दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत महागाव येथे मानवतेचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. स्व. कु. श्रावणी निलेश नरवाडे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवासी व नागरिकांची तहान भागविण्यासाठी ‘पाणपोई’चे लोकार्पण मंगळवार, १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
संविधानाचा संदेश आणि मानवतेची जोड
समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांचा जागर करणाऱ्या महामानवांच्या विचारांना उजाळा देत हा उपक्रम साकारण्यात आला. ‘पाणी हा मूलभूत हक्क आहे’ हा संदेश देणाऱ्या चवदार तळे सत्याग्रहाच्या प्रेरणेतूनच या पाणपोईची उभारणी करण्यात आली आहे. रणरणत्या उन्हात प्रवाशांना दिलासा देणारा हा उपक्रम समाजातील संवेदनशीलतेचे उदाहरण ठरत आहे.
शिक्षण, सेवा आणि सामाजिक बांधिलकी
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, स्व. श्रावणीच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. समाजाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवत विजय खंदारे यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
महागाव बस स्थानक परिसरातील ‘शुभम सर्विसिंग सेंटर’जवळील ट्रॅव्हल्स पॉईंट येथे उभारण्यात आलेली ही पाणपोई आता प्रवाशांसाठी विसाव्याचे ठिकाण ठरणार आहे.
मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
या पाणपोईचे उद्घाटन भाजप समन्वयक नितीन भुतडा व आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे, ठाणेदार धणराज निळे, प्राचार्य शरदचंद्र डोंगरे, ज्येष्ठ पत्रकार गजानन वाघमारे, संजय भगत, महागाव पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर, ज्ञानेश्वर ठाकरे, निलेश नरवाडे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
“माणुसकीच्या नात्याने समाजासाठी केलेले छोटेसे कार्य हेच खऱ्या अर्थाने महामानवाला अभिवादन ठरते. श्रावणीच्या स्मृती या उपक्रमातून जनसेवेत सदैव जिवंत राहतील,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment
0 Comments