एका महिन्यातच नगराध्यक्षा रंजना दीपक आडे यांची छाप ‘सेवा हेच ध्येय’ म्हणत विकासकामांना वेग; कोट्यवधींचा निधी, स्वच्छतेवर भर
प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे
महागांव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यात सौ. रंजना दीपक आडे यांनी आपल्या कामातून वेगळी छाप उमटवली आहे. सत्तेला केवळ सेवेचे माध्यम मानत, कोणतेही द्वेषाचे राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन विकासाचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे शहरात नव्या अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोट्यवधींचा निधी; विकासकामांना चालना
महागाव शहरासाठी विविध योजनांमधून मोठा निधी मंजूर करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्ती व मागासवर्गीय भागांसाठी तब्बल २ कोटी ७० लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत.
तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी २६ लाख रुपये मंजूर झाल्याने शहरातील कचरा समस्येवर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.
याशिवाय डम्पिंग यार्डकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, वॉल कंपाउंड बांधकाम तसेच प्रभाग क्रमांक १० मधील जलशुद्धीकरण केंद्रासाठी संरक्षण भिंत उभारणे अशा विविध कामांसाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महागावला मोठा दिलासा मिळणार आहे.
स्वच्छतेवर विशेष लक्ष; मोहीम युद्धपातळीवर
पदभार स्वीकारताच नगराध्यक्षा आडे यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रभाग क्रमांक १ ते १७ मधील साचलेला कचरा हटवून शहराबाहेर हलविण्याचे काम हाती घेण्यात आले. सध्या सर्वत्र नाल्यांची साफसफाई सुरू असून, “स्वच्छ व सुंदर महागाव” हा त्यांचा निर्धार स्पष्टपणे दिसून येत आहे.
घरकुल योजनेत गती; गरजूंना दिलासा
घरकुल लाभार्थ्यांसाठीही त्यांनी ठोस पावले उचलली आहेत. प्रलंबित लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, एकही पात्र कुटुंब वंचित राहू नये यासाठी वाढीव घरकुल प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्वतंत्र नगरपंचायत इमारतीसाठी प्रयत्न
महागाव नगरपंचायतीची स्वतःची सुसज्ज इमारत उभी राहावी, यासाठीही त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. प्रशासनिक कामकाज अधिक सुलभ व नागरिकाभिमुख व्हावे, हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
नेतृत्वाचे मान्य आभार
या सर्व कामांबाबत बोलताना नगराध्यक्षा सौ. रंजना आडे यांनी आमदार किसनराव वानखेडे आणि भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनामुळेच हा निधी मिळाल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या पाठबळामुळे शहराच्या विकास आराखड्याला गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
महागावमध्ये सुरू असलेली ही विकासाची धडपड आशादायक असली, तरी खऱ्या अर्थाने यश तेव्हाच मिळेल, जेव्हा मंजूर निधीतील कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होतील. ग्रामीण भागातील नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळणे हेच कोणत्याही विकासाचे खरे मोजमाप असते.
सध्या तरी, अल्पावधीतच विकासाचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न दिसत असून, महागाव शहर प्रगतीच्या नव्या वाटेवर पाऊल टाकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Post a Comment
0 Comments