खेड्यातील राहणीमान साधे असले तरी,तेथील जीवन जगण्याची पद्धत अतिशय आदर्श असते.तेच खरे संस्कृती जपण्याचे ठिकाण असते.तेथील घरे,अंगणं,रस्ते ही गावाकडच्या मातीशी जुळलेले असतात.घराच्या घराच्या भिंती ह्या मातीचा असतात.रोड,रस्ते सुद्धा मातीचेच असतात.घरासमोर भव्य अंगण असते.अंगणामध्ये तुळशीवृन्दावन असते.त्यामुळे घरामध्ये संपन्नता दिसून येते.सध्या खेड्यापाड्यातील परिस्थितीही बदलतांना दिसून येत आहे,मात्र अजूनही काही खेड्यात जुन्या पिढीतील माणसं आहेतच.खेड्यातील लोकजीवन आहे तेच आहे आणि जीवनशैली सुद्धा..! गावाकडील काही घरे अजूनही मातीचे आहेत,मात्र गेल्या वीस ते पंचवीस वर्षा अगोदर त्याहूनही परिस्थिती वेगळीहोती.
सकाळी झोपेतून उठल्यावर खेड्यातील दिनाचर्येपैकी महिलांसाठी सर्वप्रथम कार्य म्हणजे सर्व घर व अंगण झाडूने झाडणे.विशेषत:अंगण हे तुराटीच्या काड्यांपासून बनवलेल्या खराट्याने झाडले जायचे.त्यानंतर गाईच्या शेणापासून सकाळी सडा शिंपडणे.गावातील भाषेत या वेळेला "राम-प्रहर"म्हणतात अर्थात माता-भगिनी सकाळी सूर्योदयापूर्वी उठायच्या.चूल पेटवून अंघोळीसाठी गरम पाणी ठेवायच्या.ऋतू कोणताही असो हा त्यांचा नित्यनेम..! बापमाणूस गाई वासरांचे शेण-पाणी करण्यासाठी व दूध काढण्यासाठी शेतावर निघून जायचे.आम्ही लहान मुलं अंथरुणात लोळत पडलेलो असायचो.मात्र तेही सूर्योदयापर्यंतच...!आईची चूल पेटवून झाल्यावर लोखंडाच्या बादलीमध्ये बादली भरून रांजणातून पाणी घ्यायची.त्यामध्ये वावरातून येतेवेळेस आणलेले गाईचे शेण हाताने मिक्स करायची. त्याला मस्तपैकी चुरगाळून घेतल्यावर ते पाण्यात एकजीव होऊन जायचे. त्या पाण्याचा रंग हा गडद हिरवट किंवा मेहंदीच्या रंगाचा व्हायचा. त्या लोखंडी बादलीमध्ये शेतात औषधे फवारणी दरम्यान वापरलेल्या ऐन्ड्रनच्या प्लास्टिकच्या डब्याचा वरील भाग कापून मगासारखे बनवायची.त्याने सर्व अंगणभर सडा शिंपडायची. मातीच्या त्या अंगणभर शिंपलेल्या शेणाच्या सड्याचा खूप सुंदर वास यायचा. त्यातून एक आगळीवेगळी ऊर्जा निर्मिती व्हायची. शिंपलेल्या सड्या सड्यामुळे वातावरण प्रसन्न वाटायचे. अंगणाच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत हा सडा अगदी शोभून दिसायचा.तुळशी वृंदावनाच्या बाजूला एक दोन बाय दोन आकाराच्या मातीचा एक पाटासारखा ओटा बनवलेला असायचा,त्या ओट्यावर आई तळहाताने बादलीतील तळाशी साचलेल्या घट्ट शेणाने हलके- हलके सारवून घ्यायची. तो भाग सड्यासारखा ओबडधोबड नसायचा.आई त्यावर छान ठिपक्यांची रांगोळी काढायची. काही निवडक रंगच रांगोळीत असायचे.विशेषता पांढरी रांगोळी बहुप्रमाणात असायची. त्यावर लाल भडक कुंकू,पिवळी हळद बोटाने शिंपडायची.त्यामुळे रांगोळी अतिशय शोभून दिसायची. बाजूलाच श्रीराम, राम कृष्ण हरी,श्री विठ्ठल हे देवाचे नाव लिहायची.जसे मन होईल त्या दिवशी भगवंताचे कुठलेही नाव लिहायची.त्यांच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा मारायची. त्यामुळे ते अजूनच खुलून दिसायचे.हे सडा मार्जन गल्लीतील सर्व आया बहिणी सकाळीच लवकर उठून करायच्या. जवळपास सगळ्यांचीच वेळ ही तीच..! रामाचा राम प्रहर..!त्या शांत वातावरणात मंदिरातील घंटानाद मनमोहून टाकायचा. तो मंजुळ आवाज अजूनही कानात घुमतो.जुन्या आठवणी व खेड्यातील संस्कृती आणि लोकजीवनाची आठवण करून देतो.
गावाकडील मातीच्या अंगणातील शोभून दिसणाऱ्या सड्याबरोबर पूर्वीच्या मातीच्या घरातील तळभाग हा शेणाने सारवायचे.त्याचप्रमाणे पांढऱ्या मातीने भिंती सारवायचे त्याला पोतारा घेणे सुद्धा म्हणतात.भिंतीला तडा गेल्यास त्यामध्ये माती भिजवून घट्ट झालेल्या मातीच्या गोळ्याने भिंतीला गेलेल्या त्या तडा,चिरा बुजायचे त्याला "लिपन" करणे म्हणायचे. त्यापैकी मातीच्या घरातील तळभाग हा गायीच्या शेणाने सारवण्याची पद्धतही सुद्धा अतिशय कौशल्याची,मेहनतीची असायची. सड्याप्रमाणे घरातील तळभाग हा दररोज सारवल्या जात नव्हता कारण,त्याला बराच वेळ लागायचा.आठवड्यातून एक दोन वेळेस ही सारवण्याची क्रिया व्हायची अर्थात हे तळघर खराब झालेल्या अवस्थेवरून कळायचे.ते आया बहिणींना अगदी व्यवस्थित कळायचं. त्यादृष्टीने त्या ते सारवण्याचे काम करायच्या.
सारवण करण्यासाठी एका भांड्यामध्ये किंवा बादलीमध्ये गाईचे शेण कालवून घेतले जायचे किंवा एका जर्मरच्या मोठ्या पातेल्याचा वापर व्हायचा.त्यामध्ये जुन्या सुती लुगड्याचा एक कापड की जो, हातामध्ये व हाताच्या मुठीमध्ये सर्व बसेल व काही भाग मोकळा राहील जेणेकरून तो शेणाच्या पाण्यात बुडवून जमिनीवर फिरवल्यास त्याने सारवण्यास मदत होईल. त्या कापडाला पोतरा म्हणायचे. आई सारवायला सुरुवात करायची ते घराच्या आतील चुलीपासून ते मुख्य दरवाजापर्यंत,कारण सारवत सारवत मागे मागे यावे लागायचे. घर सारवतांना तो पोतारा पाण्यात कालवलेल्या शेणात बुडवायची.दोन्ही पायावर उक्कड बसून अर्धचंद्राकार अर्थात इंद्रधनुष्याच्या आकारासारखं सारवत सारवत मागे-मागे सरकायची. ताज्या- ताज्या सारवलेल्या घराचा अतिशय सुंदर वास यायचा. हातातील पोतारा परत पाणी आणि शेणाच्या कालवणामध्ये बुडवून संपूर्ण घरभर मुख्य दरवाजापर्यंत सारवल्यावर घर अतिशय सुंदर,शोभून दिसायचं.ताज्या-ताज्या सारवण्यावर बसल्यावर जणू काही एक वेगळी ऊर्जा निर्मिती व्हायची.ही एक आगळीवेगळी शक्ती होती. ती कायम स्मरणात राहील. हे ऋतुमानानुसार आरोग्यास उपयुक्त होते.उन्हाळ्यामध्ये सारवलेल्या जागेवर बसल्यास थंडगार वाटायचे तर, हिवाळ्यामध्ये उबदार वाटायचे कारण, कारण ही त्या गावाकडच्या मातीतील अन गाईच्या शेणाची शक्ती व त्याचबरोबर आईच्या मायेचा ओलावा होता. हल्लीच्या या उच्चदर्जांच्या फरशा सुद्धा या सारवण्यापुढे फिक्या पडतात कारण, ह्या फरश्या उन्हाळ्यात अतिगरम तर हिवाळ्यात थंडगार पडतात कारण त्यात मायेचा ओलावा कुठे आहे?
गावाकडील घराच्या या सडा सारवणाबरोबर घराच्या भिंती ह्या पांढऱ्या शुभ्र मातीने पोतरल्या जायच्या.भिंती पोतारने तेवढे सोपे काम नव्हते म्हणून,घराच्या भिंती ह्या फक्त सणासुदीला पोतारायचे कारण सर्व घराच्या भिंती रंगवणे हे घराच्या आकारानुसार लक्षात घेता दोन ते चार दिवस लागायचे. घराच्या भिंती पोतारणे एक प्रकारची गावाकडील घरांची रंगरंगोटीच होती. या मातीच्या भिंत पोतरण्यासाठी शेणाऐवजी पांढरीशुभ्र माती वापरली जायची. हे मातीचे ढेकळं विशेषता मातीच्या गढीच्या ठिकाणी सापडायचे.म्हणून ते दहा पाच ढेकळ जमा करून ठेवावे लागायचे. आई त्या पांढऱ्या मातीच्या ढेकळांना पाण्यामध्ये भिजवून ठेवायची. जसा घरातील तळभाग सारवायची तसाच भिंतीना पोतारायची.मात्र भिंती पोतारण्यासाठी आईची खूप कसरत व्हायची.कारण हे तासंतास लाकडी स्टूलवर उभे राहून किंवा जाड लोखंडी पत्राच्या डब्यावर उभे राहून पोतारावे लागायचे,कारण घराच्या भिंती या उंच असायच्या.घराला छत म्हणून लोखंडी टीनपत्रे किंवा मातीचे धाबे असायचे.उभे राहून सारवल्यामुळे पाणीमिश्रित मातीचे थेंब सर्व अंगावर पडायचे,म्हणून आई डोक्याला एखादं कापड बांधून घ्यायची.मात्र चेहऱ्यावर एखाद्या रंगाऱ्याप्रमाणे पांढऱ्या मातीचे शिंतोडे उडायचेच.या मातीतही माय सारखाच मायेचा ओलावा होता. गावाकडची माती आणि जन्मदात्री माय यांच्या आभाळभर मायेचा ओलावा सारखाच...!कारण त्यांनीच आम्हांला संस्कारशील बनवले.मातीच्या भिंती सारवतांना इतका सुंदर सुवास यायचा की जणू, त्याला जिभेने चाखावं आणि हो आम्ही लहान असताना चाखायचो सुद्धा...! हल्ली शरीरातील कॅल्शियम वगैरे कमी झाल्यास मेडिकलमध्ये मातीचे खडे भेटतात.ती आम्ही लहान मुलं व विशेषता गर्भवती महिला ह्या मातीच्या पोतऱ्यातून खायचो,चाखायचो. अशी शक्ती या गावाकडच्या मातीमध्ये होती व अजूनही आहे. घराच्या मातीच्या भिंती पूर्ण पोतारून झाल्यावर घर अगदी चमचमीत दिसायचं घरात प्रसन्न वाटायचे.पांढऱ्या मातीच्या रंगाने एक आगळी वेगळीच चैतन्यमय अनुभूती यायची.
अशा प्रकारे गावाकडील हे अंगणातील सडा व घरातील तळभाग,भिंती सारवणे व पोतारणे बहुअंगांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्यदायी होते.त्यातून सकारात्मक ऊर्जानिर्मिती व्हायची.घरातील अबाल वृद्धांचे या शेणा-मातीमुळे शारीरिक स्वास्थ मजबूत असायचे.मागील दशकाअगोदर गावाकडील या सडा-सारवण्याच्या संस्कृतीचा वारसा जपून होता.हल्ली गावोगाव-खेडोपाडी सिमेंटचे घर तयार होत आहेत.आकर्षक रंगरंगोटी करून छते सजवल्या जात आहे, मात्र जो आभाळभर मायेचा ओलावा या अंगणातील सडा व घरातील सारवणामध्ये होता तो या सिमेंटच्या जंगलामध्ये दिसून येत नाही.ज्यांनी या गावाकडील मातीची अन संस्कृतीची अनुभूती घेतली ते कधीच विसरू शकत नाही, कारण खेड्यातील हे वैशिष्ट्यपूर्ण जगणं जरी साधं असलं तरी उच्चकोटीचा आनंद देणारे,उल्हासदायी व सुगंधी मातीच्या सहवासातील मायेच्या ओलाव्यातील होते. मित्रांनो,संस्कृतीचा वारसा जपणारं हे संस्कारशील जगणं बदलत्या काळानुसार फक्त तुम्हांला पुस्तकात वाचायला भेटेल. ज्या पिढीने प्रत्यक्ष अनुभवलं.त्यांच्या हृदयाच्या कोपऱ्यात आठवणीच्यारुपाने अगदी खोलवर साठवलेलं आहे. ही अनुभूती कदाचित भविष्यात शक्य नाही. हे येणाऱ्या पिढीसाठी फक्त इतिहास असेल,मात्र प्रत्यक्ष सोनेरी क्षणांची अनुभूती मुळीच नाही.
श्री विनोद शेनफड जाधव
मासरूळ ता जि बुलडाणा
Post a Comment
0 Comments