Type Here to Get Search Results !

लोकसंग्रहाचा महामेरू : नितीनभाऊ भुतडा



प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे 

उमरखेडच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात अनेक नेते येतात, अनेकांची चर्चा होते परंतु काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांचे स्थान केवळ राजकारणापुरते मर्यादित राहत नाही. ती व्यक्ती जनतेच्या मनात विश्वासाचे प्रतीक बनते. उमरखेड परिसरात असेच एक नाव ठळकपणे घेतले जाते नितीन भाऊ भुतडा. कार्यनिष्ठा, संघटन कौशल्य, माणुसकीची जाण आणि लोकांशी असलेला आत्मीय संवाद यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राजकारणात पदे मिळवणे अवघड नसते पण जनतेचा विश्वास जिंकणे आणि तो टिकवणे ही मोठी कसोटी असते. नितीन भाऊ भुतडा यांनी ही कसोटी आपल्या कामातून पार केली आहे, असे त्यांच्या सहकाऱ्यांचे मत आहे. उमरखेड परिसरात त्यांच्याबद्दल बोलताना एक वाक्य नेहमी ऐकायला मिळते “एक कॉल… प्रॉब्लेम सॉल.” हे केवळ घोषवाक्य नाही, तर अनेक नागरिकांच्या अनुभवातून तयार झालेली भावना आहे.

एखाद्या शेतकऱ्याचा प्रश्न असो, एखाद्या कुटुंबावर अचानक संकट कोसळलेले असो किंवा एखाद्या कार्यकर्त्याला अडचण आली असो नितीन भाऊ मदतीसाठी धावून येतात, असा विश्वास लोकांमध्ये आहे.राजकारणात केवळ भाषणांनी नव्हे, तर कृतीतून विश्वास निर्माण होतो आणि तोच विश्वास त्यांनी जपला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर श्रद्धा ठेवत त्यांनी संघटनात्मक कामात सातत्याने स्वतःला झोकून दिले. गावागावात पक्षाची विचारधारा पोहोचवताना त्यांनी केवळ संघटना उभी केली नाही, तर कार्यकर्ते घडविण्याचे काम केले. अनेक तरुण कार्यकर्त्यांना त्यांनी राजकीय व सामाजिक कामासाठी प्रेरित केले. आदेश देणारे नेतृत्व न बनता मार्गदर्शक म्हणून उभे राहण्याची त्यांची शैली कार्यकर्त्यांना भावते.

राजकीय क्षेत्रात त्यांची ओळख ‘किंगमेकर’ म्हणूनही घेतली जाते. कारण अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. संघटनात शांतपणे काम करत नेतृत्व निर्माण करण्याची त्यांची क्षमता विशेष मानली जाते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही नितीन भाऊंची ओळख निर्माण झाली आहे. पक्षनिष्ठा, कामातील सातत्य आणि संघटन कौशल्य यामुळे नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास कायम राहिला आहे.राजकारणात विश्वास हीच सर्वात मोठी पूंजी असते आणि ती त्यांनी आपल्या कार्यातून मिळवली आहे.

नितीन भाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचा साधेपणा. मोठे राजकीय स्थान असूनही त्यांचा स्वभाव अत्यंत निगर्वी आहे. कार्यकर्त्यांशी आणि सामान्य नागरिकांशी सहज संवाद साधण्याची त्यांची पद्धत लोकांना आपली वाटते. त्यामुळेच अनेक जण त्यांना “कार्यकर्त्यांसाठी ढाल आणि विरोधकांसाठी ठाम भिंत” असे संबोधतात.उमरखेड विधानसभेच्या विकासाबाबतही त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे.

 ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शेतीशी संबंधित प्रश्न, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, सामाजिक सलोखा आणि विकासाच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवला. शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हीच खरी लोकसेवा असल्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे.

आजच्या राजकारणात स्पर्धा, आरोप-प्रत्यारोप आणि तात्कालिक लाभ यांना महत्त्व दिले जाते. अशा वातावरणात लोकांशी संवाद ठेवून त्यांचा विश्वास जपणारे नेतृत्व टिकून राहते. नितीन भाऊ भुतडा यांचे व्यक्तिमत्त्व याच कारणामुळे वेगळे ठरते. त्यांच्यातील संघटन कौशल्य, लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड ही त्यांची खरी ताकद आहे.

नितीन भाऊ भुतडा यांचा प्रवास हा केवळ राजकीय नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. लोकसंग्रह, लोकसेवा आणि विकासाची धडपड या तिन्हींच्या बळावर त्यांनी उमरखेडच्या जनमानसात स्थान निर्माण केले आहे.


आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना अनेकांच्या मनात एकच अपेक्षा आहे लोकांसाठी धावणारे हे नेतृत्व असेच सक्रिय राहो, समाजासाठीची त्यांची धडपड अधिक बळकट होवो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उमरखेडचा विकास अधिक वेगाने घडत राहो.

Post a Comment

0 Comments