Type Here to Get Search Results !

शेतात मका पाहायला गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकरांचा रक्तरंजित हल्ला!


 

काळी दौलत खान वनपरिक्षेत्रात दहशत; वनविभाग झोपेत, शेतकरी जीव मुठीत धरून शेतीत

दवंडी वार्तापत्रमहागांव प्रतिनिधी : विवेक नरवाडे

महागांव तालुक्यातील काळी दौलत खान वनपरिक्षेत्र पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने हादरले आहे. चिचपाड परिसरात आपल्या शेतातील मका पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर तीन रानडुकरांनी अचानक जीवघेणा हल्ला चढवल्याची थरारक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. या भीषण हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुसद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून शेतात जावे की नाही? असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ जाधव हे आपल्या शेतातील मका पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. उन्हाच्या कडक झळांमध्येही मेहनतीने उभे केलेले पीक कसे आहे, याची पाहणी करण्यासाठी ते शेतात गेले; मात्र त्यांना कल्पनाही नव्हती की मृत्यू दबा धरून बसला आहे. शेतातील दाट पिकामध्ये आधीच लपून बसलेल्या तीन रानडुकरांनी अचानक त्यांच्या अंगावर झडप घातली.

क्षणात सगळे चित्र बदलले. रानडुकरांनी गोकुळ जाधव यांच्या हातावर आणि मांडीवर जबरदस्त हल्ला करत खोल जखमा केल्या. तीक्ष्ण सुळ्यांनी आणि दातांनी शरीर फाडत अक्षरशः रक्तबंबाळ केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गोकुळ जाधव मदतीसाठी आरडाओरड करू लागले; मात्र रानडुकरांचा आक्रमकपणा इतका भयंकर होता की काही क्षण ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झुंज देत राहिले.

जखमी अवस्थेत ते जमिनीवर कोसळल्यानंतर परिसरातील नागरिक आणि नातेवाईक घटनास्थळी धावले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मात्र या घटनेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या शेतात घुसून वन्य प्राणी थेट हल्ले करू लागल्याने आता शेती करायची कशी? असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जंगलातील पाणवठे पूर्णपणे आटल्यामुळे वन्य प्राणी आता पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात गावाकडे व शेतीकडे धाव घेत आहेत. विशेषतः सिंचन सुविधा असलेल्या शेतांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मका, सोयाबीन आणि इतर पिकांमध्ये दिवसरात्र रानडुकरांचे कळप शिरत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

फक्त रानडुकरेच नव्हे तर बिबटे, कोल्हे आणि इतर हिंस्र प्राण्यांचाही वावर वाढल्याचे नागरिक सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी मोहदी-सातघरी परिसरात शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्या घटनेची दहशत अजून कमी झाली नसतानाच आता पुन्हा रानडुकरांच्या हल्ल्याने शेतकरी हादरले आहेत.

ग्रामीण भागातील परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, शेतकरी आता पहाटे किंवा सायंकाळच्या वेळेत एकटे शेतात जाण्यास घाबरत आहेत. काही ठिकाणी तर महिलांनी आणि वृद्धांनी शेतात जाणेच बंद केले आहे. वन्य प्राण्यांपेक्षा आता प्रशासनाची उदासीनता अधिक भयानक वाटते, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

वनविभागाच्या कारभारावरही आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार घटना घडूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही प्रभावी मोहीम राबविली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

फक्त पंचनामे आणि कागदोपत्री कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांचा जीव जातोय, याची जाणीव प्रशासनाला आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाने तातडीने पुढाकार घेऊन जंगल परिसरात पाण्याची व्यवस्था करावी, वन्य प्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे आणि धोकादायक भागांमध्ये गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. तसेच जखमी शेतकरी गोकुळ जाधव यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी आधीच अवकाळी पाऊस, दुष्काळ, पिकांचे नुकसान आणि आर्थिक संकटाने होरपळून निघाला आहे. त्यात आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांनी त्यांचे जगणे आणखी असुरक्षित बनले आहे. एका बाजूला शेतकरी शेती वाचवण्यासाठी झगडतोय, तर दुसऱ्या बाजूला स्वतःचा जीव वाचवण्याची वेळ त्याच्यावर येत आहे.

काळी दौलत खान वनपरिक्षेत्रातील ही घटना केवळ एका शेतकऱ्यावरचा हल्ला नसून ग्रामीण भागातील भयावह वास्तवाची घंटा आहे. जर प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments