Type Here to Get Search Results !

जामा मशीद परिसरातील ओपन स्पेस प्रकरण पुन्हा चर्चेत



, माजी उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे यांचे विरोधकांवर गंभीर आरोप


प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र 

महागांव शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील जामा मशीद परिसरात असलेल्या ओपन स्पेस जागेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. काही नागरिकांकडून या संदर्भात नगरपंचायतीकडे निवेदन देण्यात येत असताना माजी नगरपंचायत उपाध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.

आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सुरेश पाटील नरवाडे यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक १६ मधील जामा मशीद परिसरातील ओपन स्पेस संदर्भात सन २०२२ मध्ये महागाव नगरपंचायतीच्या विशेष सभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या वेळी नगरपंचायतीतील सर्व नगरसेवकांनी एकमताने हा ठराव मंजूर केला होता. त्यामुळे हा निर्णय कोणत्याही एका गटाचा नसून संपूर्ण सभागृहाच्या संमतीने घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नरवाडे यांनी पुढे सांगितले की, मागील चार वर्षांच्या कालावधीत नगरपंचायतीची सत्ता ज्यांच्या हातात होती त्यांनी या ठरावाबाबत कोणतीही हरकत घेतली नाही. तसेच हा ठराव रद्द करण्यासाठी किंवा त्याविरोधात कोणतीही प्रशासकीय अथवा कायदेशीर प्रक्रिया देखील करण्यात आली नाही. त्या काळात या निर्णयाला कोणताही विरोध नोंदविण्यात आला नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.

मात्र आता नगरपंचायतीची सत्ता हातातून गेल्यानंतर काही जणांकडून निवेदनांच्या माध्यमातून हा मुद्दा पुन्हा पुढे आणला जात असल्याचा आरोप नरवाडे यांनी केला. स्वतः सत्तेत असताना या विषयावर मौन बाळगणारे आता राजकीय हेतूने हा प्रश्न उपस्थित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, जामा मशीद परिसरातील ओपन स्पेस जागेचा मुद्दा सध्या महागांव शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणावर नगरपंचायत प्रशासन पुढील काळात कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या विषयावरून स्थानिक राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून येत्या काळात हा मुद्दा आणखी गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.


Post a Comment

0 Comments