प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
महागांव :पंचायत समिती सभागृह दुरुस्तीच्या विकासकामाच्या बिलावरून महागांव येथे वाद उफाळून आला असून जि.प. बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंत्यावर लाच मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महागांव येथील शासकीय ठेकेदार अरबाजखान कयुमखान पठाण यांनी कनिष्ठ अभियंता प्रवीण मनोहरराव सलामे यांच्या विरोधात महागाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. या घटनेमुळे बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती सभागृह दुरुस्तीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कनिष्ठ अभियंता सलामे यांनी १० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित रक्कम न दिल्यास बिलातील सुमारे अडीच लाख रुपयांची कपात करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारदाराने नमूद केले आहे. त्यामुळे ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
तक्रारीत आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांकडेही पैसे मागितल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा देखील तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण घटनेबाबत शंका उपस्थित होत असून चौकशीची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, १३ मार्च २०२६ रोजी रात्री ८ ते १० वाजताच्या दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी वारंवार फोन करून अश्लील शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे ठेकेदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून प्रशासकीय पातळीवरही चर्चेला उधाण आले आहे.
या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील चौकशी पोलीस करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात सत्य काय आहे हे तपासाअंती स्पष्ट होणार असले तरी या घटनेमुळे बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Post a Comment
0 Comments