प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
महागांव तालुक्यातील काऊरवाडी (हिवरा) येथे वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेतात आग लागून शेतकऱ्याचे ठिबक सिंचनाचे साहित्य जळून सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१३ मार्च) घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात असून वीज वितरण कंपनीने तातडीने चौकशी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काऊरवाडी (हिवरा) येथील शेतकरी सुनील कांबळे यांच्या मालकीच्या शेतातील सर्व्हे क्रमांक ५७/१ व ५७/२ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आलेला आहे. शुक्रवारी अचानक या ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाले. या बिघाडामुळे ट्रान्सफॉर्मरमधील जळते तेल खाली पडून शेतातील वाळलेल्या गवताला आग लागली.
काही क्षणांतच आगीने शेतातील परिसर व्यापला. या आगीत शेतात ठेवलेले जैन कंपनीचे तुषार सिंचनाचे पाईप तसेच ठिबक सिंचनासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच शेतकरी व परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सिंचनाचे मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नुकसान झाले होते.
या आगीत अंदाजे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सुनील कांबळे यांनी सांगितले. शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत असताना अशा प्रकारच्या घटनेमुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत शेतकरी सुनील कांबळे यांनी महागाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात लेखी निवेदन देऊन घटनेची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
ग्रामीण भागातील अनेक शेतांमध्ये वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आलेले असतात. मात्र त्यांची वेळोवेळी देखभाल व तपासणी केली जात नसल्याची तक्रार शेतकरी वर्गाकडून सातत्याने केली जाते. तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या उडणे किंवा शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांबरोबरच सिंचन साहित्यालाही धोका निर्माण होत आहे.
त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मरची नियमित तपासणी व देखभाल करणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील वीज यंत्रणेच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments