Type Here to Get Search Results !

सामाजिक समता सप्ताह ' उत्साहात ; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विचारांनी अभिवादन !



  शोषितांची ‘राष्ट्रभाषा’ बनतोय आंबेडकरवाद : दलितमित्र बालासाहेब शिंदे

अतनूर / प्रतिनिधी

आंबेडकरवाद आता देशातील सर्व शोषित, पीडित आणि वंचितांची ‘राष्ट्रभाषा’ बनत आहे. डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद हाच खरा राष्ट्रवाद आहे, हे सत्य भारतीयांना समजत आहे. यापासून जे दूर आहेत, त्यांना हे सत्य समजेल त्या दिवशी भारतात खऱ्या अर्थाने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे राज्य आल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केले.

अतनूर ता.जळकोट येथे जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती महाराष्ट्र राज्य, वसुंधरा महिला मंडळ व जिजामाता महिला मंडळ अतनूरच्या वतीने आयोजित ' सामाजिक समता सप्ताहाच्या ' उत्साहात दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विचारांनी अभिवादन करण्यात आले. यावेळी दलितमित्र बालासाहेब शिंदे बोलत होते.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतनूर येथील उपरोक्त सेवाभावी संस्थेच्यावतीने कार्यालयात ‘सामाजिक समता सप्ताहा’अंतर्गत प्रेरणादायी व्याख्यान, संविधान प्रास्ताविक वाचन आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

 दि.१४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सामाजिक समता सप्ताहा’अंतर्गत अतनूर येथील उपरोक्त सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात तसेच शाळा व महाविद्यालयात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वतीने ‘सामाजिक समता’ या विषयावर एका सविस्तर आणि प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले. या विशेष कार्यक्रमांतर्गत केवळ व्याख्यानच नव्हे, तर ‘संविधान प्रास्ताविक वाचन’ आणि ‘निबंध लेखन स्पर्धा’ आयोजित करून महामानवाला खऱ्या अर्थाने वैचारिक आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी पुढे बोलताना दलितमित्र बाळासाहेब गोविंदराव शिंदे म्हणाले की, २१ व्या शतकाच्या वाटचालीत भारतातील जातीयवादी लोक जातीयतेचे विष पेरत आहेत. कायद्याने आज अस्पृश्यतेला थारा नाही; परंतु ती आजही पाळली जाते हे विदारक वास्तव कोणीही नाकारणार नाही. याची असंख्य उदाहरणे आहेत. देशात जाती आणि धर्माच्या नावाखाली कुठे ना कुठे अन्याय, अत्याचार, स्त्रियांवर अन्याय चालूच आहेत. अशावेळी देशाचे अखंडत्व कायम राखण्यासाठी ‘आंबेडकरवाद’ हाच सर्वात प्रगल्भ आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचार वाटतो., असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकानंतर अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर आधारित आपली मनोगते व्यक्त केली. सामाजिक समता आचरणात आणण्याची गरज, जिजामाता महिला मंडळाचे अध्यक्षा सौ.संध्या बालासाहेब शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रुक्‍मीनबाई सोमवंशी या प्रेरणादायी व्याख्यानासाठी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अत्यंत प्रभावी आणि विचारप्रवर्तक भाषणातून डॉ. बाबासाहेबांच्या ‘समता, बंधुता आणि न्याय’ या मूलभूत तत्त्वांचा सखोल ऊहापोह केला. त्या म्हणाल्या, “समाजातील जात, धर्म, लिंग आणि आर्थिक स्थिती यामुळे निर्माण होणारी विषमता दूर करण्यासाठी केवळ शिक्षणच नव्हे, तर जागरूकता आणि संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर न थांबता आपली सामाजिक जबाबदारीही ओळखून ती स्वीकारावी. समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तरुणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. सामाजिक समता ही केवळ पुस्तकातील संकल्पना नसून, ती खऱ्या अर्थाने आचरणात आणण्याची आज मोठी गरज आहे.”

परदेशातील शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा : प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाणकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ‘सामाजिक समतेचे’ अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाच्या नावाने उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात अनेक शिष्यवृत्ती (Scholarships) उपलब्ध आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. बाबासाहेबांच्या उच्च विचारांचे अनुसरण करून एक समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी तरुणांनी आपले मोठे योगदान द्यावे.”

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि समताधिष्ठित समाज घडावा, या उदात्त हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समितीचे व्यंकटेश शिंदे, मयुरी शिंदे, प्रवीण सोमवंशी, यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन कुमारी प्रियंका गायकवाड आणि कुमारी मयुरी बालासाहेब शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.भरत बिरादार यांनी केले. या कार्यक्रमास आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, गावातील महिला भगिनी, पुरुष, स्त्रिया, मुले, मुली, विद्यार्थी, विद्यार्थिनी, जिजामाता विद्यालय तसेच कन्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments