प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात झपाट्याने वाढ होत असून कडक उन्हाच्या झळा नागरिकांना असह्य होत आहेत. या तळपत्या उन्हात प्रवासी, शेतकरी व ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गुंज येथील बसस्थानक चौकात सुरेश आव्हाड मित्रमंडळाच्या वतीने पाणपोई उभारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ आव्हाड यांच्या पुढाकारातून ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात प्रवाशांना तसेच शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण भेडसावत असते. वाढत्या तापमानामुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरत आहे.
गुंज बसस्थानक चौक हा परिसरातील प्रमुख वर्दळीचा भाग असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने प्रवासी, विद्यार्थी व ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत कडक उन्हात थंड पाण्याची उपलब्धता ही प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे. पाणपोईच्या माध्यमातून प्रवाशांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असून या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे सुरेश आव्हाड हे रंजल्या-गांजल्या लोकांच्या मदतीसाठी तत्पर धावून जाणारे युवा नेतृत्व म्हणून परिसरात ओळखले जातात. विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी समाजाशी असलेले नाते अधिक दृढ केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाने त्यांना भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
दरम्यान, गुंज येथील बसस्थानक चौकात सुरू करण्यात आलेल्या या पाणपोईमुळे तळपत्या उन्हात प्रवाशांना थंड पाण्याचा दिलासा मिळत असून हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments