्योगिक विकासासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी महागांव शहरातील पोलीस स्टेशनची जुनी इमारत तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वसाहत उभारण्याची मागणीही केली. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक सुविधांनी सुसज्ज पोलीस स्टेशन उभारण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, असा आग्रह त्यांनी धरला.
उमरखेड-महागांव मतदारसंघ हा मराठवाड्याला लागून असलेला भाग असून आजवर या मतदारसंघाला मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने हा भाग काहीसा मागे राहिल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत असते. तरीही येथील शेती समृद्ध असून कष्टकरी शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आर्थिक हालचाल टिकून आहे. मसाला पीक म्हणून हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड तसेच ऊस शेती या भागात केली जाते.
मात्र, शेती समृद्ध असली तरी उद्योगधंद्यांचा अभाव असल्यामुळे सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी इतर जिल्ह्यांत किंवा परराज्यात स्थलांतर करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघात औद्योगिक विकासाला चालना देण्याची गरज आ. वानखडे यांनी अधोरेखित केली.
पुसद, महागांव आणि उमरखेड परिसरात औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करत त्यांनी मतदारसंघात किमान एक मोठा उद्योग उभारण्याची गरज व्यक्त केली. शासनाने विविध गुंतवणूक करार केले असून त्यातून या भागालाही लाभ मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक पातळीवर उद्योग उभारले गेल्यास सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि स्थलांतराचे प्रमाणही कमी होईल, असे मत त्यांनी सभागृहात मांडले. उद्योगविकासासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
एकंदरीत, आ. किसन वानखडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमरखेड-महागांव मतदारसंघातील विविध प्रश्न मांडत विकासाच्या दृष्टीने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आता शासन या मागण्यांकडे कितपत सकारात्मक दृष्टीने पाहते, याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे

Post a Comment
0 Comments