Type Here to Get Search Results !

कामरगावमध्ये अंगणवाडी पोषण पंधरवाडा कार्यक्रम उत्साहात



पिंपळगाव कौडा (जिल्हा प्रतिनिधि) – 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नगर ग्रामीण १ अंतर्गत कामरगाव येथे राबविण्यात आलेला राष्ट्रीय ८ वा पोषण पंधरवाडा कार्यक्रम विविध अंगणवाड्यांच्या सहभागातून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गरोदर माता, स्तनदा माता व लहान बालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या पंधरवड्यात अंगणवाडी सेविका व सहाय्यकांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात गावात रॅली काढून करण्यात आली. रॅलीदरम्यान अक्षयपात्र तयार करून लोकसहभाग मिळविण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत माता व पालकांचा सहभाग लक्षणीय होता.

यानंतर कामक्षा माता सभागृहात पौष्टिक आहाराचे प्रदर्शन भरविण्यात आले. गावातील नागरिकांच्या सहभागातून तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या विविध पोषणयुक्त पदार्थांचे सादरीकरण करण्यात आले. यासोबतच मार्गदर्शन शिबिरे, आहार प्रात्यक्षिके, तसेच बालकांचे वजन व उंची मोजणी यांचा समावेश होता. महिलांना संतुलित आहार, स्वच्छता व आरोग्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात बालकांच्या विविध गुणांचे सादरीकरण करण्यात आले तसेच पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकांना ‘विद्या आरंभ’ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. “सही पोषण, देश रोषण” हा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली व पोषण विषयक शपथ घेण्यात आली.

अंगणवाडी पर्यवेक्षिका श्वेता गवळी यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे कुपोषणावर मात करण्यास मदत होऊन बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच संदिप ढवळे, ग्रामपंचायत सदस्य हाबू शिंदे, शिवाभाऊ सोनवणे तसेच पत्रकार हेमंत साठे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका, सहाय्यक व संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी पूजा ढास यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments