तात्काळ पदमुक्त करून चौकशी करण्याची शिवसेना शहर समन्वयक नितीन नरवाडे यांची मागणी
दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
यवतमाळ (महागांव): महागांव नगरपंचायतीचे प्रभारी पाणीपुरवठा अभियंता श्री. संदेश मोरे यांच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (शिंदे गट) शहर समन्वयक नितीन विजयराव नरवाडे (पाटील) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना निवेदन देऊन मोरे यांचा पदभार तात्काळ काढून घेण्याची मागणी केली आहे.
पत्रात नमूद केलेले प्रमुख आरोप:
१. पाणीपुरवठा कामांमध्ये नियमबाह्य पद्धतीने देयके काढली जात आहेत.
२. प्रत्यक्ष काम पूर्ण नसताना किंवा अपूर्ण कामांची खोटी बिले तयार केली जात आहेत.
३. निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून ती चुकीच्या पद्धतीने राबवली जात आहे.
४. शासकीय निधीचा गैरवापर होत असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
नितीन नरवाडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

Post a Comment
0 Comments