Type Here to Get Search Results !

कृषी कुंभ २०२६ ; निफाड कृषी संशोधन केंद्राच्या गहू वाणांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 



प्रतिनिधी :-गणेश ठाकरे लासलगाव 

        कुंभनगरी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी कुंभ २०२६ प्रदर्शनात विविध कृषी तंत्रज्ञान, आधुनिक अवजारे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना तसेच विविध कंपन्या, कृषी विज्ञान केंद्रे, महाविद्यालये व संशोधन संस्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. या प्रदर्शनात कृषी संशोधन केंद्र कुंदेवाडी (ता. निफाड) यांनी सक्रिय सहभाग नोंदवत शेतकऱ्यांना गव्हाच्या सुधारित वाणांची माहिती दिली.

     महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. विलास खर्चे तसेच संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या गव्हाच्या विविध जातींचे प्रदर्शन स्टॉलवर मांडण्यात आले होते. या स्टॉलला अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी, शहरी नागरिक आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी गव्हाच्या विविध वाणांची माहिती जाणून घेतली.

कृषी संशोधन केंद्राने बन्सी व सरबती गव्हाच्या जातींपासून आजपर्यंत एकूण ३२ सुधारित वाण विकसित केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेला फुले समाधान हा वाण विशेष आकर्षण ठरला. तसेच कमी पाण्यावर चांगले उत्पादन देणारे व चपातीसाठी उपयुक्त फुले अनुपम व फुले अनुराग, बिस्किट निर्मितीसाठी उपयुक्त फुले सात्विक, उच्च पोषणमूल्य असलेला फुले संपन्न तसेच कुरडया, शेवया, रवा व पास्ता तयार करण्यासाठी उपयुक्त एन.आय.डी.डब्ल्यू ११४९ या वाणांबाबत शेतकऱ्यांनी विशेष रस दाखवला.

सदर दालन गहू तज्ज्ञ प्रा.भालचंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विस्तार केंद्र, कृषी संशोधन केंद्र निफाड मार्फत साकारण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी संशोधन केंद्र निफाड येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments