Type Here to Get Search Results !

महागांवात २२ मे रोजी शेतकऱ्यांचा ‘हाहाकार मोर्चा’; विविध मागण्यांसाठी जन आंदोलन आधार संघर्ष समिती आक्रमक

 




दवंडी वार्तापत्र  महागांव  प्रतिनिधी  विवेक  नरवाडे

महागांव: जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळे शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप करत, तसेच विविध प्रलंबित योजनांच्या अंमलबजावणीसाठी महागाव येथे तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 'जन आंदोलन आधार संघर्ष समिती' चे संस्थापक अध्यक्ष श्री. जगदीश भाऊ उत्तमराव नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली येत्या शुक्रवार, दिनांक २२ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पंचायत समिती, महागाव येथे या "हाहाकार मोर्चा" चे आयोजन करण्यात आले आहे.


या संदर्भात समितीने जाहीर दवंडी (पत्रक) प्रसिद्ध करून सर्व शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी बहुसंख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


मोर्चातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे


१. सरसकट पीक विमा: तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट पीक विम्याचा लाभ मिळालाच पाहिजे.

२. निराधारांचे मानधन: निराधार योजनेचे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन त्वरित खात्यात जमा करण्यात यावे.

३. पांदन रस्ते मोकळे करणे: तालुक्यातील पांदन रस्त्यांचे खडीकरण करून ते शेतीकामासाठी आणि वाहतुकीसाठी त्वरित खुले करण्यात यावे.

४. 'लाडकी बहीण' योजना: लाडक्या बहिणींचे के.वाय.सी. (KYC) प्रमाणीकरण पूर्ण करून त्यांचे थकीत/नियमित मानधन (पगार) त्वरित सुरू करण्यात यावे.

५. शेतकामासाठी डिझेल: शेतीकामासाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर आणि जे.सी.बी. (JCB) या वाहनांसाठी कॅन (Can) मध्ये डिझेल देण्याची परवानगी मिळावी.

६. घरकुल योजना: प्रलंबित असलेल्या घरकुल योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना विनाविलंब देण्यात यावे.


आयोजकांचे आवाहन:


"प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य शेतकरी, निराधार आणि महिलांचे मोठे नुकसान होत आहे. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून शुक्रवारच्या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थितराहावे," असे आवाहन संयोजक जगदीशभाऊ नरवाडे यांनी केले आहे.

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यात प्रशासकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आंदोलनाचा इशारा पाहता मोठा जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Post a Comment

0 Comments