"*सुजान पालकत्व ही सृजनशील प्रक्रिया" — प्रा. सीमा शेटे नवलाखे यांचे प्रतिपादन*
*प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी
उमा महेश्वर संस्थानात सुरू असलेल्या विडूळ व्याख्यानमालेतील सहावे पुष्प अत्यंत उत्साहात व मोठ्या उपस्थितीत पार पडले. यावेळी यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव फुले महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सीमा शेटे नवलाखे यांनी "सुजान पालकत्व व बालकांचे भविष्य" या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "सज्जन माणूस घडविण्याची कोणतीही स्वतंत्र शाळा नसते; हे कार्य आई-वडिलांनीच पार पाडायचे असते. त्यामुळे सुजान पालकत्व ही एक सृजनशील प्रक्रिया असून ती प्रत्येकाने जाणीवपूर्वक आत्मसात करणे आवश्यक आहे."
प्रा. शेटे यांनी पालकत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकताना सांगितले की, मुलांच्या आवडी-निवडी जपणे, त्यांना एकाच चौकटीत न बसवणे, श्रमाचे महत्त्व समजावणे, अपयश स्वीकारण्याची ताकद देणे तसेच मोठ्यांचा आदर करण्याची शिकवण देणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मुलांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी घरातील ज्येष्ठांनी आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या व्याख्यानास परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी पुसद येथील आदर्श शिक्षक विश्वांभर वानखेडे यांचीही उपस्थिती होती. सदर व्याख्यानाला मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.संपूर्ण व्याख्यानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, या व्याख्यानमालेत सातही दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व दिग्गज व्याख्याते यांची वैचारिक मेजवानी आयोजिली असून, या संधीचा लाभ परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उमा महेश्वर संस्थान, शिवनाम सप्ताह समिती, वीरशैव सेवा मंडळ, मन्मथ ज्योत यात्रा मंडळ व शिक्षण दृष्टी केंद्र, विडूळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments