Type Here to Get Search Results !

महागांवच्या प्रभाग १६ मध्ये डबकी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात; प्रशासनाच्या 'निद्रिस्त' धोरणावर संताप



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

महागांव नगरपंचायतीच्या कारभाराचा आणखी एक भयावह चेहरा प्रभाग क्रमांक १६ मध्ये समोर आला आहे. परिसरात नालीचे सांडपाणी रस्त्यावर पसरल्यामुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले असून, या दुर्गंधीमुळे लहान मुले आणि वयोवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाच्या नाकखाली अस्वच्छतेचे साम्राज्य

प्रभाग १६ मधील नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. साचलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रहिवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासनाने केवळ मलमपट्टी करण्याचे धोरण अवलंबलेअसून, ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

नगरपंचायत प्रशासनाचा गलथान कारभार

महागांव नगरपंचायत प्रशासनाचा कारभार किती ढिसाळ आहे, हे या प्रकारावरून स्पष्ट होते. प्रभाग १६ मधील नागरिक आपल्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या या अस्वच्छतेकडे लक्ष देण्याची विनंती करत आहेत, मात्र नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या जिविताचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही, असेच चित्र सध्या दिसत आहे. 'स्वच्छ भारत'चा गजर करणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या कार्यक्षेत्रातील अस्वच्छता दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

आरोग्याशी खेळ कधी थांबणार?

साचलेल्या सांडपाण्यामुळे लहान मुलांच्या आणि वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. नगरपंचायत प्रशासनाने त्वरित जागे होऊन नालेसफाई करावी आणि रस्त्यावर साचलेले सांडपाणी काढून तातडीने रस्ते स्वच्छ करावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष सुरूच ठेवले, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


आता या ‘आंधळ्या आणि बहिऱ्या’ झालेल्या नगरपंचायत प्रशासनाला जाग कधी येणार, आणि प्रभाग १६ मधील नागरिकांची नरकयातनेतून सुटका कधी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Post a Comment

0 Comments