Type Here to Get Search Results !

विजेच्या लपंडावाने शेतकरी हैराण, महागांव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिंचन ठप्प



प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र 


महागांव तालुक्यातील वाकान, कोदंरी, चिखली, मलकापूर, पोहंडुळ आणि तिवरंग या गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी व नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. विशेषतः शेतीच्या हंगामात सिंचनासाठी विजेची अत्यंत गरज असताना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या परिसरातील शेतकरी सांगतात की, एका हप्त्यातून एकही दिवस पुरेसा विजपुरवठा मिळत नाही. दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतीतील मोटारी सुरू ठेवणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे अनेकदा रात्री बेरात्री अचानक वीज बंद होत असल्याने शेतकऱ्यांना जागून मोटार सुरू करण्यासाठी शेतात जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून शेतातील उसासह विविध पिकांना पाण्याची अधिक गरज भासत आहे. अशा परिस्थितीत विज केंद्रावरून दिवसातून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सिंचनाची व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी बागायतदार शेतकरी चिंतेत सापडले असून पिकांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गावातील नागरिक दर महिन्याला विजेचे मीटर बिल वेळेवर आणि न चुकता भरत असतानाही त्यांना सुरळीत विजपुरवठा मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वीज वितरण व्यवस्थेतील नियोजनाचा अभाव आणि वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे सामान्य नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दळणवळणाच्या तसेच दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक कामांवरही याचा परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या विद्युत अधिक्षक अभियंत्यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वाकान, कोदंरी, चिखली, मलकापूर, पोहंडुळ व तिवरंग या गावांमधील विजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे. अन्यथा येत्या काळात या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे.

ग्रामीण भागातील शेती आणि जनजीवन विजेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असताना वारंवार होणारा हा विजेचा लपंडाव थांबवून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments